प्रवेशाचे प्रकार

वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १५ 

प्रवेशद्वार हा विषय समजून घेतांना आपण १४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये पाहिले होते की, जागेमध्ये प्रवेश करण्यासाठी जे द्वार असते, त्याला ‘प्रांगण प्रवेश’, तर घरामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या द्वाराला ‘सिंहद्वार’ असे म्हणतात. प्रांगण प्रवेश, तसेच सिंहद्वार कोणत्या दिशेला त्याचे शुभाशुभ परिणाम वास्तूमालकावर होत असतात. त्याविषयी ‘समराङ्गणसूत्रधार’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

उत्संङ्गो हीनबाहुश्च  पूर्ण बाहुस्तथापर: ।
प्रत्यक्षायश्चतुर्थश्च निवेश: परिकीर्तीत: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक ११

अर्थ : उत्सङ्ग, हीनबाहू,   पूर्णाबाहू आणि प्रत्यक्षाय हे प्रवेशाचे ४ प्रकार सांगितले गेले आहेत. या ४ प्रवेशांचे  वर्णन आणि त्यांचे फल यांविषयीसुद्धा ग्रंथामध्ये दिलेले आहे.

लेखांक १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1007762.html

 (भाग २)

१. उत्सङ्ग

प्रवेश प्रकार १ : उत्सङ्ग

उत्सङ्ग एकदिक्भ्यां द्वाराभ्यां वास्तुवेश्मनो: ।
स सौभाग्यप्रजावृद्धि धनधान्यजयप्रद: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १२

अर्थ : ज्या भूमीचे आणि वास्तूचे द्वार एकाच दिशेला असते, त्याला ‘उत्सङ्ग’ असे म्हणतात. असे द्वार सौभाग्य, प्रजा यांची वृद्धी करणारे, धनधान्य आणि जय प्राप्त करून देणारे असते.

२. हीनबाहू

 

प्रवेश प्रकार २ : हीनबाहू
श्री. श्रेयस पिसोळकर

यत्र प्रवेशतो वास्तु गृहम् भवति वामत: ।
तद्हीनबाहुकं वास्तु निन्दित वास्तुचिन्तकै : ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १३

अर्थ : ज्या ठिकाणी जागेमध्ये प्रवेश केल्यावर घराचा प्रवेश डाव्या बाजूला असतो, त्याला ‘हीनबाहू वास्तू’ असे म्हणतात. याची सर्वच वास्तूशास्त्रकारांनी निंदा केली आहे. त्यामुळे या पद्धतीचा वास्तूप्रवेश टाळावा. या प्रवेशाचे खालील श्लोकाच्या माध्यमातून परिणाम सांगितले आहे.

तस्मिन् वसन्नल्पवित्त: स्वल्पमित्रोऽल्पबान्धव: ।
स्त्रीजितश्च भवेन्नित्यं विविधव्याधिपीडित: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १४

अर्थ : या वास्तूत रहाणार्‍याला अल्प पैसा, अल्प मित्र आणि बांधव असतात, तसेच तो स्त्रियांना वश होणारा आणि विविध रोगांमुळे पीडित असतो.

३. पूर्णबाहू

प्रवेश प्रकार ३ : पूर्णबाहू

वास्तुप्रवेशतो यत् तु गृहं दक्षिणतो भवेत् ।
प्रदक्षिणप्रवेशत्वात् तद् विद्यात् पूर्णबाहुकम् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १५

अर्थ : ज्या जागेत प्रवेश केल्यावर घराचा प्रवेश दक्षिण, म्हणजे उजव्या बाजूला येतो, त्याला ‘पूर्णबाहू’ असे म्हणतात. हा वास्तूप्रवेश वास्तूशास्त्रकारांनी उत्तम सांगितला आहे. याचे लाभ पुढील श्लोकात सांगितले आहेत.

तत्र पुत्रांश्च पौत्रांश्च धनधान्यसुखानि च ।
प्राप्नुवन्ति नरा नित्यं वसन्तो वास्तुनि ध्रुवम् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १६

अर्थ : पूर्णबाहू वास्तूमध्ये रहाणार्‍या व्यक्तीला पुत्र-पौत्र, धनधान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतात अन् चिरकाल त्या वास्तूत तो निवास करतो.

४. प्रत्यक्षाय

प्रवेश प्रकार ४ : प्रत्यक्षाय

गृहपृष्ठं समाश्रित्य वास्तुद्वारं यदा भवेत् ।
प्रत्यक्षायस्त्वसौ निन्द्यो वामावर्तप्रवेशवत् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १७

अर्थ : ज्या घराच्या पाठच्या बाजूने जागेत प्रवेश करणारे द्वार असेल, तर त्याला ‘प्रत्यक्षाय’ असे म्हणतात. हा प्रवेशसुद्धा वास्तूशास्त्रानुसार निंद्य सांगितला आहे. याचे परिणाम हे ‘हीनबाहू’ प्रवेशाप्रमाणेच वास्तूमालकाला अनुभवायला मिळतात.

साधारण आपल्याला वरील माहितीवरून लक्षात येईल की, जागेमध्ये प्रवेश केल्यावर कधीही डाव्या हाताला घराचा प्रवेश घेऊ नये, तसेच घराच्या पाठीमागून अंगणात प्रवेश करण्याचे द्वार नसावे. त्यामुळे वरील नियमांप्रमाणे सारासार विचार करून प्रवेशद्वार निश्चित करणे आवश्यक आहे.

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२५.२.२०२६)

लेखांक १६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1015692.html