‘प्रहार’ राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी धोरणात्मक सिद्धांत !

पुरस्कृत आतंकवादासह सर्व प्रकारच्या उदयोन्मुख धोक्यांपासून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी व्यापक धोरणात्मक प्रयत्नात भारताने स्वतःचे पहिले सर्वसमावेशक आतंकवादविरोधी धोरण ‘प्रहार’ घोषित केले आहे. हा धोरणात्मक सिद्धांत सीमेपलीकडील आतंकवाद, आतंकवाद्यांना पुरवण्यात येणारा निधी, वैचारिक उपदेश, सायबर धोका आणि इतर संघटित गुन्ह्यांविरुद्धच्या लढ्याला गती देतो. या धोरणात १७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक शांततेचे रक्षण करण्यासाठी भारताचे बहुस्तरीय धोरण, ‘टेक्नो-टेरेरिझम’ (तंत्रज्ञानांचा आतंकवादासाठी वापर) : आतंकवादी संघटनांसाठी नवे शस्त्र अन् महत्त्वाची शस्त्रे आतंकवाद्यांच्या आवाक्याबाहेर असणे आवश्यक’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019245.html

८. आतंकवादाचा सामना करण्यासाठी कायदेशीर तज्ञांची भूमिका

‘प्रहार’च्या धोरणात पुढे आतंकवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी कायदेशीर तज्ञांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. आतंकवादाच्या गुन्हेगारांना उत्तरदायी धरण्यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरावरील कायदेशीर तज्ञांनी सक्रीय भूमिका बजावली पाहिजे. स्थानिक पोलिस ठाण्यांपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट करणे, आतंकवाद्यांच्या आवाक्यापासून शस्त्रांचे संरक्षण करणे आणि शेवटी आतंकवाद्यांना न्यायालये किंवा न्यायालयीन अधिकार्‍यांसमोर चौकशी करून खटला चालवण्यासाठी उपस्थित करणे इथपर्यंत कायदेशीर तज्ञांना मार्गदर्शन करावे लागते.

९. आतंकवादाचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील आतंकवादाचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक स्तरावर समन्वय अन् प्रयत्न कसे महत्त्वाचे आहेत, हेही ‘प्रहार’ धोरण अधोरेखित करते. अशा प्रकारे हे धोरण आतंकवादाचा सामना करण्यासाठी एक समग्र आणि बहुस्तरीय दृष्टीकोन आहे, जिथे समाजातील प्रत्येक भागधारक हा धोका नष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अलीकडच्या काळात आतंकवादी गटांना स्थानिक संस्कृती, भूप्रदेशाची चांगली जाणीव आहे आणि ते स्थानिक लोकांशी संबंध प्रस्थापित करतात. त्यामुळे त्यांना आतंकवादी कारवाया सहजपणे वाढवण्यास साहाय्य होते. दुसरीकडे आतंकवादाने राष्ट्रीय सीमा ओलांडल्या असून तो आंतरराष्ट्रीय धोका आहे.

१०. संघटित गुन्ह्यांचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे !

आतंकवादी संघटनांना परदेशी संघटनांकडून निधी मिळतो आणि ते स्थानिक लोकांच्या साहाय्याने आक्रमणे करतात. अशा प्रकारे आतंकवादाचा सामना करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न आणि समन्वय तितकाच महत्त्वाचा आहे. तळागाळातील समुदायांच्या पाठिंब्यापासून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयापर्यंत आतंकवाद अन् इतर संघटित गुन्ह्यांचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक हितधारक महत्त्वपूर्ण आहे.

११. स्थानिक लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याविषयी धोरणात्मक सिद्धांत

आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सहकार्यासह राष्ट्रीय कृती हे आतंकवादाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठीचे प्रमुख घटक आहेत, असे ‘प्रहार’च्या धोरणात म्हटले आहे. कट्टरतावाद, आतंकवादी हिंसाचार इत्यादींच्या प्रतिकूल परिणामांविषयी स्थानिक लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात स्वयंसेवी संस्था, नागरी समाज, समुदाय आणि धार्मिक नेते यांची भूमिका हा धोरणात्मक सिद्धांत पुढे अधोरेखित करतो, जेणेकरून लोक आतंकवादी अत्याचारांपासून सुरक्षित रहातील.

१२. आतंकवादाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताची सिद्धता 

सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील आतंकवादाचा सामना करण्यासाठी भारताचा पहिला सर्वसमावेशक धोरणात्मक सिद्धांत म्हणून ‘प्रहार’ धोरण देशाच्या बहुआयामी सज्जतेवर प्रकाश टाकते. या धोरणात म्हटले आहे, ‘भारताला सर्व आघाड्यांवरून, म्हणजेच पाणी, भूमी आणि हवा अशा विविध ठिकाणांहून आतंकवादाच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकारे भारताच्या धोरणात्मक भूप्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला बळकटी देण्यासाठी पायाभूत सुविधा स्तरावर महत्त्वपूर्ण क्षमता काटेकोरपणे विकसित केल्या जात आहेत.’

१३. महत्त्वाच्या क्षेत्रांना आतंकवादापासून वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न 

अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांना आतंकवादी अत्याचारांपासून वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत. यामध्ये ऊर्जा क्षेत्र, रेल्वे, संरक्षण आस्थापने आणि पायाभूत सुविधा, अणूऊर्जा केंद्रे, विमानतळ, बंदरे, अंतराळ क्षेत्र अन् राज्य-बिगर राज्य घटकांशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा समावेश आहे. पारंपरिक धोके आणि सायबर गुन्हेगारी, ‘मालवेअर’ (संगणकातील माहिती चोरण्यासाठी सिद्ध केलेले ‘सॉफ्टवेअर’) आक्रमण इत्यादींसारख्या इतर नवीन धोक्यांपासून संरक्षण निश्चित करणे आवश्यक आहे.

१४. आतंकवाद निर्मूलनावर भर

पायाभूत सुविधा क्षमता निर्माण करण्याव्यतिरिक्त देशातील जनतेवर, विशेषतः कट्टरतावाद आणि इतर आतंकवादी हेतूंसाठी सर्वांत असुरक्षित मानल्या जाणार्‍या तरुणांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे अन् जागरूकता वाढवण्यासाठी, तसेच त्यांना कट्टरतावादापासून वाचवण्यासाठी रचनात्मकपणे गुंतवले पाहिजे. तुरुंगातील बंदीवान कोणत्याही कट्टरतावादी किंवा राष्ट्रविरोधी हेतूंसाठी असुरक्षित नसावेत, यासाठी कारागृहातील कर्मचार्‍यांनाही वेळोवेळी सावध केले जाते. तुरुंगात असलेल्या लोकांसाठी कट्टरतावादनिर्मूलन कार्यक्रमही चालू करण्यात आले आहेत, असे ‘प्रहार’विषयीच्याधोरणात म्हटले आहे.

१५. आतंकवादविरोधी संस्थांचे संचालन करणे, हा ‘प्रहार’ धोरणाचा उद्देश !

दीर्घकाळासाठी ‘प्रहार’ धोरणाचा उद्देश देशभरात एकसमान, पद्धतशीर आणि प्रमाणित आतंकवादविरोधी संस्थांचे संचालन करणे, हा आहे. भारतातील प्रत्येक राज्यात समान नियम आणि कार्यपद्धत कार्यवाहीत आणल्या पाहिजेत, जेणेकरून आतंकवादी आक्रमणांच्या विरोधात समन्वयाने आणि समान क्रमाने लढा देणे शक्य होईल. राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा बंदिस्त अवस्थेत काम करणार नाहीत. भारत सर्व आतंकवादी कृत्यांना गुन्हेगारीचे ठरवतो आणि आतंकवादी, त्यांचे वित्तपुरवठादार, शस्त्रे अन् त्यांना सुरक्षित आश्रय देणारे समर्थक यांना प्रवेश नाकारतो. अशा प्रकारे ‘प्रहार’ धोरणामुळे भारत आतंकवादाविषयी शून्य सहिष्णुतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी, तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता उंचावण्यासाठी अधिक जोमाने अन् दृढनिश्चयाने मार्गक्रमण करण्यासाठी एक नवीन, तसेच पुनरुज्जीवित अध्याय रचत आहे.’

(समाप्त)

लेखिका : प्रगती कोवंडीन्या

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)