निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १२५

१. ‘ट्रिगर फिंगर’
हा बोटांच्या स्नायूंशी संबंधित आजार आहे. ही बोटांना किंवा अंगठ्यांना होणारी एक वेदनादायक स्थिती आहे, ज्यामध्ये बोट वाकवतांना किंवा वाकवलेले बोट सरळ करतांना अडकते अन् ‘कट्’ असा आवाज येतो. यात बोटांच्या मुळांशी (बोटे हाताला जोडलेल्या भागात) वेदना होतात. बोटांमध्ये कडकपणा (स्टीफनेस) जाणवतो. बोटांवर सूज येते आणि सकाळी बोटे अधिक आखडतात.
२. ‘ट्रिगर फिंगर’ची प्रमुख लक्षणे
अ. सकाळी उठल्यावर जडपणा जाणवणे.
आ. तळहातावर वेदना किंवा गाठ जाणवणे.
इ. बोट सहजतेने सरळ करण्यात अडचण येणे.
३. ‘ट्रिगर फिंगर’ची कारणे
३ अ. सामान्य कारणे : ‘हाताने सतत कामे करणे, हात किंवा बोटे यांचा एकसारखा आणि वारंवार वापर करून वस्तू घट्ट धरून ठेवणे’, ही हा आजार होण्याची सामान्य कारणे आहेत, ज्यामध्ये बोटे सतत वाकलेल्या स्थितीत रहातात, उदा. सतत भ्रमणभाष (मोबाईल) धरून ठेवणे, संगणक ‘माऊस’चा अधिक वापर करणे इत्यादी. अशा सततच्या पकडीमुळे बोटांचे स्नायू आणि स्नायूबंध (टेंडन) यांवर ताण येतो अन् ‘ट्रिगर फिंगर’सारख्या समस्या उद्भवू शकतात.
३ आ. प्रमुख कारणे : ‘ट्रिगर फिंगर’ होण्यामागे ‘फेशिया’च कारणीभूत असते, असे नाही, तर अनेक वेळा बोटांवरील सूज, जखम, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) मधील पालट, मधुमेह, तसेच हात किंवा बोटे यांचा अतिवापर ही प्रमुख कारणेही असतात.
४. मधुमेह आणि संधीवात हे आजार असलेल्या व्यक्तींत, तसेच स्त्रियांमध्ये ‘ट्रिगर फिंगर’ची स्थिती तुलनेने अधिक आढळते.
५. कोणते उपचार करावे ?

व्यक्तीला ‘ट्रिगर फिंगर’ हा आजार असल्यास तिच्यावर ‘अल्ट्रासाऊंड थेरपी’ (अल्ट्रासाऊंड थेरपी : फिजिओथेरपीमध्ये अंतर्गत उपचारांसाठी एक मशीन वापरले जाते, ज्याने सूक्ष्म ध्वनीलहरींच्या कंपनांद्वारे रुग्णाच्या वेदना आणि सूज न्यून करण्यास साहाय्य होते.), सौम्य ‘स्ट्रेचिंग’ आणि ‘टेंडन ग्लायडिंग’ व्यायाम (सौम्य ‘स्ट्रेचिंग आणि टेंडन ग्लायडिंग’ व्यायाम : स्नायूंना हलके ताण देणारे आणि बोटांची हालचाल सुरळीत होण्यासाठीचे व्यायाम), कामाच्या सवयींमध्ये पालट करणे, तसेच आधारपट्टी लावणे (स्प्लिंट) असे उपचारही करावे लागतात; मात्र जेव्हा लक्षणे दीर्घकाळ टिकतात, पुनःपुन्हा उद्भवतात किंवा उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा ‘संपूर्ण शरिराची ठेवण, हालचाल आणि ‘फेशियावरील’ ताण’ यांचा विचार करणे आवश्यक ठरते. (‘फेशिया’संबंधी माहिती सूत्र क्रमांक ६ मध्ये दिली आहे.)
६. फेशिया
आपल्या शरिरातील प्रत्येक स्नायू, हाड आणि सांधा ‘फेशिया’ नावाच्या जाळ्यासारख्या ऊतीद्वारे जोडलेले असतात. त्यामुळे शरिरातील अवयव एका जागेवर टिकून राहू शकतात. आपण व्यवहारात एखाद्या गोष्टीचे ‘पॅकिंग’ केले, तरीही काही वेळेस आतील गोष्टी जागेवरून सरकतात; मात्र देवाने दिलेल्या या ‘फेशिया’ नावाचे ‘पॅकिंग मटेरियल’ इतके सुंदर आहे की, ते आयुष्यभर अवयवांचे रक्षण करत असते. हे जाळे शरीरभर पसरलेले आहे. जसे ‘ट्रेन’चे डबे जोडलेले असतात, तसे हे एकमेकांशी जोडलेले असून ते एकत्रित काम करतात आणि त्यांना ‘फेशियल ट्रेन्स’ किंवा ‘फेशियल चेन’ म्हणतात. ‘फेशिया’ लवचिक असावी लागते. ‘दीर्घकाळ बसून रहाणे, व्यायामाचा अभाव, शरिराची चुकीची ठेवण’, या सर्व गोष्टींमुळे शरिरावर पडणार्या सततच्या ताणामुळे ‘फेशिया’ हळूहळू कोरडी, कठीण आणि चिकट होते. त्याचा परिणाम असा होतो की, शरिरात घट्टपणा आणि अवयव अखडणे जाणवू लागते. त्यामुळे ‘वेदना होणे, स्नायूंची लवचिकता न्यून होणे, हालचाल करायला अडचण आणि हालचाल मर्यादित होणे, एक अयवय दुखत असतांना दुसर्या भागात वेदना जाणवणे, जडपणा जाणवणे, हलकासा दाब पडला, तरीही वेदना होणे’, ही लक्षणे व्यक्तीच्या श्वासापासून चालण्यापर्यंत प्रत्येक हालचालीवर परिणाम करू शकतात.

७. ‘ट्रिगर फिंगर’ या आजारामध्ये उपचाराची पद्धत
या आजारात उपचार प्रामुख्याने ज्या भागात दुखते, तिथे केले जातात. त्या भागाला विश्रांती देणे, तेथे आधारपट्टी लावणे, औषधे आणि इंजेक्शन देणे किंवा आवश्यकता असल्यास शस्त्रकर्म केले जाते.
८. ‘ट्रिगर फिंगर’च्या समस्येचे स्वरूप
‘ही समस्या केवळ बोटांतच आहे’, असे बहुतेक वेळा रुग्णाला वाटते; मात्र शरीर केवळ स्वतंत्र भागांचा समूह नसून ते एकमेकांशी जोडलेल्या ‘फेशियल चेन’द्वारे कार्य करते. अशा परिस्थितीत काही रुग्णांमध्ये बोटातील लक्षणे ही दूरच्या भागातील मान, छाती, पाठ किंवा हातातील ‘फेशिया’च्या घट्टपणामुळे वाढलेली असू शकतात.
९. क्लिनिकल केस स्टडी !
एक ३५ वर्षांची साधिका प्रतिदिन अनुमाने १० घंटे संगणकीय सेवा करत असे. त्यांना गेल्या मासापासून त्यांच्या डाव्या हाताची २ बोटे वाकवतांना ‘कडकपणा जाणवणे, ताण येणे आणि बोटे पूर्णपणे वाकवता न येणे’, असा त्रास होऊ लागला.
९ अ. त्रासाचे निदान : पडताळणीनंतर ‘त्यांना ‘ट्रिगर फिंगर’ झाला आहे’, असे वैद्यकीयदृष्ट्या योग्य निदान झाले होते.
९ आ. साधिकेला ‘ट्रिगर फिंगर’ होण्याचे कारण : ‘ही समस्या स्वाभाविकपणे केवळ बोटांतच आहे’, असे त्यांना वाटत होते; मात्र ‘त्यांची जीवनशैली, काही वर्षे दिवसभरात १० घंटे सलग संगणकासमोर बसणे, शरिराची अयोग्य ठेवण आणि व्यायामाचा पूर्ण अभाव पहाता ‘त्यांच्या संपूर्ण वरच्या शरिरातील ‘फेशियल’ कडकपणा’ हा महत्त्वाचा घटक असू शकतो’, असे लक्षात आले.
९ इ. साधिकेची पडताळणी आणि निरीक्षण केल्यावर लक्षात आलेली सूत्रे !
१. साधिकेने कधीही नियमित व्यायाम केलेला नव्हता.
२. तिची मान आणि डोके पुढे झुकलेले (Forward Head Posture) होते.
३. तिच्या पाठीचा बाक वाढला (Thoracic Kyphosis) होता.
४. तिची मान, खांदे, छाती, पाठ आणि हात यांमधील स्नायूंमध्ये कडकपणा होता.
५. तिची मान, खांदा आणि पाठ यांची लवचिकता न्यून झाली होती.
६. तिने सलग बसून सेवा केल्यामुळे तिच्या शरिराच्या संपूर्ण वरच्या भागात एकत्रित ताण निर्माण झाला होता आणि त्यामुळे ‘फेशियल चेन’ घट्ट झाली होती.
९ ई. उपचाराची पद्धत आणि लाभ
९ ई १. उपचाराची पद्धत
अ. या रुग्णामध्ये उपचार, तसेच व्यायाम केवळ बोटांवर केंद्रित न करता मान, खांदे, छाती, पाठ आणि हात या संपूर्ण ‘फेशियल चेन’वर करण्यात आले.
आ. यासह लवचिकता टिकवणे आणि शरिराची ठेवण (पोश्चर) सुधारणे यांसाठी तिला नियमित करायचे व्यायाम प्रकार सांगण्यात आले.
९ ई २. उपचार केल्यावर झालेला लाभ
अ. साधिकेची मान, खांदे, छाती आणि हात यांतील स्नायू, तसेच ‘फेशिया’वरील ताण मोकळा केल्यानंतर तिच्या बोटांची हालचाल सहजतेने होऊ लागली.
आ. तिच्या अवयवांतील कडकपणा न्यून झाला.
इ. तिला होत असलेल्या वेदना लक्षणीयरित्या घटल्या.
९ उ. ‘केस स्टडी’वरून शिकायला मिळालेली सूत्रे
९ उ १. सर्वांगाचे व्यायाम करणे आवश्यक ! : शरीर एकसंध आहे. शरिराच्या एका ठिकाणातील ताणामुळे शरिराच्या दुसर्या भागात वेदना होऊ शकतात. प्रत्येक वेळी ज्या भागात वेदना असतात, तेथेच वेदनेचे कारण असते, असे नाही. त्यामुळे व्यायाम एकाच प्रकारचा (एकसारखे) आणि केवळ एका भागासाठी न करता विविध प्रकारचे अन् सर्वांगाला व्यायाम होईल, अशा पद्धतीने करायला हवा.
९ उ २. शरिराची हालचाल करणे अत्यंत आवश्यक ! : सलग बसून अथवा एका स्थितीत राहून काम केल्यास स्नायू आणि ‘फेशिया’ कडक होतात. त्यामुळे प्रत्येक २ घंट्यांनी ५ मिनिटे व्यायाम आणि उठून हालचाल करणे अत्यंत आवश्यक आहे.
९ उ ३. व्यायामाचा अभाव ‘फेशियाला’ कठीण बनवतो आणि अवयवांची लवचिकता न्यून झाल्यावर वेदना चालू होतात.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचारतज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (२७.१२.२०२५)
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !