साधक आणि त्याची बहीण यांना वाराणसी येथील आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

‘७ ते १५.११.२०२५ या कालावधीत मी आणि माझ्या परिवारातील १२ सदस्य तीर्थयात्रेच्या निमित्ताने काशी, प्रयाग, गया, अयोध्या आणि चित्रकूट या ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला वाराणसी येथील आश्रम पहाण्याची संधी मिळाली. 

श्री. यशवंत वसाने

१. आश्रमातील सर्व साधकांना भेटल्यावर एका वेगळ्या विश्वात गेल्याप्रमाणे वाटणे 

‘मी आश्रमाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर मला पुष्कळ प्रसन्न आणि शांत वाटत होते. आश्रमातील सर्व साधकांना भेटल्यावर मला एका वेगळ्या विश्वात गेल्याप्रमाणे वाटत होते. मला पुष्कळ आनंद जाणवत होता. तेथील साधकांनी आम्हाला सर्व आश्रम दाखवला.

२. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची भेट झाल्यावर त्यांना पाहूनच माझी भावजागृती झाली. सद्गुरु नीलेशदादा यांच्याशी बोलतांना वेळ कसा गेला, ते आमच्या लक्षातच आले नाही. 

३. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना निर्विचार स्थिती अनुभवणे आणि हलकेपणा जाणवणे  

सर्व साधकांचा निरोप घेऊन आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघालो. तेव्हा सहसाधिकेने ध्यानमंदिरात बसून ५ ते १० मिनिटे नामजप करण्याची आठवण करून दिली. मी सर्व कुटुंबियांसह ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. त्या वेळी माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मी निर्विचार स्थिती अनुभवत होतो. त्या वेळी ‘माझे शरीर पुष्कळ हलके झाले आहे. मी अधांतरी तरंगत आहे. मी आनंदावस्था अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘ही स्थिती कायम अशीच रहावी’, असे मला वाटत होते.

४. साधकाची बहीण ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना तिला तिच्या गुरूंचे दर्शन होणे  

माझ्या समवेत माझी लहान बहीण श्रीमती मंगला सैंदाणे (वय ७५ वर्षे) होती. तीही ध्यानमंदिरात बसून नामजप करत होती. ती सद्गुरु वामनराव पै यांच्या संप्रदायानुसार साधना करते. माझा नामजप झाल्यावर मी सहज तिच्याकडे पाहिले. तेव्हा मला दिसले, ‘तिच्या डोळ्यांतून भावाश्रू ओघळत आहेत.’ त्या वेळी आम्हा दोघांत पुढील संवाद झाला.

मी : तुला कसे वाटले ?

श्रीमती मंगला : मला येथेच रहावेसे वाटते.

मी : असे का वाटते ?

श्रीमती मंगला : आश्रम तुमच्या गुरूंचा आहे; पण येथे ‘माझ्यासमोर माझे गुरु सद्गुरु वामनराव पै बसले आहेत आणि ते स्मित करत आहेत’, असे मला जाणवले. तेसुद्धा नामजप करत होते. ते पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही इथे कसे ?’ तर ते म्हणाले, ‘‘मी तुझ्या समवेत आश्रम पहायला आलो होतो.’’ तेवढ्यातच तू मला हाक मारलीस.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील कृपेमुळे मला आणि माझ्या बहिणीला वाराणसी आश्रमात अनुभूती आल्या. ‘हे लिखाण करण्याविषयीचे विचार गुरुमाऊलीने सुचवले आणि माझ्याकडून लिहून घेतले’, त्याबद्दल मी श्री गुरुमाऊलींच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.११.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक