इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध : भारताची इंधन अन् सामरिक सुरक्षा भक्कम !

इराण-अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर आक्रमण केले आहे. या युद्धाचे केलेले सविस्तर विश्लेषण येथे देत आहोत.

१. युद्धाचे स्वरूप आणि सद्यःस्थिती

अ. दोन गट : एका बाजूला इराण आणि त्यांना समर्थन देणार्‍या जिहादी संघटना हमास, हिजबुल्ला अन् हुती बंडखोर आहेत, तर दुसर्‍या बाजूला अमेरिका, तसेच इस्रायल आहेत.

आ. विकेंद्रित युद्ध : अमेरिकेने इराणच्या पहिल्या फळीतील राजकीय आणि लष्करी नेतृत्व संपवले असले, तरी इराणने ‘विकेंद्रित युद्धनीती’ अवलंबली आहे. यात दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील नेतृत्व सक्षमपणे लढा देत आहे.

इ. शस्त्रास्त्रे : हे युद्ध प्रामुख्याने मिसाईल्स (क्षेपणास्त्रे) आणि ‘ड्रोन्स’ यांद्वारे लढले जात आहे. इराणकडे शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा असून त्यांनी ती विविध ठिकाणी लपवून ठेवली आहेत.

२. भारतावर होणारा परिणाम (इंधन सुरक्षा)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

अ. तेलाचे दर : अनेक विश्लेषक भीती घालत असले, तरी भारतात तेलाचे दर वाढण्याची शक्यता अल्प आहे. भारताने वर्ष २०१२ पासून इंधन सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली आहेत.

आ. पर्यायी स्रोत : भारत केवळ आखाती देशांवर अवलंबून नाही. रशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देश यांच्याकडूनही आपण तेल आयात करतो.

इ. राखीव साठा (स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) : भारताकडे ६० ते ८० दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (राखीव साठा) उपलब्ध आहे.

ई. ‘रिफायनिंग’ क्षमता : भारत स्वतःच्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट तेल ‘रिफाईन’ करतो, जे अतिरिक्त तेल आपण युरोपला निर्यात करतो. आवश्यकता भासल्यास ते भारतात वापरता येईल.

३. भारतियांची सुरक्षा

आखाती देशांमध्ये अनुमाने ८० ते ८५ लाख भारतीय आहेत. सध्या तरी त्यांना कोणताही मोठा धोका नाही; कारण आक्रमण केवळ लष्करी तळांवर होत आहेत. आणखी परिस्थिती बिघडल्यास भारतियांना बाहेर काढण्याची क्षमता भारताकडे आहे; परंतु सध्या विमानसेवा चालू असल्याने घाबरण्याचे कारण नाही.

४. भारताची भूमिका आणि जागतिक राजकारण

अ. तटस्थता : भारत ‘युद्ध टाळा आणि चर्चेने प्रश्न सोडवा’, या भूमिकेवर ठाम आहे. अशा संघर्षात प्रत्येक वेळी बाजू घेणे आवश्यक नसते.

आ. पाकिस्तान आणि चीन : या युद्धामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्या शस्त्रास्त्रांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. चीनची संरक्षण यंत्रणा इराणचे रक्षण करू शकली नाही, तर पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांनी (तालिबानची आक्रमणे) ग्रासलेला आहे.

इ. अमेरिकेची हानी : हे युद्ध दीर्घकाळ चालल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रतिमा यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. रशिया आणि चीन अमेरिकेला या युद्धात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील.

५. निष्कर्ष

हे युद्ध प्रामुख्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांवर आधारित असल्याने दीर्घकाळ चालू शकते; परंतु भारताची इंधन अन् सामरिक सुरक्षा सध्या तरी भक्कम स्थितीत आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (४.३.२०२६)