‘भूमी सुपोषण अभियाना’त समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे ! – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

अमळेनर येथील श्री मंगळग्रह मंदिरातून राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ !

अमळनेर – सर्वांसाठी जीवनदायीनी असलेल्या भूमीमातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात् गुढीपाडव्याला जन्मदिवस असतो. या मंगलदिनी ‘भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियाना’चा श्री मंगळग्रह मंदिरातून शुभारंभ होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. हे अभियान संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे. यात सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे. अन्नदात्या भूमीला आई मानून जैविक शेती करावी, असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांनी केले.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देतांना श्री. सुनील घनवट

अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १९ मार्च या दिवशी श्री मंगळग्रह मंदिरातून झालेल्या ‘भूमी सुपोषण’ या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शंकराचार्य स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, पद्मश्री डॉ. सुभाष शर्मा, महाराष्ट्र अन् छत्तीसगड मंदिर महासंघाचे संयोजक सुनील घनवट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागैय्याजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, युवा कल्याण अन् क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले व्यासपिठावर विराजमान होते.

१७ सहस्र मंदिर सामाजिक कार्यासाठी योगदान देत आहेत ! – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट या वेळी म्हणाले की, श्री मंगळग्रह मंदिरातून भूमी सुपोषण संवर्धन राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ होत आहे, याचा मला अभिमान आहे. केवळ जळगाव, महाराष्ट्र नव्हे, तर देशभरात याचा प्रचार आणि प्रसार होईल. भारतातील हे पहिले मंदिर आहे, जेथे वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू झाली आहे.

१७ सहस्र मंदिर सामाजिक कार्यासाठी योगदान देत आहेत. भूमी सुपोषणासाठी आपल्या मनात कृतज्ञता हवी. सद्य:स्थितीत रासायनिक खतांच्या वापरामुळे भूमी नापीक होत आहे. आपण चांगले पिकवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रासायनिक खतांचा वापर बंद करावा. भूमी पूजन करून भूमी सुपोषणाचा संकल्प करावा. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे. प्रत्येकाने यात योगदान दिले, तर याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.

‘भूमी सुपोषण अभियान’ म्हणजे काय ?

सरकारच्या ‘भूमी सुपोषण अभियाना’च्या अंतर्गत भूमीची सुपीकता वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

श्री मंगळग्रह मंदिर झाले देशातील पहिले ‌‘एआय‌’ मंदिर  !

अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर आता देशातील पहिलेच ‌‘एआय‌’(कृत्रिम बुद्धीमत्ता) मंदिर झाले आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सदर एआय प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी यंत्रणा तंत्रज्ञ तुषार भारंबे, डॉ. युवराज परदेशी, चेतन गिरनार आणि मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अमळेनर येथील श्री मंगळग्रह मंदिर (चित्रावर क्लिक करा) (सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स)