दोन वर्षांपूर्वीचा २२ जानेवारीचा दिवस आठवा ! जेव्हा अयोध्येत (उत्तरप्रदेश) श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा देशात २ गट होते. एक गट भावूक होऊन रडत होता, तर दुसरा ‘बुद्धीजीवी’ गट प्रश्न विचारत होता, ‘मंदिराने काय पोट भरणार ? त्याऐवजी शाळा किंवा दवाखाने का बांधले नाहीत ?’ तेव्हा आपल्याकडे फक्त ‘भावना’ होत्या; पण ‘उत्तर’ नव्हते. आज २ वर्षांनंतर अयोध्येने स्वतःच त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हे उत्तर शब्दांचे नाही, तर आकडेवारीचे आहे. आज आपण अयोध्येची तुलना जगातील २ सर्वांत मोठ्या धार्मिक सत्ताकेंद्रांशी, म्हणजे व्हॅटिकन सिटी आणि मक्का यांच्याशी करणार आहोत. हे वास्तव वाचून प्रत्येक भारतियाची छाती अभिमानाने फुलून येईल.

१. अयोध्येची प्रचंड झेप
जगातील कोणत्याही पर्यटन स्थळाचे यश हे तेथील पर्यटकांच्या संख्येवर मोजले जाते.
अ. व्हॅटिकन सिटी : ख्रिस्ती जगाचे केंद्र असलेल्या व्हॅटिकनला वर्षाला अनुमाने ९० लाख पर्यटक भेट देतात.
आ. मक्का (सौदी अरेबिया) : हज आणि उमासाठी वर्षाला अनुमाने २ कोटी भाविक जातात.
इ. अयोध्या (भारत) : सरकारी आकडेवारीनुसार वर्ष २०२४ मध्ये अयोध्येत १६ कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली. वर्ष २०२५ च्या पहिल्या ६ मासांतच हा आकडा २३ कोटींवर गेला आहे.
अयोध्येतील पर्यटकांची संख्या मक्का आणि व्हॅटिकन यांच्या एकत्रित संख्येपेक्षा ८ ते १० पट अधिक आहे.
२. ४ लाख कोटी रुपयांची ‘टेंपल इकॉनॉमी’ (मंदिर अर्थव्यवस्था)
जागतिक ‘ब्रोकरेज फर्म’ (एक आर्थिक संस्था) ‘जेफ्रीज’ (Jefferies) आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया रिसर्च’ यांच्या अहवालानुसार श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेत केवळ एका वर्षात २५ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त कर महसूल जमा झाला आहे. जसे सौदी अरेबियाला तेलाच्या खालोखाल सर्वाधिक पैसा ‘मक्का’ पर्यटनातून मिळतो (१२ बिलियन डॉलर – १ लाख ९ सहस्र कोटी रुपयांहून अधिक), तसेच भारताने अयोध्येच्या माध्यमातून एक ‘रिसेशन प्रूफ’ (मंदीतही चालणारे) आर्थिक ‘मॉडेल’ उभे केले आहे.
३. ‘सॉफ्ट पॉवर’
भारताचा ‘विश्वगुरु’ होण्याचा मार्ग हा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे काय ?, तर शस्त्राचा वापर न करता जगावर प्रभाव पाडणे. श्रीराममंदिरामुळे भारताचा ‘ग्लोबल साऊथ’ (दक्षिण आशिया) आणि ‘पौर्वात्य संस्कृती’ यांवर प्रभाव वाढला आहे. आज नेपाळ, थायलंड, कंबोडिया आणि मॉरिशस यांसारखे देश भारताकडे केवळ ‘मित्र’ म्हणून पहात नाहीत, तर ‘सांस्कृतिक नेतृत्व’ म्हणून पहात आहेत.
४. भूमीचे भाव
वर्ष २०१९ मध्ये श्रीराम जन्मभूमीविषयीचा निकाल लागल्यानंतर अयोध्येतील भूमीचे भाव ९०० ते १००० टक्क्यांनी वाढले आहेत. ५ वर्षांपूर्वी जिथे एक गुंठा भूमी काही लाख रुपयांत मिळत होती, तिथे आज कोटी रुपयांची बोली लागत आहे. मोठी व्यावसायिक आस्थापने तिथे ‘७ स्टार’ हॉटेल्स आणि उपशहरे उभारत आहेत.
५. निष्कर्ष
दोन वर्षांपूर्वी आपण मंदिरात फक्त ‘देव’ पहात होतो. आज जग त्यात ‘देशाची प्रगती’ पहात आहे. श्रीराममंदिराने सिद्ध केले की, संस्कृती आणि विकास हे शत्रू नाहीत, तर ते एकमेकांचे साथीदार आहेत. जेव्हा श्रद्धा आणि अर्थकारण एकत्र येतात, तेव्हाच खर्या अर्थाने ‘रामराज्य’ अवतरते !
– मल्हार पांडे (साभार : संकेतस्थळ)
‘स्मार्ट’ फसवणूक !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !