संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपण्यासाठी ११ मार्चला सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

डावीकडून श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, ह.भ.प. धर्मनाथ महाराज जोशी, श्री. राजन बुणगे, श्री. प्रसाद पंडित, श्री. हिरालाल तिवारी आणि श्री. योगीनाथ फुलारी

सोलापूर – हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर होत असलेल्या विविध राजकीय, सामाजिक अन् सांस्कृतिक आघातांविषयी जनजागृती करण्यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार, ११ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता भवानी पेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, संत तुकाराम बाबा जोशी मठाचे मठाधीश ह.भ.प. धर्मनाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, ‘श्री आजोबा गणपति मंडळा’चे विश्वस्त श्री. योगीनाथ फुलारी, ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ ट्रस्ट’चे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. राजन बुणगे यांनी सांगितले की, या सभेत लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे संघटक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मागील २ महिन्यांपासून सभेच्या निमित्ताने सोलापूर शहर, तसेच आसपासच्या ७४ गावांमध्ये व्यापक प्रसार आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. सभा यशस्वी होण्यासाठी अनेक धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. अनेक धार्मिक संस्था, पुरोहित संघटना, ज्ञाती संस्था, शिवजयंती आणि गणेशोत्सव मंडळे यांनी स्वतःहून सभेचा प्रसार केलेला आहे. सभेच्या प्रसारात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यांनी १६ सहस्रांहून अधिक नागरिकांना घरभेटींद्वारे सभेचे निमंत्रण दिले. हस्तपत्रके, भित्तीपत्रके, रिक्शा फलक, दुचाकीवरील स्टिकर, होर्डिंग या माध्यमांतून शहर आणि ग्रामीण भागांत १ लाखांहून अधिक जणांना निमंत्रण देण्यात आले आहे.