‘प्रहार’ भारताचे पहिले सर्वसमावेशक आतंकवादविरोधी धोरण !

पुरस्कृत आतंकवादासह सर्व प्रकारच्या उदयोन्मुख धोक्यांपासून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी व्यापक धोरणात्मक प्रयत्नात भारताने स्वतःचे पहिले सर्वसमावेशक आतंकवादविरोधी धोरण ‘प्रहार’ घोषित केले आहे. हा धोरणात्मक सिद्धांत सीमेपलीकडील आतंकवाद, आतंकवादी कारवायासाठी पुरवण्यात येणारा निधी, वैचारिक उपदेश, सायबर धोका आणि इतर संघटित गुन्ह्यांविरुद्धच्या लढ्याला गती देतो. या धोरणात आतंकवादी अत्याचारांपासून देशाच्या महत्त्वाच्या आणि धोरणात्मक पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याच्या भारताच्या सिद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

१. राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक शांततेचे रक्षण करण्यासाठी भारताचे बहुस्तरीय धोरण

आतंकवादाविरोधातील स्वतःच्या अथक लढ्यात भारताने एक नवा अध्याय चालू केला आहे. पुरस्कृत आतंकवाद, संघटित गुन्हे, वैचारिक उपदेश आणि उदयोन्मुख धोक्यांचे इतर प्रकार यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक व्यापक आतंकवादविरोधी धोरण घोषित केले आहे. ‘प्रहार’ हे धोरण देशातील पहिला सर्वसमावेशक आतंकवादविरोधी सिद्धांत आहे, ज्याचा उद्देश केवळ ‘सीमापार आतंकवाद नष्ट करणे’, हा नाही, तर सायबर गुन्हे, ‘मालवेअर’ (संगणकातील माहिती चोरण्यासाठी सिद्ध केलेले सॉफ्टवेअर) आक्रमण, ‘ऑनलाईन फिशिंग’ (खोटी संकेतस्थळे निर्माण करून वापरकर्त्यांची माहिती मिळवणे) यांसारख्या आधुनिक तांत्रिक साधनांमध्ये अंतर्भूत असलेल्या धोक्यांचे इतर प्रकारही नष्ट करणे, हा आहे. हा सिद्धांत राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक शांततेचे रक्षण करण्यासाठी एक बहुस्तरीय धोरण आहे.

२. पुरस्कृत आतंकवाद आणि जिहादी यांच्या अत्याचारांना आळा घालण्याचे धोरण

भारत आतंकवादाचा संबंध कोणत्याही विशिष्ट धर्माशी, वांशिकतेशी, राष्ट्रीयतेशी किंवा संस्कृतीशी जोडत नाही, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या ‘प्रहार’ या आतंकवादविरोधी धोरणात म्हटले आहे; मात्र देश बर्‍याच काळापासून सीमापार आणि पुरस्कृत आतंकवादाचा पीडित आहे. जिहादी आतंकवादी संघटना, तसेच त्यांच्या आघाडीच्या संघटना त्यांची अवैध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारतात त्यांच्या नियोजनपूर्वक कारवाया आणि त्याची कार्यवाही करत आहेत, असे ‘प्रहार’विषयीच्या धोरणांमध्ये पुन्हा नमूद केले आहे.

अशा प्रकारे सीमेच्या दुसर्‍या बाजूने पसरलेल्या या जिहादी संघटनांविरुद्ध भारत लढा देत आहे. या दिशेने राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणे आणि प्रादेशिक किंवा जागतिक शांतता सुनिश्चित करणे, हे भारताचे उद्दिष्ट आहे. ‘प्रहार’चा धोरणात्मक सिद्धांत खरोखरच नवी आणि पुनरुज्जीवित दिशा प्रदान करतो अन् आतंकवादाचा नायनाट करण्याच्या भारताच्या संकल्पाला चालना देतो.

३. ‘प्रहार’मध्ये ‘अल कायदा’, ‘इसिस’ या जिहादी संघटनांच्या भयावहतेचा उल्लेख

इसिस, अल कायदा इत्यादी जागतिक स्तरावर कुप्रसिद्ध असलेल्या आणि जागतिक शांतता, सलोखा अन् स्थैर्य नष्ट करण्याचे सूत्रधार असलेल्या आतंकवादी संघटनांच्या अवैध कारवायांमुळे भारत आतंकवादाचा कसा पीडित ठरला आहे, हे ‘प्रहार’विषयीच्या धोरणांमध्ये स्पष्ट केले आहे. अल कायदा आणि इसिस यांसारख्या जागतिक आतंकवादी गटांचे लक्ष्य भारत राहिले आहे. हे गट ‘स्लीपर सेल’द्वारे (छुप्या गटांद्वारे) देशात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आतंकवादविरोधी धोरणात पुढे म्हटले आहे की, परदेशातून कार्यरत असलेल्या काही हिंसक जिहादी शाखांनी देशाच्या सामाजिक आणि राजकीय रचनेत अडथळा आणण्यासाठी त्यांच्या अवैध कार्यसूचीसह भारताच्या विरोधात कट रचले आहेत. आतंकवाद आणि सायबर धोके यांसारख्या संघटित गुन्ह्यांच्या इतर प्रकारांना प्रोत्साहन देऊन आतंकवादी संघटना भारताच्या विकासाच्या संभाव्यतेला हानी पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.

४. ‘टेक्नो-टेरेरिझम’ (तंत्रज्ञानांचा आतंकवादासाठी वापर) : आतंकवादी संघटनांसाठी नवे शस्त्र

घुसखोरी आणि इतर पारंपरिक माध्यमांद्वारे सीमापार आतंकवादाला दिशा देण्याव्यतिरिक्त आतंकवादी इतर नवीन मार्गांचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे भारतासाठी अधिक मोठी सुरक्षा आव्हाने निर्माण होत आहेत. या दिशेने ‘प्रहार’ धोरण या उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्याच्या साधनांवरही लक्ष केंद्रित करते. याला लोकप्रियपणे ‘टेक्नो आतंकवाद’, म्हणजे ‘आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी उदयोन्मुख तांत्रिक साधनांचा वा तंत्रज्ञानाचा वापर’, असे म्हटले जाऊ शकते. ‘पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथे आतंकवादाशी संबंधित कारवाया अन् आक्रमणे सुलभ करण्यासाठी सीमेपलीकडील आतंकवाद्यांना हाताळणार्‍या संघटना वारंवार ड्रोनच्या (मानवरहित हवाई वाहन) वापरासह नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करतात. देशात आतंकवादी आक्रमणे घडवून आणण्यासाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी आतंकवादी गट ‘लॉजिस्टिक्स’ (रसद पुरवणे) अन् भरतीसाठी संघटित गुन्हेगारी जाळ्यांमध्ये अधिकाधिक गुंतलेले आहेत’, असेही धोरणात म्हटले आहे.

५. समाजमाध्यमे आणि अन्य मंचांचा वापर करून निष्पापांना आतंकवादासाठी प्रवृत्त करणे

आतंकवादविरोधी धोरणात जिहादी संघटना सामाजिक माध्यमे आणि इतर नवीन मंचांचा वापर संवाद साधण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आणि आतंकवादी हेतू पूर्ण करण्यासाठी निष्पाप मनांना कसे प्रवृत्त करते, हेही स्पष्ट केले आहे. आतंकवादी संघटनांकडून भरतीसाठी, जिहादी विचारसरणींना दिशा देण्यासाठी आणि आतंकवादी आक्रमणांना निधी, मार्गदर्शन अन् समन्वय साधण्यासाठी सामाजिक माध्यमे, तसेच इतर ‘इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन्स’चा (त्वरित संदेश पाठवण्याची यंत्रणा) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. संदेशाचे कूटबद्ध स्वरूप, ‘डार्क वेब’, ‘क्रिप्टो वॉलेट’ यांसारख्या इतर प्रगत तांत्रिक गोष्टी आतंकवाद्यांद्वारे निधी गोळा करण्यासाठी, एकत्रितपणे कार्य करण्यासाठी आणि सुरक्षा रडारपासून वाचण्यासाठी वापरल्या जातात. आतंकवादी संघटना आधुनिक तंत्रांपासून सुरक्षित रहाण्यासाठी आणि धोका निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विविध नवकल्पनांचा कसा गैरवापर करतात, हे ‘प्रहार’विषयीच्या कागदपत्रांत नमूद केले आहे.

६. महत्त्वाची शस्त्रे आतंकवाद्यांच्या आवाक्याबाहेर असणे महत्त्वाचे !

‘प्रहार’च्या धोरणामध्ये सर्व प्रकारच्या आतंकवादाचा सामना करण्यासाठीची धोरणे आणि उपायही समाविष्ट आहेत. या धोरणामध्ये असे म्हटले आहे की, सर्व प्रकारची शस्त्रे म्हणजे ‘केमिकल’, ‘बायोलॉजिकल’, ‘रेडिओलॉजिकल’, ‘न्यूक्लियर’, ‘एक्सप्लोझिव्ह’ आणि ‘डिजिटल’ ही आतंकवाद्यांच्या आवाक्याबाहेर ठेवली पाहिजेत. या शस्त्रांचे संरक्षण करणे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व आहे, जेणेकरून कुख्यात आतंकवादी गट त्यांचा वापर अवैध हेतूंसाठी वा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यासाठी करू शकणार नाहीत.

७. ड्रोन आणि रोबोटिक्स यांचा गैरवापर न करण्याविषयी सतर्क असण्याची आवश्यकता !

कुठल्याही प्राणघातक हेतूंसाठी ड्रोन आणि ‘रोबोटिक्स’ यांचा गैरवापर करणार्‍या घटकांचा धोका हा चिंतेचा आणखी एक विषय आहे. अशा प्रकारे ‘प्रहार’चे धोरण आतंकवादी संघटनांद्वारे धोरणात्मक शस्त्रांचा गैरवापर आणि इतर तांत्रिक प्रगती यांच्याविषयी चिंता व्यक्त करते. जागतिक शांतता आणि सुरक्षितता यांना हानी पोचवणारा असा गैरवापर रोखण्यासाठी जगातील सर्व सरकारे अन् इतर संघटना यांनी वचनबद्ध, तसेच सतर्क राहिले पाहिजे.

(क्रमशः)

लेखिका : प्रगती कोवंडीन्या (साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)

संपादकीय भूमिका

आतंकवादाच्या विरोधात सिद्ध केलेले ‘प्रहार’ धोरण प्रभावीपणे कार्यवाहीत आणून जिहाद्यांचे समूळ उच्चाटन करायला हवे !

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019638.html