युद्धकाळात नागरिकांनी कसे वागावे ?

सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण-अमेरिका आणि इस्रायल, रशिया-युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पडली आहे. अन्य छोट्या मोठ्या देशांतही युद्धे चालूच आहेत. एकूण स्थिती पहाता भारतालाही या युद्धात केव्हाही उडी घ्यावी लागू शकते किंवा किमान स्वसंरक्षणार्थ तरी शस्त्र हाती घ्यावे लागू शकते. एकूणच काय, तर तिसरे महायुद्ध केव्हा चालू होईल, हे सांगता येत नाही, किंबहुना ‘चालू झाले’, असे म्हणायलाही हरकत नाही. या युद्धजन्य स्थितीत भारतीय शासन आणि सैन्य त्यांची कर्तव्ये चोख पार पाडतील, यात शंका नाही. या परिस्थितीत राष्ट्राचे नागरिक म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करून आपण आपल्या शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आणि सैन्यावर अधिक भार पडू नये, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक ठरते. ते प्रयत्न म्हणजे नेमके काय करावेत, हे आपण कुठेतरी वाचले वा ऐकले असेल. अशा काही सूत्रांची उजळणी या लेखात करत आहोत.

परस्परांतील वाद विसरून संघटितपणे शत्रूला तोंड देणे आवश्यक ! 

देश संकटात असतांना नागरिकांनी कशा प्रकारे वागावे, याविषयी हिंदु धर्मशास्त्रात अत्यंत स्पष्ट मार्गदर्शक विचार मांडले आहेत. महाभारताच्या काळात पांडव वनात असतांना त्यांना हिणवण्यासाठी त्यांच्या शोधार्थ कौरव वनात आले होते. एके ठिकाणी गंधर्व विहार करत असतांना कौरवांनी त्यांच्याशी वाद घातला. तेव्हा चित्रसेन गंधर्वाने कौरवांना बांधून ठेवले. या बिकट प्रसंगात कौरव सेनेने पांडवांचे साहाय्य मागितले, तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने भीम आणि अर्जुन यांना गंधर्वांशी लढायला पाठवले अन् कौरवांची सुटका केली. तेव्हा युधिष्ठिराने भीम आणि अर्जुन यांना दृष्टीकोन देतांना सांगितले, ‘वयम् पंचाधिकम् शतम् ।’, म्हणजे ‘जेव्हा आपापसांत वाद आहे, तेव्हा ५ पांडव आणि १०० कौरव वेगवेगळे आहेत; परंतु जेव्हा एखादा बाह्य शत्रू आक्रमण करतो, तेव्हा आम्ही १०५ जण आहोत.’ या तत्त्वाप्रमाणे आज आपल्यात कितीही अंतर्गत वाद असले, तरी या वादांचा लाभ शत्रूला घेऊ न देणे श्रेयस्कर असते. या दृष्टीने नागरिकांनी स्वतःचे घरगुती वाद बाजूला ठेवून देश रक्षणासाठी संघटित झाले पाहिजे. जेव्हा शत्रू चालून येतो, तेव्हा घरातील कलह विसरून संपूर्ण समाजाने एका वज्रमुठीप्रमाणे उभे रहावे. युद्धकाळात नागरिकांनी ‘समाजात फूट पडेल’, असे कोणतेही कृत्य करू नये. उलट सर्वांच्या कल्याणासाठी एकत्रित योगदान द्यायला हवे. ‘आपण सर्वांनी मिळून चालावे, एकमुखाने बोलावे आणि सर्वांचे विचार एक असावेत’, असे आचरण अपेक्षित असते. या दृष्टीने युद्धकाळात जात-धर्म विसरून एक ‘भारतीय’ म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.

व्यक्तीगत हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे ! 

जेव्हा राष्ट्रावर संकट येते, तेव्हा वैयक्तिक हितापेक्षा ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ मानले जाते. त्यामुळे स्वतःच्या किरकोळ मागण्या तात्पुरत्या बाजूला ठेवायला हव्यात; कारण त्या मागण्यांचा अतिरिक्त मानसिक भार शासनावर येऊ शकतो. हिंदु दर्शनानुसार ‘व्यक्ती ही समाजाचा एक छोटा भाग आहे. जर समाज किंवा राष्ट्रच सुरक्षित नसेल, तर व्यक्तीचा स्वार्थ कधीच पूर्ण होऊ शकत नाही’, उदाहरणार्थ जर एखाद्या नौकेला छिद्र पडले असेल, तर त्यातील प्रवाशाने स्वतःचे सामान वाचवण्यापेक्षा आधी ते छिद्र बुजवण्यास साहाय्य करणे महत्त्वाचे आहे. जर नौका बुडाली, तर त्याचे सामानही वाचणार नाही, तसेच जर राष्ट्र संकटात असेल, तर नागरिकाची संपत्ती आणि सुख सुरक्षित राहू शकणार नाहीत. या अनुषंगाने ‘राष्ट्र कसे टिकेल ?’, याचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा. आपल्या वैयक्तिक सुख-सोयी किंवा भीती यांपेक्षा देशाचे रक्षण करणे महत्त्वाचे असते; कारण राष्ट्र टिकले, तर आपण आपल्यासाठी कधीही संपत्ती गोळा करू शकतो किंवा शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी नंतर कधीही आग्रही राहू शकतो.

प्रत्येकाने देशासाठी मी काय करू शकतो, याचे चिंतन करावे !

काहींना वाटू शकेल, ‘माझे वय अधिक आहे किंवा मी रुग्णाईत आहे, माझी शारीरिक क्षमता नाही, तर आम्ही देशासाठी काय करणार ?’, अशी चिंता करणे व्यर्थ आहे. आपण देशाचे सैन्य, स्वतःचा देश, देशाचे नागरिक, देशाची संपत्ती सुरक्षित रहावी आणि सैनिकांना युद्धासाठी बळ मिळावे, यांसाठी भगवंताच्या चरणी अखंड प्रार्थना अन् नामजप करणे, हे सर्वांत मोठे योगदान आहे.

आपल्या उपासनेमुळे सैन्य आणि देश यांना आध्यात्मिक बळ प्राप्त होऊन भगवंताच्या कृपेने त्यांचे रक्षण होईल. अर्थात् यासाठी आपल्याला युद्ध चालू होण्याची वाट पहायला नको. हे योगदान आपण आजपासून नव्हे, तर आतापासून आरंभ करू शकतो. कितीही उपाययोजना केल्या आणि कर्तव्ये पार पाडायची ठरवले, तरी मानवी प्रयत्नांना मर्यादा आहेत. केवळ भगवंताच्या कृपेनेच स्वतःचे रक्षण होऊ शकते. त्यासाठी त्याच्या चरणी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे !

युद्धकाळात काय करावे ? →

👍’भारतीय’ म्हणून एकत्र येणे आवश्यक !
👍पाणी, वीज, अन्न यांचा जपून वापर करा !
👍रक्तदान करणे, तसेच अन्न, औषधे आणि अन्य साहाय्य पुरवा !
👍शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करा !
👍राष्ट्रहितासाठी वैयक्तिक गोष्टींचा त्याग करा !

युद्धकाळात काय करू नये ? →

👎’समाजात फूट पडेल’, असे कोणतेही कृत्य करू नये !
👎अफवा पसरवू नका !
👎साठेबाजी करू नका !
👎आपत्कालीन स्थितीत अनावश्यक गर्दी करू नका !
👎कायद्याचा भंग करून समाजद्रोह करू नका !

समाजाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक ! 

युद्धकाळात जेव्हा देश संकटात असतो, तेव्हा प्रत्येक नागरिकाने स्वतःला नेमून दिलेले दायित्व, उदा. डॉक्टर, सैनिक, शेतकरी किंवा सामान्य नागरिक म्हणून चोख पार पाडणे, हाच धर्म आहे. संकटाच्या वेळी संभ्रमात न पडता ‘राष्ट्रसेवा’ हेच स्वतःचे मुख्य ध्येय मानून कार्य करायला हवे. आपण ज्या समाजात रहातो, त्याचे विविध प्रकारचे ऋण आपल्यावर असते. समाज म्हणजे आपले मोठे कुटुंबच असते. संकटकाळात मनोबल खचल्याने समाज धैर्य गमावतो, डगमगून जातो. तेव्हा आपण स्वतः स्थिर राहून समाजाला धीर द्यायला हवा. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कौशल्य असतेच. युद्धकाळात हे कौशल्य निरपेक्षपणे देशहितासाठी वापरले पाहिजे, उदाहरणार्थ एखाद्याकडे रुग्णांची सुश्रुषा करण्याचे कौशल्य आहे, तर त्याने युद्धात घायाळ नागरिकांना साहाय्य करायला हवे. काहींना वाहने चालवता येतात, त्यांनी नागरिकांना एका ठिकाणावरून अन्य ठिकाणी नेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यायला हवा.

‘वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : पृथ्वी हे माझे कुटुंब आहे.)’, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, तसेच ‘एकमेका साहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ।।’, असेही म्हटले आहे. या दोन्ही वचनांनुसार समाजातील सर्व घटकांनी एकमेकांना साहाय्य करावे. वैद्य, शेतकरी, धान्याचे व्यापारी इत्यादींचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील विषयांचा चांगला अभ्यास असतो. अशी मंडळी आपल्या ज्ञानाचा उपयोग गरजूंच्या साहाय्यासाठी करू शकतात, उदा. वैद्य औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी, शेतकरी फळे, भाज्या इत्यादींच्या लागवडीविषयी, तर धान्याचे व्यापारी अन्नधान्याच्या उत्तम साठवणुकीविषयी गरजूंना सांगू शकतात.

राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करावे !

युद्धकाळात देशाच्या साधनसंपत्तीचे रक्षण करणे, हे केवळ सरकार वा सैन्य यांचेच नाही, तर प्रत्येक नागरिकाचेही दायित्व आहे. आर्य चाणक्य यांनी राष्ट्राच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते ‘राष्ट्रावर संकट येण्यापूर्वीच त्याची चाहूल नागरिकांना लागली पाहिजे आणि त्यांनी सावध राहिले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने शत्रूच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये’; पण सद्यःस्थितीत भारतात तर गल्लोगल्ली राष्ट्रघातकी दुष्प्रवृत्ती आहेत. या दुष्प्रवृत्ती युद्धकाळात गृहयुद्ध चालू करू शकतात. अशा वेळी भारतीय सैनिकांवर दुहेरी ताण येऊ शकतो, या दृष्टीने नागरिकांनीही देशाच्या मालमत्ता आणि जनता यांचे रक्षण करण्याचे दायित्व यथाशक्ती उचलायला हवे.

अधर्माचा त्याग करावा !

युद्धकाळात गरजेपेक्षा अधिक वस्तू साठवून न ठेवणे, दुसर्‍याच्या वाट्याचे अन्न किंवा संसाधने हिरावून न घेणे, हा सामान्य मानवधर्म आहे. युद्धकाळात नागरिकांनी केवळ आवश्यक गोष्टींचाच संग्रह करायला हवा. संकटकाळात स्वार्थासाठी साठेबाजी करणे किंवा महागाई वाढवणे, हे ‘अधर्मा’चे लक्षण मानले गेले आहे. त्यामुळे अशा काळात नागरिकांनी या गोष्टी टाळून नीतीमान रहाणे अत्यंत आवश्यक आहे. अशा काळात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येतात आणि नागरिकांमध्ये निष्कारण असुरक्षितता पसरते. युद्धाविषयी किंवा अन्य घटनांसंबंधी योग्य माहिती नसतांना ती इतरांना सांगणे आपण स्वतः टाळावे आणि लोकांनाही तसे न करण्यास सांगावे.

नेमके धर्मपालन कोणते, हे समजून घ्यावे !

एका प्रसंगात सुलतानी आक्रमण झाले, तेव्हा नानासाहेब पेशवे देवपूजा करत होते. तेव्हा त्यांचे सेनापती मल्हारराव होळकर यांनी त्यांना काळाची आवश्यकता म्हणून तूर्तास देवपूजा बाजूला ठेवून तलवार हाती घेण्याची विनंती केली होती. त्या वेळी मराठा साम्राज्याच्या रक्षणासाठी पेशव्यांनी पुढाकार घेऊन मोहिमेचे नेतृत्व घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे ‘जेव्हा सामान्य काळ न रहाता युद्धासारखे एखादे मोठे संकट येते, तेव्हा स्वत:चे प्रतिदिनचे नियम बाजूला ठेवून देश आणि समाज यांचे रक्षण करणे’, हेच सर्वोच्च कर्तव्य ठरते. ‘स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेणे’, हा धर्म मानला जातो. ‘जेव्हा मातृभूमी संकटात असते, तेव्हा तिचे रक्षण करणे’, हाच प्रत्येक नागरिकाचा सर्वांत मोठा धर्म मार्ग ठरतो. ‘भगवद्गीते’तही हेच सांगितले आहे, ‘अर्जुनाला आपल्याच बांधवांशी लढण्याविषयी संभ्रम निर्माण झाला. तेव्हा भगवंताने अर्जुनाला युद्ध करण्यासाठीच मार्गदर्शन केले. तोच क्षत्रिय धर्म आहे’, हे परखडपणे सांगितले.

नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित ! 

महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला संकटकाळी नागरिकांचे विविध उत्तरदायित्व सांगितले आहे. जेव्हा देश संकटात असतो, तेव्हा नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वावर, म्हणजे राजा किंवा शासन यांवर विश्वास ठेवून त्यांना पूर्ण सहकार्य करायला हवे. अशा वेळी समाजात अराजकता पसरू नये, यासाठी नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळली पाहिजे. श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या देशात मागे नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्कालीन साहाय्य पोचल्यावर तेथे लोकांची एकच झुंबड उडाली. काही लोकांनी बेशिस्त वर्तन केले. असे आपल्या देशात होऊ देता कामा नये. उलट आपले शासन युद्धजन्य परिस्थितीतील निर्णय घेण्यास व्यग्र असल्याने गरजू नागरिक आणि सैनिक यांच्यासाठी रक्तदान करणे; अन्न, औषधे आणि अन्य साहाय्य पुरवणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरते.

शासनाचे आदेश पाळण्याची सवय आतापासून लावून घ्या !

श्री. योगेश जलतारे

युद्धकाळात शासन वेळोवेळी काही नियम किंवा आदेश प्रसारित करत असते. ‘त्यांचे पालन काटेकोरपणे होईल’, हे पहायला हवे. असे न केल्यास जीवितहानी होऊ शकते. काश्मीरमधील पहलगाम येथील आक्रमणानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू केले, तेव्हा पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात व्यवसायाने डॉक्टर असलेला एक भारतीय नागरिक ठार झाला होता. त्याने बाहेर न पडण्याची सूचना असूनही घराच्या अंगणात येऊन भ्रमणभाषवर कुणाशी तरी संपर्क साधला आणि हीच वेळ शत्रूने साधून त्याचा घात केला. युद्धकाळात असा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो, हे या उदाहरणातून लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचे पालन केल्यास गदारोळ होणार नाही.

हिंदु धर्मशास्त्रानुसार ‘राष्ट्र’ हे केवळ एक भूखंड नसून एक दैवत आहे. या अंगाने देशावर युद्धसदृश संकट, म्हणजे आपल्या दैवतावर संकट आल्यासारखे आहे. अशा वेळी स्वार्थ त्यागून पूर्ण शक्तीनिशी राष्ट्राच्या पाठीशी उभे रहाणे, हे नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. ‘धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ।’, असे शास्त्रवचन आहे. याचा अर्थ आहे, ‘जो अधर्माने वागतो, त्याचा नाश होतो, तर जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म (ईश्वर) रक्षण करतो.’

समाजव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी शासनाने घालून दिलेली नियमावली धर्मपालन म्हणून आचरणात आणल्यास ती शिस्तच युद्धकाळात देशाचे, पर्यायाने स्वतःचे निश्चितच रक्षण करील.

नागरी शिस्त पाळणे अत्यावश्यक ! 

सार्वजनिक शिस्तीचा अभाव, हे भारतातील नागरिकांचे मोठे अपयश आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त नागरिकांना लावण्यासाठी शासनाला शिक्षापद्धतीचा अवलंब करावा लागतो. अगदी नजीकच्या काळात, म्हणजे कोरोना महामारीच्या काळात लोकांना ‘बाहेर पडू नका’, असे सांगितले, तरी बाहेर अनावश्यक फिरणार्‍यांची संख्या पुष्कळ होती. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. एखाद्या ठिकाणी आग लागते, तेव्हा लोकांच्या अनावश्यक गर्दीमुळे बर्‍याचदा अग्नीशमन दलाला दुर्घटनास्थळी पोचायला वाटच मिळत नाही. वाहतुकीचे नियम न पाळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो आणि रुग्णवाहिकेला वाट मिळत नाही. अशा गोष्टी युद्धकाळात अनेकांचा जीव घेणार्‍या ठरू शकतात.

भारतीय परंपरेत शिस्त, म्हणजे केवळ कायद्याचे पालन नसून धर्मशास्त्रात याला ‘सामान्य धर्म’ असे म्हटले आहे. नागरी शिस्तीचा पहिला नियम म्हणजे स्वयंशिस्त ! जेव्हा सरकार युद्धकाळात संचारबंदी करते, तेव्हा ते नियम पाळायला हवेत. हे नियम मोडणे, म्हणजे केवळ कायद्याचा भंग नाही, तर तो समाजाच्या सुरक्षिततेशी केलेला द्रोह आहे. पाणी, वीज यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचा काटकसरीने वापर करणे, त्यांची हानी न करणे किंवा होऊ न देणे, हेही नागरिकांचे कर्तव्य आहे. शासनाने एखाद्या सुरक्षित ठिकाणी नागरिकांना स्थलांतरित केल्यावर ‘अन्न, वस्त्र पुरवल्यास ते रांगेत उभे राहून घेणे; वृद्ध, रुग्ण इत्यादींना प्रथम प्राधान्य देणे’, हा मानवधर्म पाळणेही नागरिकांचे कर्तव्य आहे.

राष्ट्रासाठी स्वतःच्या सुखसोयी किंवा संपत्ती यांचा त्याग ! 

जेव्हा देशावर बाह्य आक्रमण किंवा नैसर्गिक संकट येते, तेव्हा नागरिकांनी आनंदाने त्याग करण्यास सिद्ध असावे. यामध्ये आर्थिक साहाय्य किंवा शारीरिक श्रम यांचा समावेश होतो. याविषयी एक प्रसिद्ध श्लोक आहे…

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ।। – महाभारत, पर्व १, अध्याय १०७, श्लोक ३२

अर्थ : संपूर्ण कुळाच्या कल्याणासाठी एका पुत्राचा त्याग करावा लागला, तर तो करावा. एका गावाला वाचवण्यासाठी त्यातील एक कूळ सोडण्याची वेळ आली, तर ते खुशाल सोडावे. राष्ट्रासाठी आवश्यकतेनुसार गावही त्यागावा आणि आत्मकल्याणासाठी पृथ्वीचाही (स्वतःच्या प्राणांचाही) त्याग करावा लागला, तर तो अवश्य करावा.

यातून राष्ट्रहितासाठी वैयक्तिक गोष्टींचा त्याग करायचा आहे, ही धर्माची शिकवण असल्याचे स्पष्ट होते.

अ. महाराणा प्रताप जेव्हा हळदीघाटीच्या युद्धानंतर अरवलीच्या जंगलात होते, तेव्हा त्यांच्याकडे सैन्याला देण्यासाठी वेतन नव्हते आणि अन्नाचाही तुटवडा होता. अशा वेळी मेवाडचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्या वेळी त्यांचे मंत्री ‘भामाशहा’ यांनी स्वतःची पिढ्यान्‌पिढ्यांची कमावलेली सर्व संपत्ती महाराणा प्रताप यांना अर्पण केली.

आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जेव्हा ‘कोंढाणा’ किल्ला जिंकणे स्वराज्यासाठी अनिवार्य झाले होते, तेव्हा तानाजी मालुसरे यांच्या घरी त्यांचा मुलगा रायबा याचे लग्न होते; पण जेव्हा त्यांना समजले की, छत्रपती शिवरायांना कोंढाण्यावर स्वारी करायची आहे, तेव्हा त्यांनी सर्व कौटुंबिक सुख बाजूला ठेवले आणि ते म्हणाले, ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे !’ तानाजी मालुसरे यांनीही राष्ट्र-धर्माला प्रथम स्थान दिले.

इ. बाजीप्रभु देशपांडे यांनी तर स्वतःचा देह छत्रपती शिवरायांच्या रक्षणासाठी पावनखिंडीत अर्पण केला.

अशी कितीतरी उदाहरणे आपल्या इतिहासात वाचायला मिळतील. त्यामुळे युद्धकाळात तन-मन-धन यांचा त्याग करण्याची सिद्धता प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवी.
(५.३.२०२६)

– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.