
नवी देहली – जर इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तेलाचा पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका त्याच्यावर २० पट अधिक शक्तीने आक्रमण करील. शत्रू पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हे युद्ध चालूच राहील. युद्ध चालू झाल्यापासून अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणमधील ५ सहस्रांहून अधिक ठिकाणांवर आक्रमण केले आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना अजून जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलेले नाही, जेणेकरून आवश्यकता पडल्यास नंतर कारवाई करता येईल. अमेरिका आणि इस्रायल यांनी या युद्धात बरीच मोठी आघाडी घेतली आहे अन् कदाचित् हे युद्ध लवकरच संपेल; परंतु सध्या सैनिकी कारवाई चालूच राहील, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा राज्यातील डोरल शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवणार ! – इराणचे प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या विधानावर प्रत्युत्तर देतांना इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने म्हटले आहे की, युद्धाचा शेवट आम्ही ठरवू. या भागातील राजकीय समीकरणे आणि भविष्यातील परिस्थिती आता आमच्या सैन्याच्या हातात आहे. अमेरिकी सैन्य हे युद्ध संपवू शकत नाही.
ट्रम्प आणि पुतिन यांच्यात दूरभाषवर चर्चा
ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात ९ मार्चला सुमारे १ घंटा दूरभाषवर चर्चा झाली. ही दोघांमधील या वर्षातील पहिली औपचारिक चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. या संवादात प्रामुख्याने मध्यपूर्वेतील संघर्ष, युक्रेन युद्ध आणि जागतिक ऊर्जा परिस्थिती यांवर चर्चा झाली.
ट्रम्प यांच्या आवाहनानंतर ऑस्ट्रेलियाने ५ इराणी महिला फुटबॉल खेळाडूंना आश्रय दिला !
ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाला आवाहन केले होते की, ‘त्यांनी इराणच्या महिला फुटबॉल खेळाडूंना आश्रय द्यावा. जर त्यांना इराणमध्ये परत पाठवले गेले, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि ही एक मोठी मानवी चूक ठरेल. जर ऑस्ट्रेलिया खेळाडूंना आश्रय देण्यासाठी सिद्ध नसेल, तर अमेरिका त्यांना आश्रय देण्यासाठी सिद्ध आहे.’ यानंतर ऑस्ट्रेलियाने इराणी महिला फुटबॉल संघातील ५ खेळाडूंना मानवतावादी व्हिसा दिला आहे, ज्यामुळे त्यांना देशात रहाण्याची अनुमती मिळाली आहे. खेळाडूंना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या महिला आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये इराणवर झालेल्या आक्रमणानंतर महिला संघाने राष्ट्रगीत गायले नव्हते, ज्याला सरकारविरोधी निषेध म्हणून पाहिले गेले. यानंतर इराणी माध्यमांमध्ये खेळाडूंना ‘देशद्रोही’ म्हटले गेले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
इराणच्या आक्रमणांचे समर्थन करणार्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना बहरीनमध्ये अटकइराणच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्याच्या प्रकरणी बहरीन प्रशासनाने ६ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक बहरीनमध्ये नोकरी किंवा व्यवसाय यांनिमित्त रहात होते. या नागरिकांनी इराणच्या सैनिकी कारवायांचे समर्थन करणारे आणि बहरीनच्या अधिकृत धोरणांच्या विरोधात जाणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले होते. बहरीन सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणार्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही. |
पाकमध्ये तेलामुळे शाळा बंद, मंत्र्यांचे वेतन-परदेश दौरे थांबवले !
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता खर्चात कपात करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. शरीफ म्हणाले की, तेलाची किंमत ६० डॉलरवरून १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत.
या निर्णयाच्या अंतर्गत सरकारी कार्यालये आठवड्यातून केवळ ४ दिवस उघडतील आणि अर्धे कर्मचारी घरून काम (वर्क फ्रॉम होम) करतील. या आठवड्याच्या अखेरीस शाळा २ आठवड्यांसाठी बंद रहातील. तसेच मंत्री आणि सल्लागार यांचे परदेश दौरे थांबवण्यात आले आहेत. मंत्री २ महिने वेतन घेणार नाहीत आणि खासदारांच्या पगारात २५ टक्के कपात होणार आहे. पाकमध्ये २ महिने सरकारी गाड्यांना ५० टक्केच इंधन मिळेल. ६० टक्के सरकारी वाहने चालणार नाहीत. सर्व सरकारी विभाग त्यांच्या खर्चात २० टक्के कपात करतील.
इफ्तारच्या मेजवान्या बंद
इफ्तारच्या मेजवान्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रमझानच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते; मात्र आता पाकिस्तान सरकारकडून थेट इफ्तार पार्टी बंद करण्याचा निणय घेण्यात आला.
हेच लोक ट्रम्प यांना नोबेल देण्याची मागणी करत होते ! – पाकच्या वरिष्ठ पत्रकाराने सुनावले
पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी शहबाझ शरीफ सरकारला खडेबोल सुनावले आहेत. हे तेच लोक आहेत, जे डॉनल्ड ट्रम्प यांना नोबेल देत होते. आता हेच लोक भारताला जशी तेलासाठी सवलत दिली जाते, तशी सवलत मागायला ट्रम्प यांच्याकडे का जात नाहीत ? असा प्रश्न नजम सेठी यांनी विचारला आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.
राजकारण्यांना देशाबाहेर पळावे लागेल !
सेठी पुढे म्हणाले की, सरकार कुठल्या प्रकारची धोरणं बनवते ? जनतेमध्ये तुमच्याबद्दल (सरकारबद्दल) प्रचंड राग आहे. हा राग बाहेर आला, तर तुम्हाला समजणारही नाही. कुठल्यातरी विमानामध्ये बसून तुम्हाला पळावे लागेल. मेहरबानी करा; पण जनतेवर हा (तेल दरवाढीचा) बाँब फोडू नका. तुम्हाला हा बाँब फोडायचा असेल, तर नोकरशाह, अधिकारी, यांच्यावर फोडा, त्यांच्या सुविधा अल्प करा, अशी मागणीही सेठी यांनी केली.
बांगलादेशात पेट्रोल-डिझेल विक्रीवर मर्यादा : दुचाकींना दिवसाला केवळ २ लिटर पेट्रोल मिळणार
बांगलादेश सरकारला पेट्रोल आणि डिझेल यांच्या विक्रीवर मर्यादा लागू करावी लागली आहे. राजधानी ढाक्यासह अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि लोक भीतीपोटी अधिक तेल खरेदी करून साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. साठेबाजी आणि अफवा रोखण्यासाठी ‘बांगलादेश पेट्रोलियम कॉपोरेशन’ने कठोर नियम लागू केले आहेत. आता दुचाकीसाठी दिवसाला केवळ २ लिटर पेट्रोल मिळेल. खासगी गाड्यांसाठी कमाल १० लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, तर बस आणि ट्रक यांसाठी ७० ते २२० लिटरपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर पावती देणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि मागील खरेदीची पावती दाखवल्याखेरीज नवीन इंधन मिळणार नाही. सरकारने लोकांना घाबरून तेल साठा न करण्याचे आवाहन केले आहे.
बांगलादेशाच्या विनंतीवरून भारताने ५ सहस्र मेट्रिक टन डिझेल पाठवले !बांगलादेशातील ‘चॅनल-२४’च्या वृत्तानुसार बांगलादेशाने भारतातील सरकारी आस्थापन ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि आसाममधील ‘नुमालीगड रिफायनरी लिमिटेड’ यांच्याकडे पुढील ४ महिन्यांत ५० सहस्र टन डिझेलच्या पुरवठ्याची विनंती केली होती. त्यानंतर भारताने आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून बांगलादेशाला ५ सहस्र मेट्रिक टन डिझेल पाठवले आहे.
|
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी