‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेतील साधकांकडून काळानुसार वेगवेगळे नामजप कसे करून घेतले ?’, ते या लेखात पाहू.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘कुलदेवतेचा, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगणे
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधकांनी साधनेला आरंभ केला, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक आणि जिज्ञासू यांना ‘कुलदेवते’चा, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. हे नामजप करत असतांना साधकांना पुष्कळ अनुभूती आल्या. त्यामुळे साधकांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली.
२. साधकांचे आध्यात्मिक त्रास वाढल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सप्तदेवतांपैकी कोणत्या देवतेच्या नामजपाने त्रास होतो ?’, हे शोधायला शिकवून तो नामजप करण्यास सांगणे
साधारण वर्ष २००१ ते वर्ष २००४ या कालावधीत साधकांचे आध्यात्मिक त्रास वाढले. त्यामुळे गुरुमाऊलींनी ‘सप्तदेवतांपैकी कोणत्या देवतेच्या नामजपाने त्रास होतो ?’, हे शोधायला शिकवले आणि त्या देवतेचा नामजप करण्यास सांगितला. या माध्यमातून वाईट शक्तींनी साधकांमधील ज्या देवतांचे तत्त्व न्यून केले होते, ते तत्त्व त्यांना मिळू लागले. हा काळ खडतर होता. काही साधकांमधील वाईट शक्तीचा त्रास पुष्कळ प्रमाणात वाढत होता; पण या नामजपाने वाईट शक्तींवर नियंत्रण मिळवणे सुलभ होत होते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवर बिंबवलेली स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया
३ अ. वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी गुरुमाऊलींनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्यास सांगणे : ‘साधकांना होणार्या वाईट शक्तींच्या त्रासांमागे साधकांचे स्वभावदोषही कारणीभूत आहेत आणि वाईट शक्ती ते स्वभावदोष वाढवत आहेत’, हे गुरुमाऊलींच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी साधकांना वर्ष २००२ – २००३ मध्ये स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकवली अन् ती सातत्याने राबवण्यास सांगितली.
३ आ. साधकांना नामजपामुळे आध्यात्मिक बळ आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे मानसिक बळ मिळणे : उच्च देवतांचा नामजप केल्यामुळे साधकांना आध्यात्मिक बळ मिळाले, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे त्यांना मानसिक बळ मिळाले अन् साधकांच्या साधनेतील मोठे अडथळे दूर होऊ लागले. (स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया अद्यापही बरेच साधक राबवत आहेत.)
४. गुरुदेवांनी साधकांना ‘ॐ गं गणपतये नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।’ हा नामजप सामूहिकरित्या करण्यास सांगणे
‘श्री गणपति आणि श्रीकृष्ण’ या देवतांचे तत्त्व साधकांना मिळावे’, यासाठी गुरुमाऊलींनी श्री गणेशाचे चित्र किंवा सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती यांच्या समोर बसून किंवा प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर बसून ‘ॐ गं गणपतये नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।’ हा नामजप मारक स्वरात सामूहिकरित्या करून घेतला. (हा ‘एक-आड-एक’ नामजप वर्ष २००१ पासून चालू झाला.)
रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करण्यास सांगणे

महाशिवरात्री (१५ फेब्रुवारी २०२६) या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करायला सांगितला. – संपादक
५. स्वतः ध्यानाला बसण्याच्या वेळांत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना नामजप करण्यास सांगणे
त्यानंतर साधारण वर्ष २००६ ते २००८ या काळात ‘समष्टी साधनेत येणारे अडथळे दूर व्हावेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वतः सकाळी ७.१५ ते ७.४५ आणि दुपारी ४.३० ते सायंकाळी ५ या वेळेत नामजप करण्यास बसत असत. त्या वेळेत साधकही नामजपाला बसत.
६. साधकांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करण्यास सांगणे
वर्ष २००८ ते २०१० या काळात ‘धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी साधकांना श्रीकृष्णतत्त्व मिळावे’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सर्व साधकांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा नामजप करण्यास सांगितला.
७. आकाशदेवतेचा नामजप करण्यास सांगणे
वर्ष २००८ आणि वर्ष २००९ या काळात गुरुमाऊलींनी साधकांना पंचमहाभूतांपैकी श्रेष्ठ अशा आकाशदेवतेचा नामजप, म्हणजे ‘श्री आकाशदेवाय नमः ।’ हा जप करण्यास सांगितला.
८. ‘पितृपक्षात साधकांना पूर्वजांचे त्रास हाेऊ नयेत’, यासाठी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप प्रतिदिन एक घंटा करण्यास सांगणे
गुरुमाऊलींनी साधकांना ‘पितृपक्षात पूर्वजांचे त्रास होऊ नयेत’, यासाठी नियमित करावयाच्या नामजपासह ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’, हा नामजप प्रतिदिन एक घंटा करण्यास सांगितला.
९. प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधून ते करण्यास सांगणे
‘साधकांची पंचमहाभूतांवरील श्रद्धा वाढावी आणि त्यांच्या माध्यमातून साधना व्हावी’, यासाठी गुरुमाऊलींनी वर्ष २०१५ मध्ये प्राणशक्तीवहन उपाय पद्धतींनुसार साधकांना नामजपादी उपाय शोधायला शिकवले आणि ते करण्यास सांगितले.
१०. सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्यानुसार ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जय मे जयम् । जय गुरुदेव ।’, असा नामजप करून घेणे
वर्ष २०१६ मध्ये सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे साधकांना ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जय मे जयम् । जय गुरुदेव ।’ हा नामजप करण्यास सांगितला. जीवनाडीपट्टीत सप्तर्षींनी पुढील उल्लेख केला, ‘हा जप अधिकाधिक केल्यावर आम्ही साधकांच्या प्रत्येक त्रासाचे मूळच नष्ट करणार आहोत. अनेक मंत्रजप आहेत; परंतु ज्या नामजपाने देव अधिक आणि लवकर जवळ येतील (प्रसन्न होतील), तोच नामजप आम्ही करण्यास सांगितला आहे. हा नामजप करतांना ‘एखादे मूल जसे आईला आर्ततेने आणि जिव्हाळ्याने हाक मारते’, तशीच साद देवाला घाला. देव लवकर येईल.’ (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६) या माध्यमातून साधकांना निसर्गदेवतेचा आशीर्वाद मिळाला.
काळानुसार सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सप्तर्षी जे नामजप करायला सांगतात, ते सर्व नामजप गुरुदेव साधकांना करायला सांगतात.
११. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेले निर्गुण स्तरावरील नामजप
११ अ. ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ हे निर्गुण स्तरावरील नामजप शोधून ते करण्यास शिकवणे : जशी साधकांची साधना वाढत आहे, तसतशी पाताळांतील वाईट शक्तींची आक्रमणेही वाढत आहेत. त्यामुळे गुरुमाऊलींनी ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार पंचमहाभूतांच्या पुढील, म्हणजे ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुण स्तरावरील नामजपांतून स्वत:ला उपयुक्त नामजप कोणता, हे शोधून तो करण्यास सांगितले.
११ आ. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ ‘ॐ निर्विचार’ आणि ‘निर्विचार’ या ३ नामजपांपैकी १ नामजप करण्यास सांगणे : गुरुमाऊली साधकांचा साधनेचा प्रवास हळूहळू सगुणातून निर्गुणाकडे करून घेत आहेत. त्यामुळे वर्ष २०२१ मध्ये त्यांनी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ ‘ॐ निर्विचार’ आणि ‘निर्विचार’, या ३ नामजपांपैकी १ नामजप करण्यास सांगितला.
१२. ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र दिवसातून केव्हाही १०८ वेळा म्हणण्यास सांगणे
ऑक्टोबर २०२५ पासून काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धकाळात ‘श्रीकृष्ण’ आणि रामराज्यासाठी ‘श्रीराम’ या दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी साधकांना प्रतिदिन ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र दिवसातून केव्हाही १०८ वेळा म्हणण्यास सांगितला आहे.
प्रत्येक क्षणाला साधकांची एवढी काळजी घेणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘आपला श्वास केवळ गुरुदेवांमुळेच आहे’, हे सूत्र मनात कोरून ठेवूया आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करत राहूया !
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेली ही शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी समर्पित करतो.’
– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे समष्टी संत, वय ७५ वर्षे) (२१.१२.२०२५)
| वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !