मंदिरांची शक्ती वाढवा !

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना झाल्याच्या क्षणी सर्व मान्यवर व्यासपीठावर हात उच्चावतांना दिसत आहेत

भारताला लाखो वर्षांचा इतिहास आहे. आपल्या ऋषिमुनींनी सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी वेद, उपनिषदे यांसारख्या सर्वमान्य ग्रंथांमधून मार्गदर्शन केले, तसेच आपल्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी अनेक मंदिरांची स्थापना केली. हिंदूंची मंदिरे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे. यासाठी पूर्वी राजे-महाराजे प्रयत्नरत होते. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनीही अनेक मंदिरांचे जतन आणि संवर्धन केले, तसेच धर्मांध आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली अनेक मंदिरे, घाट आणि तलाव यांचा जीर्णोद्धार केला.

आज हिंदूंच्या मंदिरांना अपुरे धन, सुविधांचा अभाव, सुरक्षाव्यवस्था अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत. ‘निधर्मी’वादाच्या नावाखाली मंदिरांवर प्रतिदिन आघात होत आहेत. महाराष्ट्रातील मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झालेलेच आहे. ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे, अशा मंदिरांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते, तसेच ‘अतीमहनीय व्यक्तींसाठी दर्शन ओळखपत्र’ ही एक नवीनच कुप्रथा चालू झाली आहे. पूर्वीच्या राजे-महाराजे यांनी मंदिरांसाठी भूमी दान दिल्या होत्या. या भूमी कसणार्‍या कुळांनीच भूमी बळकावण्याचेही प्रकार वाढले आहेत. आता तर ‘वक्फ बोर्डा’कडून विविध मंदिरांच्या भूमींवर हक्क सांगून त्या कह्यात घेतल्या जात आहेत. निधर्मीवाद्यांकडून मंदिराजवळच मद्य, मांस-मच्छी विक्रीचे दुकाने थाटली जात आहेत. यामुळे मंदिरांची सात्त्विकता, पावित्र्य भंग पावत आहे. काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांना देण्यासाठी बनवण्यात येणारा प्रसाद अहिंदूंकडून बनवून घेतला जात होता. त्यामुळे पावित्र्य आणि शुद्ध धर्माचरण करून देवाचा प्रसाद बनवला जात असेल का ? अशा स्थितीमध्ये एकटे मंदिर किंवा मंदिर विश्वस्त काय करणार ? यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य मंदिर न्यास परिषदे’च्या माध्यमातून मंदिरांचे संघटन केले जात आहे. याला महाराष्ट्रातून मंदिर विश्वस्त, पुजारी, मठाधिपती, मंदिरांशी संबंधित अधिवक्ते यांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

मंदिरांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आपणही ‘मंदिर न्यास परिषदे’च्या माध्यमातून मंदिर सरकारीकरणाविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि आंदोलने केली जात आहेत. प्रत्येक हिंदूने मंदिराचा परिसर मद्य, मांस आणि जुगार यांपासून मुक्त रहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भक्तांविना ओस पडलेल्या मंदिरांना भक्तांशी जोडण्यासाठी सामूहिक आरत्या, बालसंस्कारवर्ग आणि धर्मशिक्षणवर्ग आदींचे आयोजन करू शकतो. मंदिरातील व्यवसाय देव न मानणार्‍या अन्य धर्मियांना दिला जाऊ नये, म्हणून संघटितपणे प्रयत्न करू शकतो !

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा