प्रेमळ, सेवाभावी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मुखात रामनाम असणारे पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. विश्वास नाईक (वय ८१ वर्षे) !

आज ३.३.२०२६ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी कै. विश्वास नाईक यांचे प्रथम मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने…

१.२.२०२६ या दिवशी पुणे येथील विश्वास रामचंद्र नाईक यांचे निधन झाले. ३.३.२०२६ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी त्यांचे प्रथम मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि ते रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. विश्वास नाईक

१. सौ. वंदना रेखी (कै. विश्वास नाईक यांची मोठी मुलगी), सिंहगड रस्ता, पुणे.

सौ. वंदना रेखी

१ अ. अहं अल्प असणे : ‘बाबांमधील ‘नम्रता’ या गुणामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवत नसे. ते नेहमी अंतर्मुख असत. माझी आई (कै. वासंती नाईक) नोकरी करत असल्याने तिला घरकामांत साहाय्य करतांना बाबांना कधीच न्यूनता वाटली नाही.

१ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे : बाबांनी कधीही अन्न वाया घालवले नाही. त्यांनी आम्हा तिन्ही भावंडांवर ‘नीटनेटकेपणा’, ‘स्वच्छता’, ‘टापटीप’, ‘शिस्तबद्धता’ आणि ‘ईश्वरावरील श्रद्धा’, या गुणांचे संस्कार लहानपणापासूनच केले.

१ इ. बाबांनी आजारपणात कधी चिडचिड केली नाही. शेवटपर्यंत ते ईश्वराच्या अनुसंधानात होते.’

२. सौ. वैशाली नानिवडेकर (कै. विश्वास नाईक यांची मधली मुलगी), डोंबिवली, जिल्हा ठाणे.

सौ. वैशाली नानिवडेकर

२ अ. इतरांना साहाय्य करणे : ‘बाबांनी त्यांच्या जीवनात सर्वांना नेहमी आपलेसे करून घेतले. केवळ स्वतःची मुले नाही, तर ‘आप्तेष्टांतील सर्व मुले माझीच आहेत’, या विचाराने त्यांनी सर्वांना नेहमी साहाय्य केले. बाबांमुळे घराला घरपण असायचे.

२ आ. माझे बाबा माझ्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकासाठीच एक ऊर्जास्रोत होते.

२ इ. शेवटच्या क्षणी मुखात रामनाम असणे : ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ हे त्यांचे श्रद्धास्थान होते. लहानपणी त्यांनी आम्हा भावंडांना ‘श्रीरामरक्षा स्तोत्र म्हटल्याविना जेवायचे नाही’, अशी कडक; पण प्रेमळ शिस्त लावली. हेच श्रीरामरक्षा स्तोत्र शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मुखात होते. ‘शेवटच्या क्षणी रामनाम घेत जाणे’, हे परम भाग्य त्यांना लाभले. ते आम्हालाही श्रीरामनामाची शिकवण देऊन गेले.’

३. श्री. प्रवीण नाईक (मुलगा), कोथरुड, पुणे.

३ अ. इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणे : ‘बाबा कर्तव्यभावनेने सर्व कृती करायचे. त्यांनी त्यांचे आई-वडील, तसेच पत्नी या सर्वांची त्यांच्या आजारपणात मनापासून शुश्रूषा केली. एवढेच नव्हे, तर सदनिकेतील वृद्ध आजारी व्यक्तींनाही ते शक्य तेवढे साहाय्य करायचे. इतरांच्या अडचणींच्या वेळी ते स्वतःहून आर्थिक साहाय्य करत. त्यांची कोणाकडून अपेक्षा नसायची.

श्री. प्रवीण नाईक

३ आ. बाबांनी कधीही कोणाला दुखावले नाही. कठीण प्रसंगांतही ते सकारात्मक असायचे. त्यांनी कधी कोणाविषयीही तक्रार केली नाही.

३ इ. सेवाभावी वृत्ती

१. पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांचीही त्यांनी मनोभावे सेवा केली. घरातील देवपूजा झाल्यावर ते प.पू. आबांच्या घरी देवपूजा करण्यासाठी जायचे. ‘त्यांच्या घरातील देवपूजेतील उपकरणे, तसेच देवघर यांची स्वच्छता करणे, नंतर यथासांग पूजा करणे’, हा त्यांचा नित्यक्रम होता. घरातील आणि प.पू. आबा उपाध्ये यांच्या घरातील पूजा होईपर्यंत त्यांना पुष्कळ उशीर होत असे. असे असूनही त्यांनी प.पू. आबांच्या सेवेत कधीही सवलत घेतली नाही.

२. बाबांमधील सेवाभावामुळेच प.पू. आबांनाही महाशिवरात्र, प्रदोष, सोमवार, अशा महत्त्वाच्या दिवशी बाबांकडूनच पूजा करून घेणे आवडायचे. त्यांच्यातील सेवाभाव बघून प.पू. आबांनाही ते प्रिय होते. ‘तुमच्याएवढा सेवाभाव कोणामध्ये पाहिला नाही’, असे म्हणून प.पू. आबा त्यांना नमस्कार करायचे.

‘सेवाभावी वृत्तीने आयुष्य कसे जगावे आणि मृत्यूशय्येवर असतांनाही रामनाम कसे घ्यावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे कै. विश्वास नाईक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पुणे येथील विश्वास रामचंद्र नाईक यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. नाईककाकांनी आयुष्यभर सेवाभावी वृत्तीने आजारी, वयस्कर, नातेवाईक इत्यादींची मनापासून सेवा केली. त्यांच्यातील ‘नम्रता’ आणि ‘प्रेमभाव’, या गुणांमुळे त्यांनी अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना अनेकांना जोडून ठेवले. सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. रुग्णाईत असतांनाही ते नामजप करत होते. त्यांच्या साधनेमुळे रुग्णालयातही त्यांचे मन कणखर होते. ‘सेवाभावी वृत्तीने आयुष्य कसे जगावे आणि मृत्यूशय्येवर असतांनाही रामनाम कसे घ्यावे ?’, याचा आदर्श नाईककाकांनी सर्व साधकांसमोर ठेवला आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.२.२०२६)

३ ई. सेवेची तळमळ

१. बाबा काही वर्षांपूर्वी दैनिक, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत होते. अन्य साधकांना अंकांचे वितरण करण्यात अडचण आली, तर ते स्वतःहून त्या साधकाकडील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचे.

२. बाबा सात्त्विक उत्पादनांचा प्रदर्शनकक्ष लावण्याची सेवा करायचे. ‘पंचांग वितरण, गुरुपौर्णिमेला अर्पण गोळा करणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण’, या सेवांमधून त्यांनी समाजातील अनेक जणांना जोडून ठेवले होते. त्यांचा जनसंपर्क पुष्कळ मोठा होता.

३. ते एकटेच १५० हून अधिक ‘सनातन पंचांगां’चे वितरण करायचे आणि त्याची वहीमध्ये व्यवस्थित नोंद करून ठेवायचे.

४. बाबांनी आमच्या घरी येणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकार्‍यांना सनातन संस्थेचे कार्य सांगून त्यांना ग्रंथ भेट दिले, तसेच त्यांना साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करून जोडले आहे. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनाही त्यांनी जोडून ठेवले. आजही ते सर्व जण बाबांना नावानिशी ओळखतात.’

४. सौ. रश्मी नाईक (सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४९ वर्षे), कोथरुड, पुणे.

सौ. रश्मी प्रवीण नाईक

४ अ. ‘बाबांना कशाचीही आसक्ती नव्हती. ते नेहमी समाधानी असायचे.

४ आ. सातत्य : त्यांच्या प्रत्येक कृतीत सातत्य होते. नियमित ‘श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणणे, षोडशोपचारे देवपूजा करणे’, यांत त्यांचा कधीही खंड पडला नाही. कितीही उशीर झाला, तरी त्यांनी देवपूजा उरकली, असे कधीच झाले नाही. रुग्णालयात भरती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत त्यांनी देवपूजा केली.’

५. श्री. प्रवीण नाईक (मुलगा) आणि सौ. रश्मी नाईक (सून), कोथरुड, पुणे.

५ अ. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

५ अ १. सतत नामजप करणे : ‘नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत बाबा रुग्णाईत होते. या तीन मासांत त्यांनी कुलदेवतेचा आणि प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय म्हणून सांगितलेला नामजप सतत केला.

५ अ २. रुग्णालयात असतांनाही संतांना साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारणे : डिसेंबर २०२५ मध्ये बाबा रुग्णालयात असतांना त्यांना भेटायला सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे) आल्या होत्या. तेव्हा बाबांनी त्यांना ‘मी साधनेचे आणखी कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले.

५ अ ३. शारीरिक स्थिती नाजूक असूनही बाबांचे मन कणखर असल्याने आधुनिक वैद्यांनी आश्चर्य व्यक्त करणे : शेवटच्या मासात त्यांच्या शरिरातील सर्व अवयवांची शक्ती क्षीण होऊ लागली. त्यांच्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य म्हणायचे, ‘‘नाईकआजोबांची शारीरिक स्थिती नाजूक असूनही त्यांच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचा त्रास, क्लेश अथवा चिडचिड जाणवत नाही. त्यांचे मन अजून पुष्कळ कणखर आहे.’’ त्यांना पाहून आधुनिक वैद्यही अचंबित होत असत.

आम्हा सर्वांना बाबांचा पुष्कळ आधार होता. ‘बाबांमधील गुण आम्हा सर्वांमध्ये येवोत’, अशी आम्ही गुरुदेवांच्या चरणी मनोमन प्रार्थना करतो. ‘मृत्यूशय्येवर असतांना भगवंताचे नाम कसे घ्यावे ?’, हे त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी आम्हाला शिकवले’, याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहोत.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ११.२.२०२६)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक