कै. निंगाप्पा अप्पाजी गुरव यांचे आज १३.३.२०२६ या दिवशी मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने…
नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील सनातनचे साधक निंगाप्पा अप्पाजी गुरव (वय ४९ वर्षे) यांचे १२.२.२०२६ या दिवशी सकाळी ९.२५ वाजता हृदयविकाराने निधन झाले. १३.३.२०२६ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त नंदीहळ्ळी येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्री. भुजंग चव्हाण
अ. ‘दादांचा स्वभाव अगदी शांत आणि मितभाषी होता. ते आवश्यक तेवढेच बोलत असत.
आ. कोणतीही सेवा सांगितली, तर ते सकारात्मक राहून ती सेवा करत असत. गुरुपौर्णिमा किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभा या वेळी अतिश्रमाच्या कोणत्याही सेवा दादा दायित्वाने आणि आवडीने करत असत.
इ. दादांनी साधकांसह समाजातील लोकांशीही जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते.’
२. श्री. सुभाष पाटील
२ अ. इतरांना साधनेत साहाय्य करणे : ‘एकदा मला नाशिक येथील कुंभमेळ्याच्या सेवेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा आमच्या शेतामधील ‘पंपसेट’ बंद पडला. त्या वेळी मी दादांना विचारले, ‘‘मी कुंभमेळ्याच्या सेवेसाठी जात आहे. तुम्ही पंपसेट दुरुस्त करून द्याल का ?’’ तेव्हा दादांनी तात्काळ आमच्या शेतामध्ये जाऊन पंपसेट दुरुस्त केला. त्यामुळे मी निश्चिंतपणे सेवेला जाऊ शकलो.
२ आ. सभेच्या सेवेसाठी आलेल्या साधकांना जेवण भावपूर्ण बनवून वाढणे : एकदा बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. दादा काही कामानिमित्त बेळगावला भाड्याच्या खोलीमध्ये रहात होते. सभेची सांगता झाल्यावर सर्व साधक मैदानात होते. त्या वेळी दादा आणि त्यांच्या पत्नी यांनी १५ ते २० साधकांना जेवण भावपूर्ण बनवून वाढले.’

‘नंदीहळ्ळी येथील निंगाप्पा अप्पाजी गुरव हे ‘इलेक्ट्रिक मोटर रिपेरिंग’चा व्यवसाय करत होते. त्यांनी त्यांचे हे कौशल्य सेवेसाठी आणि शेतकरी-साधकांना साहाय्य करण्यासाठी उपयोगात आणले. ते इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असत आणि कोणतीही सेवा भावपूर्ण करत असत. ‘प्रेमभाव’ आणि ‘झोकून देऊन सेवा करणे’, या गुणांमुळे निंगाप्पा गुरव यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.३.२०२६)
३. श्री. शंकर लोंढे
३ अ. ‘निंगाप्पादादा कोणतीही सेवा प्रामाणिकपणे करत असत. ते प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि वेळेत पूर्ण करत असत.
३ आ. साधकांसह समाजातील लोकांचाही आधारस्तंभ असणे : निंगाप्पादादा ‘इलेक्ट्रिक मोटर रिपेरिंग’चा व्यवसाय करत होते. त्यामुळे शेतकर्यांना याविषयी काही समस्या आल्यास दादा वेळेचा विचार न करता रात्री उशिरासुद्धा शेतकर्यांच्या समस्या सोडवत असत. दादा आमच्या गावासह आजूबाजूच्या २ – ३ खेड्यांतील शेतकर्यांचे, तसेच साधकांचेही आधारस्तंभ होते.’
४. श्री. रमेश लोंढे
४ अ. ‘दादांच्या शेतातील भाजीपाला ते बेळगाव सेवाकेंद्रासाठी देत असत.
४ आ. इतरांना साहाय्य करणे
१. वर्ष २०१२ मध्ये माझा अपघात झाला होता. त्या वेळी माझी शारीरिक स्थिती पुष्कळच गंभीर होती. त्यामुळे मला रुग्णालयात भरती केले होते. त्या कालावधीत आमच्या आजीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी आमच्या सर्व कुटुंबियांनी घरी जाणे आवश्यक होते. त्या वेळी निंगाप्पादादा आणि सुकेश गुरवदादा हे दोघे रात्रभर माझ्यासह रुग्णालयात थांबले होते. ते त्यांच्या घरच्या कामांचा किंवा अन्य कोणताच विचार न करता आमच्या कुटुंबातील सर्वांना अंत्यविधीसाठी घरी पाठवून स्वतः रुग्णालयात थांबले. माझा अपघात झाल्यानंतर आम्हाला आर्थिकदृष्ट्या काही साहाय्य लागले, तर त्या दृष्टीने अन्य साधकांशी बोलून त्यांनी नियोजन करून ठेवले होते.
२. आमचा ग्रामीण भाग असल्याने आम्ही ‘सनातन पंचांग’, तसेच आकाशकंदील यांचे वितरण किंवा अन्य कोणतीही प्रसारसेवा रात्रीच करतो. या सेवा करण्यासाठी दादा साधिकांना एका गावातून दुसर्या गावात दुचाकी वाहनाने सोडत असत.
३. जिल्ह्यात काही कार्यक्रम असेल, तेव्हा दादांकडे विद्युत्विषयीच्या सेवेचे आणि माझ्याकडे धर्मशिक्षणविषयक फलक प्रदर्शन लावण्याचे दायित्व दिले जायचे. फ्लेक्स प्रदर्शनामध्ये बर्याच वेळा अनेक पालट असायचे. त्यामुळे ‘लावलेले फलक काढणे, पुन्हा लावणे’, अशा सेवा कराव्या लागत असल्याने माझी सेवा वेळेत पूर्ण होत नसे. तेव्हा साहाय्यासाठी मला दादांचे नाव सुचत असे. दादांना साहाय्यासाठी विचारल्यावर ते मला म्हणायचे, ‘‘काही ताण घेऊ नका. कितीही उशीर झाला, तरी आपण सेवा पूर्ण करूया.’’
४ इ. भाव : दादा वर्ष १९९४ पासून साधना करत होते. त्यांच्याशी बोलतांना ते ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि भंडारे, प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) जाहीर सभा, स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक’ यांसंदर्भातील काही क्षण सांगायचे. ते सांगत असतांना त्यांचा भाव इतका जागृत असे की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत असत आणि ते पाहून आमचाही भाव जागृत होत असे.’
५. श्री. यल्लाप्पा पाटील
५ अ. आर्थिक स्थिती चांगली नसूनही प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणण्यासाठी बाहेरगावी चालत किंवा सायकलवरून जाणे : ‘वर्ष १९९४ मध्ये आमच्या गावातील काही जण एकत्र येऊन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणत असत. तेव्हा दादा त्या भजनांना नियमित उपस्थित रहात असत. दादांसह गावातील काही जण बाहेरगावी जाऊन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हणायचे. दादा आणि इतर साधक यांची आर्थिक स्थिती पुष्कळ हलाखीची होती; पण जाण्या-येण्याची सुविधा नसल्याने ते चालत जात असत किंवा एका सायकलवर ३ जणांना बसून जावे लागत होते, तरी ते नियमित बाहेरगावी भजन म्हणण्याची सेवा करण्यासाठी जायचे.
५ आ. प.पू. डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनापासून सेवेला आरंभ करणे : वर्ष १९९५ मध्ये नंदीहळ्ळी या गावात प.पू. डॉ. आठवले यांचे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, हे जाहीर प्रवचन झाले. त्या कार्यक्रमाच्या पूर्वसिद्धतेला दादा आणि इतर साधक यांनी रात्री उशिरापर्यंत जागून पुष्कळ सेवा केली होती. तेव्हापासून दादा प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून तळमळीने सेवा करत होते.
५ इ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची तळमळ : पूर्वी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांचे बेळगावमधून ७ – ८ खेड्यांमध्ये सायकलवरून प्रवास करून घरोघरी वितरण केले जात होते. दादा ती सेवा नेहमी करत असत. त्यांच्या उजव्या हाताची ३ बोटे भाजल्याने निकामी झाली होती, तरीही ते २ जणांना सायकलवर बसवून वितरणाची सेवा करत असत.
५ ई. दादांचे निधन झाल्यावर ‘त्यांचा देह सजीव आहे’, असे वाटत होते.’
६. श्री. सुकेश गुरव
अ. ‘त्यांच्या खिशात प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र सतत असायचे. ‘माझे गुरु माझ्या समवेत आहेत’, असा त्यांचा भाव होता.’
७. श्रीमती लक्ष्मी गुरव (कै. निंगाप्पा यांची वहिनी (चुलत भावाची पत्नी))
७ अ. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे : ‘एकदा गुरुपौर्णिमेच्या वेळी दादांकडे विद्युत् व्यवस्था, तसेच ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा होती. त्या वेळी दादा सेवेसाठी वेळेत आले होते; मात्र त्या वेळी तेथे स्वच्छतेची सेवाही चालू झाली नव्हती. दादा आल्या आल्या लगेचच स्वच्छतेच्या सेवेमध्ये सहभागी झाले. त्यांनी अन्य साधकांनाही त्यांच्या सेवेत साहाय्य केले. ‘प्रत्येक सेवा ही गुरुसेवाच असते. कृतज्ञताभाव ठेवून सेवा केल्याने आनंद कसा मिळतो ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
७ आ. नातेवाइकांना साधना सांगणे : त्यांनी बर्याच नातेवाइकांना साधना सांगितली होती. त्यांचे नातेवाईक त्यांना ‘सनातनचे साधक’ म्हणूनच ओळखत होते. बर्याच कौटुंबिक अडचणींमध्येसुद्धा त्यांच्या नातेवाइकांना त्यांचा आधार वाटत असे.
७ इ. वहिनीला साधनेत साहाय्य करणे : वर्ष २०१६ मध्ये माझ्या यजमानांचे निधन झाले. त्या वेळी मी साधनाही करत नव्हते, तरीसुद्धा दादांनी मला सांगितले, ‘‘दत्तगुरूंचा नामजप अधिकाधिक करा, म्हणजे तुम्हाला या स्थितीतून लवकर बाहेर पडता येईल.’’ ते घरी आले की, आमच्याशी साधनेविषयी बोलत असत. त्यांच्यामुळे मला त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडता आले.’
८. सौ. लक्ष्मी हलगेकर
अ. ‘दादांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मला काही त्रास जाणवला नाही.
आ. त्या वेळी परम पूज्यांना माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, दादांना तुमच्या चरणांजवळ ठेवा. त्यांना पुढची पुढची गती मिळू दे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ४.३.२०२६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान