एखादा साधक इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आत्मज्ञान प्राप्त करतो, तेव्हा तो ‘ज्ञानाची गुढी’ उभारतो. – संत एकनाथ

१. गुढीपूजनाची प्राचीनता !
ऋग्वेदात ‘इंद्रस्य ध्वजः’ म्हणजे इंद्राचा ध्वज अर्थातच तो विजय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानला जाई. त्या आधीपासून निसर्गपूजेअंतर्गत उंच झाड किंवा बांबू यांच्या पूजेची प्रथा होती. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर नागरिकांनी गुढ्या उभारल्या.
२. महाभारतकालीन सर्वमान्यता

गुढीपूजनाला महाभारतकाळात मोठी मान्यता मिळाली. महाभारताच्या आदिपर्वात सांगितले आहे की, चेदी देशाचा राजा उपरिचर वसू याने कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येवर प्रसन्न होऊन इंद्राने त्याला विमानासह कधीही न सुकणारी वैजयंतीमाला आणि बांबूचा ध्वज (दंड) दिला. एक प्रकारे हा इंद्रविजय झाला ! राजाने तो दंड भूमीवर रोवून त्याला वस्त्रे, फुलांच्या माळा आणि दागिने यांनी सजवले. ही घटना चैत्र शुक्ल प्रतिपदेला घडली. त्यामुळे या दिवसाला ‘गुढीपाडवा’(‘गुढी’ म्हणजे विजयाचे प्रतीक (ध्वज) आणि ‘पाडवा’ म्हणजे प्रतिपदा), असे म्हटले जाते.
अग्निपुराण, भविष्य पुराण, प्राचीन तमिळ साहित्य यांत या उत्सवाचे वर्णन येते. ‘भांडारकर संस्थे’च्या तज्ञांनी सिद्ध केले की, राजाने चालू केलेली ‘यष्टी पूजा’ हीच आजच्या गुढीचे मूळ रूप आहे. कुरु वंशातील उपरिचर वसू हा प्रभावशाली आणि धार्मिक राजा होता. त्याने अहिंसक यज्ञांचा पुरस्कार करून समृद्धी आणली.
३. भारतवर्षात सर्व स्तरांतील गुढीपूजन !
‘राजाने इंद्रध्वज उभा केल्यावर प्रजेने घराबाहेर छोटे ध्वज उभे करावेत’, असा संकेत ‘बृहत्संहिता’ आणि ‘महाभारत’ या ग्रंथांत मिळतात. भारतरत्न डॉ. काणे यांनी सिद्ध केले की, राजा वसूने आरंभलेली परंपरा भौगोलिकदृष्ट्या भारतात पसरली.
४. विजयाचा नव्हे, तर संकल्पनेचा विस्तार !
राजा वसूचे ‘चेदी’ राज्य (आजचा बुंदेलखंड आणि मध्यप्रदेश यांचा भाग) भौगोलिकदृष्ट्या मर्यादित होते, तरीही हा सण संपूर्ण भारतात पसरला; कारण राजाच्या विजयापेक्षा त्यामागील संकल्पनेचा विस्तार झाला. इंद्राने राजा वसूला वर दिला की, जो कुणी राजा अशा प्रकारे ध्वज उभा करील, त्याच्या राज्यात समृद्धी येईल. मग इतर लहान-मोठ्या राजांनी गुढीपूजनाचे अनुकरण केले. त्यामुळे हा सण एका प्रदेशातून दुसर्या प्रदेशात पोचला.
संतांनी दिलेला आध्यात्मिक दृष्टीकोन !

अनेक संत आणि आध्यात्मिक गुरु यांनी गुढीपूजनाकडे ‘साधनेचा विजय’ या दृष्टीकोनातून पाहिले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ‘गुढी’ या शब्दाचा वापर मनावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून केला. ते म्हणतात की, एखादा साधक इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आत्मज्ञान प्राप्त करतो, तेव्हा तो ‘ज्ञानाची गुढी’ उभारतो. संत एकनाथांनी ‘गुढी हे अज्ञानावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे’, असे म्हटले. त्यांच्या मते, बाह्य गुढीपेक्षा अंतर्मनातील विकारांवर विजय मिळवून उभारलेली गुढी श्रेष्ठ आहे. नाथांनी ‘नामसंकीर्तना’चे महत्त्व सांगतांना म्हटले की, ज्या घरात हरिनामाचा गजर होतो आणि भक्तीची गुढी उभी रहाते, तिथे यमराजाचे भय उरत नाही. कर्माच्या कठीण पाशातून सुटण्यासाठी ‘नाम’ हीच विजयाची गुढी आहे. ‘संत समाजमनाला धर्माचरणाच्या टप्प्याकडून अध्यात्माकडे नेण्याचा प्रयत्न करतात आणि अशा कृतींच्या माध्यमातून ‘आपली खरी ओळख आाध्यात्मिक आहे’, हे लक्षात घ्यावे’, असे सांगून समाजजीवनाला आध्यात्मिकतेचे परिमाण देतात. यातून ‘असतो मा सद्गमय्’ (अर्थ : असत्याकडून मला सत्याकडे ने !), या उपनिषदातील वचनाप्रमाणे अनित्य जीवनाकडून नित्य जीवनाकडे जाण्याची दृष्टी लाभते. असे करणारी व्यक्ती गुढीपूजनासारखी धार्मिक कृती अधिक विकसित मनाने करते.
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत
५. योग्य पर्जन्य आणि समृद्धी यांसाठी गुढीपूजन
प्राचीन भारतात ‘इंद्र’ हा पाऊस आणि युद्धाचा देव म्हणून ओळखला जाई. ईशान्येकडील राज्यांपासून ते दक्षिणेपर्यंत जेथे पाऊस आणि शेती यांच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून होती, तिथे राजांनी पावसाला प्रसन्न करण्यासाठी ‘इंद्रध्वज’ (गुढी) उभारण्याची प्रथा स्वीकारली. वराहमिहिराने नमूद केले की, जर ध्वज सरळ उभा राहिला, तर त्या वर्षी राज्यात सुभिक्षा (भरभराट) होईल.
६. अन्य समाजव्यवहार
व्यापार, तीर्थयात्रा आणि कथाकार यांच्यामुळे राजा वसूची कथा अन् विजयाचे प्रतीक भारतात पसरले. दक्षिणेत या सणाला मोठे स्वरूप प्राप्त झाले, ते राजा शालिवाहन (सातवाहन वंशाचा राजा) याच्यामुळे ! त्याचे साम्राज्य दक्षिण आणि मध्य भारत येथे होते. त्याने जेव्हा शकांचा पराभव केला, तेव्हा याच प्राचीन परंपरेचा (गुढी उभारण्याचा) वापर करून विजय साजरा केला. ‘विजयाची गुढी’ ही संकल्पना भारतीय संस्कृतीच्या कृषी आणि राजधर्म या पायांशी जुळणारी असल्याने ती एका प्रदेशातून दुसर्या प्रदेशात सहजतेने प्रवाहित झाली.
७. गुढीपाडव्याचे अन्य भारतव्यापी सणांच्या तुलनेत विशेष महत्त्व !
भारतवर्षात दिवाळी, होळी या सणांच्या तुलनेत ‘गुढीपाडवा’ हा सर्वांत वरच्या स्थानी येतो; कारण तो काळाचा प्रारंभ दर्शवतो. ‘कालगणना’ आणि ‘सृष्टीचा प्रारंभ’ या अर्थाने ‘गुढीपाडवा’ सण ‘सर्व सणांचा पाया’ मानला जातो. डॉ. काणे यांनी स्पष्ट केले की, गुढीपाडवा भारताचा अत्यंत प्राचीन ‘राष्ट्रीय सण’ कृषी आणि समृद्धी यांच्याशी जोडलेला होता.
सण हे समाजाच्या आत्म्याचे प्रकटीकरण असतात. – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्भारतातील सण हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते देशाला एका सूत्रात बांधणारे ‘सांस्कृतिक दुवे’ आहेत. हे उत्सव प्रादेशिक सीमा ओलांडून भारतियांमध्ये एकतेची भावना निर्माण करतात. – पंडित जवाहरलाल नेहरूवरील दोन उद्गारांतून भारतीय सणांचे महत्त्व लक्षात येते. |
८. राष्ट्रीय सण ओळखण्याचा लाभ !
जेव्हा आपण ‘एखादा सण किंवा उत्सव ‘राष्ट्रीय’ आहे’, असे म्हणतो, तेव्हा त्यातून राष्ट्रजीवनाकडे पहाण्याची आपली दृष्टी पालटते. ही दृष्टी अनेकांमध्ये येते, तेव्हा राष्ट्रीय जीवन पालटते.
८ अ. सांस्कृतिक एकतेची जाणीव : जेव्हा एखादा सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या नावांनी; पण एकाच वेळी साजरा होतो, तेव्हा तो देशाला एका सूत्रात बांधतो. यामुळे ‘विविधतेत एकता’ ही भावना दृढ होते.
८ आ. कृषीचक्राची, पर्यायाने शेतीच्या महत्त्वाची जाणीव ! : मकरसंक्रांत, गुढीपाडवा, पोंगल किंवा बैसाखी अशा सणांना राष्ट्रीय महत्त्व आहे; कारण ते कृषीचक्राशी जोडलेले आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जेव्हा नवीन पीक येते, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था आणि आनंद त्याच्याशी जोडलेला असतो. हे सण अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे राष्ट्रीय माध्यम बनतात.
८ इ. ऐतिहासिक आणि पौराणिक परिचयाची जाणीव : गुढीपाडवा किंवा दसरा यांसारख्या सणांमागे परकीय आक्रमकांवरील विजय, उदा. शालिवाहन शक किंवा अन्यायावर न्यायाचा विजय (प्रभु श्रीराम) असे संदर्भ असतात. हे सण शौर्य आणि मूल्ये यांची आठवण करून देतात. ही मूल्ये राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असतात.
९. गुढीपूजन करणार्याने ‘राजा’ म्हणून राष्ट्रहिताची दृष्टी ठेवावी !
लोकशाहीत मतदार राजा आहे. त्यामुळे गुढीपूजन करणार्याने ‘राजा’ या नात्याने राष्ट्रहिताची दृष्टी ठेवत गुढीपूजन करावे. वरीलपैकी शक्य त्या सूत्रांचे भान ठेवत ‘समाजात सर्व प्रकारची समृद्धी यावी’, अशी प्रार्थना करत गुढी उभारूया.
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६६ वर्षे), एम्.डी. (मेडिसिन), सनातन आश्रम, रामनाथी आश्रम, गोवा. (५.३.२०२६)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?