इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अन् आखातातील सत्तायुद्ध !

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्ध चालू आहे. इराण आजूबाजूच्या अरब देशांवरही हवाई आक्रमणे करत आहे. आखातातील घडामोडींचा विचार केला की, इराण हे नाव कधी इस्रायलवरील ‘हमास’च्या आक्रमणाला दिलेला पाठिंबा, तर कधी ‘हिजबुल्ला’ आणि ‘हुती’ बंडखोरांना पुरवलेली शस्त्रे यांत चर्चेत असते. सौदी अरेबिया-इराण संघर्षाची पाळेमुळे कुठे आहेत ? यासह अन्य प्रश्नांची उत्तरे इराणच्या इतिहासात दडलेली आहेत.

१. शिया-सुन्नी मतभेद

मुसलमान समुदायातील अंतर्गत विभागणी हा आखातातील राजकारणाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू आहे. पैगंबर यांच्या निधनानंतर खलिफा पदावरून दोन गट झाले. हजरत अबू बक्र यांना मानणारे ‘सुन्नी’ आणि हजरत अली यांना मानणारे ‘शिया’ मुसलमान बनले. जगात ९० टक्के सुन्नी मुसलमान, तर केवळ १० टक्के शिया आहेत. इराण हा शियाबहुल देश असून त्यांची ‘पर्शियन’ संस्कृती अरबांच्या सुन्नी संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

२. इराणचे भूराजकीय महत्त्व

श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’

इराण नेहमीच जागतिक महासत्तांच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रणात राहिला आहे, याची काही प्रमुख कारणे आहेत. इराणचे भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व, म्हणजे त्याच्या एका बाजूला दक्षिण आशिया आणि दुसर्‍या बाजूला अरब देश आहेत. त्याच्या खाली पर्शियन आखात, अरबी समुद्र आहे, जेथून जगाचा व्यापार चालतो. जगातील २० टक्के तेलाचा व्यापार हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. इराणने हा मार्ग रोखल्याने जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो. भविष्यात जागतिक तेल संकट निर्माण होऊ शकते. इराणमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू यांचे पुष्कळ साठे आहेत.

३. इराणचा इतिहास

इराणमध्ये धार्मिक गोष्टींच्या संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या विद्वानांना ‘उलेमा’ म्हटले जाते आणि यातही सर्वांत अधिक सुशिक्षित विद्वानांना ‘अयातुल्ला’ म्हटले जाते. इराणमधील या उलेमांकडे राजकीय सत्तासुद्धा होती, त्यामुळे केवळ राजाचेच नियंत्रण नव्हते, जर उलेमांनी काही सांगितले, तर राजाला ते पाळावे लागायचे. अशा स्वरूपाची व्यवस्था १९ व्या शतकापर्यंत इराणमध्ये काम करत होती. १९ व्या शतकात इराण हा रशिया आणि ब्रिटन यांच्यातील संघर्षात अडकला होता. वर्ष १८०४ मध्ये रशियाने इराणचा पराभव करून ‘गुलिस्तानचा तह’ लादला. त्यानंतर पुन्हा वर्ष १८२८ मध्ये ‘तुर्कमेनचा तह’ करून इराणचे लष्करी आणि व्यापारी अधिकार हिरावून घेतले. ब्रिटिशांनी इराणच्या दक्षिण-पूर्व भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘पॅरिसचा तह’ केला. इराणच्या राजांनी देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती परकियांना विकल्यामुळे जनतेत संताप वाढला. वर्ष १९०८ मध्ये विल्यम डी. आर्सी यांनी इराणमध्ये तेलाचा शोध लावला आणि तेव्हापासून ब्रिटीश तेथून तेल नेऊ लागले; परंतु त्याचा १६ टक्केच लाभ इराणला अन् उर्वरित सर्व ब्रिटिशांना मिळत होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात इराण, ब्रिटन आणि रशिया यांना अन्नपदार्थ अन् अन्य आवश्यक साहित्य पोचवण्याच्या निमित्ताने अमेरिकेचा इराणमध्ये शिरकाव झाला. अमेरिकेने येथील तेलसाठे पाहून दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटन आणि रशिया हे मोठे देश कमकुवत झाल्याने अमेरिकेने इराणवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला.

अमेिरकी आस्थापनेही त्यात आली आणि त्यांनी अन्य देशांच्या आस्थापनांसह ५०-५० टक्के वाटा वाटून घेतला. याचा अर्थ असा की, इराणच्या तेलाचा लाभ घेण्यामध्ये अमेरिका आता मुख्य खेळाडू बनली होती. यामुळे अमेरिका आता इराणच्या अंतर्गत गोष्टी आणि तेथील राजाचा कारभार यांमध्ये, म्हणजे त्यांच्या धोरणांमध्येही ती ढवळाढवळ करू लागली.

४. रिझा खान पहलवी आणि तेथील क्रांती

त्यापूर्वी वर्ष १९२५ मध्ये इराणच्या सैन्यातील अधिकारी रिझा खानने सत्ता हाती घेतली आणि इराणचे सक्तीने आधुनिकीकरण चालू केले. मशिदीत खुर्च्या ठेवणे, महिलांना बुरखा घालण्यावर बंदी आणि पुरुषांना युरोपियन कपडे सक्तीचे करण्यात आले. या आधुनिकतेसह राजाने प्रचंड कर वाढवले आणि विरोध दडपला.

अमेरिका इराणमध्ये हस्तक्षेप वाढवत असतांना वर्ष १९५१ मध्ये ‘मजलिस’च्या सदस्याकडून उठाव करण्यात आला. इराणमध्ये एक इस्लामी घटना चालवली गेली, ज्यामध्ये मतदान, निवडणुका आणि इतर गोष्टी असतील. राजा राज्य करील; पण उलेमांचेही म्हणणे ऐकले जाईल; याला ‘मजलिस’ असे नाव देण्यात आले. थोडक्यात सांगायचे, तर धार्मिक गटांना इराणमध्ये राजकीय सत्ता मिळाली होती.

१९६० च्या दशकात खामेनी यांचा प्रवेश होतो. त्यांनी ‘अल्लाविना कुणाचेही राज्य असू शकत नाही, कोणत्याही देशावर माणसाने राज्य करणे चुकीचे आहे आणि आम्ही हीच क्रांती इतर देशांमध्येही नेऊ’, अशा प्रकारचे भाषण दिल्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. यामुळे गरीब जनता आणि धार्मिक नेते (उलेमा) हे राजाच्या विरोधात गेले. त्यातूनच इराणच्या इतिहासातील सर्वांत मोठे वळण, म्हणजे वर्ष १९७९ ची क्रांती घडली. ही क्रांती केवळ राजाविरुद्ध नव्हती, तर ती अमेरिकेच्या हस्तक्षेपाविरुद्ध होती. अयातुल्ला खामेनींनी इराणला ‘इस्लामी रिपब्लिक’ (इस्लामी प्रजासत्ताक) घोषित केले. नोव्हेंबर १९७९ मध्ये आंदोलकांनी अमेरिकन दूतावासावर आक्रमण करून ते कह्यात घेऊन ५२ अधिकार्‍यांना ४४४ दिवस ओलीस ठेवले. येथूनच अमेरिका-इराण मैत्रीचा अंत झाला.

५. इराणचे ‘प्रॉक्सी वॉर’ (छुपे युद्ध)

इराणच्या शेजारी असलेल्या सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार, बहारीन, इराक या अरब देशांवर इराण अंकुश ठेवू इच्छितो. इराण ज्यू धर्मीय असलेल्या इस्रायलला शत्रू मानतो. इराणच्या शेजारी असलेले अरब देश अमेरिकेचे नेतृत्व मान्य करतात. हे देश अमेरिकेशी अधिक व्यापार, त्याचप्रमाणे स्वत:चे तेल डॉलरमध्ये विकतात. त्यामुळे साहजिकच अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य वाढतच गेले आहे. याला  ‘पेट्रोडॉलर’ही म्हणतात. अमेरिकेने या अरब देशांमध्ये स्वत:चे सैन्य तळ उभारले आहेत. त्याद्वारे अरब देशांना अमेरिका सुरक्षा पुरवते. आखाती देशांमध्ये इराणकडे सैन्य दल ज्यामध्ये नौसेना, हवाई दल आणि सैन्य आहे. ‘इस्लामिक रिपब्लिक गार्ड’ या सैन्याच्या व्यतिरिक्त धार्मिक सत्तेला धोका उत्पन्न झाल्यास तिचे रक्षण करणारी ही सैन्याची संघटना आहे. इराण प्रत्यक्ष सध्या चालू असलेल्या थेट युद्धापूर्वी ‘प्रॉक्सी’ (प्रतिनिधी) गटांद्वारे स्वत:चे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सौदी अरेबिया अमेरिकेच्या जवळ असल्याने इराण त्याला शत्रू मानतो. हमास (पॅलेस्टाईन), हिजबुल्ला (लॅबेनॉन) आणि हुती (येमेन) यांना इराण पाठिंबा देतो, जेणेकरून इस्रायल अन् अमेरिका यांवर दबाव राहील. इराणचा अणू कार्यक्रम हा इस्रायल आणि अमेरिका यांच्यासाठी सर्वांत मोठी चिंता आहे. अनेकदा इराणच्या शास्त्रज्ञांच्या गूढ हत्या करून हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

६. आखातातील कायम तणावपूर्ण परिस्थिती

शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. त्यामुळे आखातातील परिस्थिती तणावपूर्ण राहिली आहे. अमेरिकेने इराणच्या विविध सैन्य ठिकाणांवर आक्रमणे केली. इराणवर निर्बंध लादून त्यांनी त्याची संपूर्ण अर्थव्यवस्था खाली आणली. आताही अमेरिका आणि इस्रायल हे इराणला पुरते नेस्तनाबूत करण्याचा निर्धार करूनच युद्धात उतरले आहेत, असे दिसते.

७. इराण, अण्वस्त्रे आणि महासत्तांची भूमिका

जगात तेलसाठे असलेल्या देशांपैकी इराण, इराक आणि सौदी अरेबिया हे ३ देश आखातातील आहेत; पण अण्वस्त्रांच्या सूचीत आखातातील एकही तेल उत्पादक देश नाही. अमेरिका आणि इस्रायल यांना आखातातील कोणत्याही इस्लामी देशाकडे अण्वस्त्रे असावीत, असे कधीच वाटणार नाही. जोपर्यंत आखातात केवळ इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत, तोपर्यंत त्याचे वर्चस्व राहील आणि पर्यायाने अमेरिकेचे नियंत्रण राहील; पण चीन अन् रशिया यांना हे नको आहे, म्हणून ते इराणला पाठिंबा देत सक्षम करत आहेत. इराणला ठाऊक आहे की, तो अण्वस्त्रांमुळेच तो शक्तीशाली बनेल; मात्र इस्रायलच्या मते इराणकडे अण्वस्त्रे आली, तर त्याचे स्वतःचे अस्तित्वच रहाणार नाही. इराण प्रत्यक्ष किंवा आतंकवादी गटांद्वारे अणूबाँब टाकू शकतो, याची इस्रायलला चिंता आहे, तर अमेरिकेलाही इराणच्या विरुद्ध तो करत असलेल्या खेळींमुळे, सैन्य कारवाई आणि निर्बंध यांमुळे इराणकडून अणूबाँबचा वापर होण्याची भीती आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल या दोघांनाही इराणकडे ना अणूबाँब हवा, ना दूर अंतरापर्यंत मारा करू शकणारी ‘बॅलेस्टिक’ (आंतरखंडिय) क्षेपणास्त्रे हवी आहेत.

इराण या क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व खामेनी याच्या मृत्यूनंतरही दाखवू इच्छित असल्याने त्याने इस्रायल, अरब देशांतील अमेरिकेचे तळ, अरब देशातील अन्य महत्त्वाची ठिकाणे यांवर क्षेपणास्त्रांनी आक्रमण करणे चालूच ठेवले आहे. ‘आम्ही बुडू आणि अनेकांना घेऊन बुडू’, अशी भूमिका इराणने घेतली असल्यामुळे युद्ध चिघळत आहे. आगामी दिवसांमध्ये इराणच्या विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांनी आणखी तीव्र अन् संहारक क्षेपणास्त्रांचा उपयोग करण्याचीही शक्यता आहे.

चीन आणि रशिया हे प्रत्यक्ष युद्धात उतरलेले दिसत नसल्यामुळे युद्धाचे पारडे अमेरिका अन् इस्रायल यांच्या बाजूनेच झुकलेले आहे. तरी अन्य महासत्तांनी या युद्धात उडी घेतल्यास जागतिक महायुद्धाचे स्वरूप येऊ शकते. (४.३.२०२६)

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल.