‘तरुणपणापासून ‘ज्याला’ सतत आव्हान दिले होते आणि जो ‘त्यांच्या’ समोर येण्यास धजत नव्हता, तो ‘मृत्यू’ आता ‘स्वातंत्र्यविरां’च्या शय्येपाशी येऊन उभा होता अन् त्याच्या स्वाधीन होण्यास स्वातंत्र्यवीरही आनंदाने सिद्ध होते.
२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सकाळी ११ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचा देह मृत्यूला अर्पण केला. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यविरांनी अखेरच्या क्षणी मृत्यूला कवटाळले. ते पाहून लोक म्हणतात, ‘सावरकर यांनी तर आत्महत्याच केली’; परंतु ‘आत्महत्या’ आणि ‘आत्मार्पण’ यांत भेद आहे. स्वतः सावरकरच लिहितात, ‘अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतांनाही सुखाने जगता येत नाही; म्हणून अत्यंत अतृप्त अशा मनःस्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणतः ‘आत्महत्या’ म्हटले जाते; परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू पूर्णपणे यशस्वी झालेला आहे, अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ असे म्हणतात.’ म्हणून २६ फेब्रुवारी हा सावरकर यांचा ‘आत्मार्पण’ दिन ! २६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी या ऐतिहासिक घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली.
२६ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारताला ‘महासत्ता’ बनवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जाणीवपूर्वक कार्यवाहीत आणणे आवश्यक, काय होता सावरकर यांचा विचार ? आणि सावरकर यांनी कशाकशाचा विचार केला ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1012244.html

५. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरुणांना केलेले आवाहन
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी जेव्हा खंडित का होईना; पण भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सावरकर यांनी ‘सावरकर सदनावर लोकशाही भारताचा राष्ट्रध्वज आणि अखंड भारताचे प्रतीक म्हणून हिंदुध्वज लावला.’

ते म्हणाले, ‘एवढा एकसंध भारत गेल्या कित्येक शतकात एका छत्राखाली आला नव्हता. जे गेले त्याविषयी वेदना जरूर हवी; पण जे मिळाले त्याचा आनंद त्यामुळे झाकोळून जाता कामा नये’; मात्र स्वातंत्र्य दृष्टीपथात आल्यावर आणि स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही सावरकर यांच्या मनात सतत मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अन् अबाधित राखण्यासाठी काय काय करावे, याचेच चिंतन आणि मनन चालू असायचे.
भारतीय तरुणांना त्यांनी कळकळीचे आवाहन केले, ‘‘सशस्त्रदलात प्रवेश करा आणि संरक्षणाच्या दृष्टीने देशाला अजिंक्य बनवा. आपले भूदल, नौदल, हवाई दल सुसज्ज बनवा. इतर राष्ट्रे हायड्रोजन बाँब निर्मिती करत असली, तर तुम्ही ऑक्सिजन बाँब शोधून काढा. असे केले, तरच तुम्ही भारताला समर्थ नि समृद्ध राष्ट्र बनवू शकाल नि स्वाभिमानाने जीवन जगू शकाल. तुमच्या लढाऊ विमानांनी, आकाशयानांनी नि जेट विमानांनी आकाश आच्छादित होऊन जाऊदे आणि शत्रूपासून तुमच्या सागराचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या युद्धनौका सुसज्ज संचार करत राहू देत.’’
६. सावरकर यांची पाकिस्तान आणि चीन यांच्याविषयी दिलेली सावधानतेची चेतावणी अन् शासनकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम
‘भारताने सावध राहिले पाहिजे आणि शस्त्रसामर्थ्याने राष्ट्रस्वातंत्र्य टिकवले पाहिजे’, हाच ध्यास सतत त्यांच्या मनात होता. देशात उत्पादन वाढावे नि समृद्धी व्हावी, यासाठी अवश्य उद्योग केला पाहिजे; परंतु हे करतांना राष्ट्र संरक्षणाच्या सिद्धतेचा मात्र विसर पडता कामा नये. संरक्षणाची योग्य ती व्यवस्था नसेल, तर देशाच्या उत्कर्षाच्या नि उत्पादनाच्या सर्व योजना अंती निष्फळ ठरतील, असे त्यांचे चिंतन होते. त्यामुळेच ‘देश एकदा स्वतंत्र झाला, म्हणजे त्याचे स्वातंत्र्य पुढे आपोआप अबाधित टिकून राहील, ही कल्पनाच चुकीची आहे. स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी अखंड दक्षता नि सिद्धता आवश्यक आहे’, असे परोपरीने सावरकर सांगत होते. ‘सैनिकी सामर्थ्य हेच कोणत्याही देशाच्या श्रेष्ठतेचे गमक असते’, असे सांगून पाकिस्तान आणि चीन यांच्या हालचालींचा वेध घेत तत्कालीन नेत्यांना अन् जनतेला सावधानतेची चेतावणी सावरकर देत होते; पण अखेर विपरीत तेच घडले.
सावरकर यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले. २० ऑक्टोबर १९६२ या दिवशी चीनच्या सैन्याने मॅकमोहन सीमेवर नि लडाखमध्ये आत घुसून भारतावर आक्रमण केले. हाताशी असलेल्या अपुर्या युद्धसाहित्याचा उपयोग करून भारतीय सैन्य मोठ्या शौर्याने लढले. तरीही शेवटी अपरिहार्यतः माघार घ्यावी लागली आणि सार्या देशाची मान लज्जेने खाली आली. भारतीय सैन्याची ही असाहाय्य स्थिती पाहून सावरकर यांच्या मनाला अतिशय यातना झाल्या. भारतीय सैन्य चिनी सैन्याशी प्राणपणाला लावून लढले होते; परंतु शत्रूच्या सुसज्ज नि प्रचंड सैन्यबळापुढे त्यांना हार खावी लागली होती. सावरकर यांच्या सर्व समयोचित चेतावण्या पालथ्या घड्यावर पडलेल्या पाण्यासारख्या निष्फळ ठरल्या होत्या.
‘सावरकर’ हेच नाव इतिहासात सर्वाधिक बहुमानाचे ठरणार आहे !

‘हे मातृभूमि तुजला मन वाहियले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियले ।।
तुतेचि अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला ।।’
असे म्हणत सारे आयुष्य मातृभूमीच्या मुक्तीच्या तळमळीने भारलेले असूनही सावरकर यांना कोणताही राजमान्य किताब मिळाला नाही; पण आज असे वाटत आहे, ‘कोणताही बहुमान ‘हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या नावापुढे थिटाच आहे.’ ‘सावरकर’ हेच नाव आता इतिहासात सर्वाधिक बहुमानाचे ठरणार आहे. कुणी सांगावे एक दिवस असा येईलही की, ज्या दिवशी हिंदु राष्ट्रातील सर्वाेच्च राष्ट्रविराचा सन्मान ‘सावरकर’ हा बहुमान देऊनच केला जाईल ! वन्दे मातरम् !’
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर (१३.१.२०२६)
७. पाकच्या आक्रमणाला भारतीय सैन्याने दिलेले ‘जशास तसे’ प्रत्युत्तर आणि सावरकर यांच्या विविध राजकीय भविष्यवाण्या खर्या होणे
प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतः मृत्यूच्या दारात असतांनाही या महापुरुषाचे लक्ष होते, काश्मीर, पंजाब, राजस्थानचे वाळवंट, कच्छचे रण, आकाशात झेपावत जाऊन शत्रूचे रडार फोडणारे धाडसी वैमानिक, आमच्या ध्वजाखाली लढणार्या आणि वैयक्तिक अन् सामूहिकपणे रणनीतीचे असामान्य आदर्श निर्माण करणारे सैन्यदल यांकडे ! मृत्यूच्या द्वारी उभे असलेले सावरकर चिंता करत होते राष्ट्राची ! सांगत होते, ‘पाकिस्तान जे जे आक्रमक पाऊल टाकेल, त्याला तात्काळ ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले पाहिजे, मग हे प्रतिशोधाचे प्रत्युत्तर सैनिकी स्वरूपाचे असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे असो.
अखेर सावरकर यांची आशंका नि भविष्यवाणी खरी ठरली.१ सप्टेंबर १९६५ या दिवशी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले; परंतु ‘एका गालावर मारले, तर दुसरा गाल पुढे करावा’, हे धोरण सोडून आक्रमकाला पिटाळून लावण्याचा भारताने चंग बांधला. संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत घोषणा केली, ‘चढाईचा पवित्रा घेऊन भारतीय सैन्य ३ बाजूंनी लाहोर विभागात घुसले आहे’, हे ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सफल, कृतार्थ आणि धन्य झाले ! भारत-पाक युद्धातील ‘भारताचा पराक्रम, मुलुखगिरी आणि शक्ती सामर्थ्य संवर्धन पाहून देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे’, असे संपूर्ण समाधान त्यांना वाटले अन् या समाधानी मनःस्थितीतच ‘आत्मार्पणा’चे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. ‘शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालवणे, हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे’, असे सावरकर सदोदित म्हणत असत. आजचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ (सैन्याने केलेली लष्करी कारवाई) सावरकर यांचा हाच विचार कृतीत उतरवल्याचे स्पष्टपणे दर्शवत आहे. आज खात्री वाटते की, सावरकर यांच्या राजकीय भविष्यवाणीतील एकही गोष्टी खोटी ठरली नाही. त्यांची हिंदु राष्ट्राच्या पुनरुत्थानाची कल्पनाही खोटी ठरणार नाही. ‘हिंदूंचे सैनिकीकरण करा’ आणि ‘राजकारणाचे हिंदूकरण करा’, यांतील पहिला टप्पा आज जवळजवळ पूर्ण झाला आहे अन् दुसराही इष्टीच्या टप्प्यात आहे.
८. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे असलेले धैर्य आणि त्यांच्या विचारांची आता येत असलेली प्रचिती
आजही सावरकर यांच्या विचारप्रणालीशी प्रामाणिक मतभेद होऊ शकतील; पण त्यांनी जी विचारप्रणाली पोटतिडकीने लोकांसमोर मांडली, ती या राष्ट्रावरील नितांत प्रेमामुळे ! याविषयी मात्र कोणताही मतभेद होणार नाही. सावरकर यांचे विचार, कृती, लेखन आणि कार्य यांमागील राष्ट्रकल्याणाची तळमळ कुणालाही नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुत्ववाद राजकीयदृष्ट्या पुष्कळांना अमान्य होण्यासारखा असला, तरी हिंदु समाजाचे बलशाही उत्थापन करण्यासाठी त्यांनी जी बुद्धीवादी आणि विज्ञानवादी दृष्टी स्वीकारली, ती मात्र सर्वमान्य होण्यासारखीच आहे. त्यांनी ज्या सुधारणा मान्य केल्या, त्या प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे धैर्यही त्यांच्यापाशी होते. राजकीय सत्तेशी झुंज खेळण्यास जितके धैर्य असावे लागते, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक धैर्य समाजाच्या अंधश्रद्धेला आणि पूर्वग्रहांना धक्का देऊन नवे प्रतिपादन करण्यास लागते. स्वातंत्र्यविरांपाशी हे दोन्ही प्रकारचे धैर्य होते. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक राजकीय आणि सामाजिक विचारांचे महत्त्व आज आपल्याला पटत आहे. सावरकर काळाच्या कितीतरी पुढे जाऊन उभे होते, याची आज प्रचिती येत आहे.
शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिन्ता प्रवर्तते ।
अर्थ : शस्त्राने पूर्णतः रक्षण केलेल्या राष्ट्रात शास्त्रांचे अध्ययन/चर्चा किंवा विकास होऊ शकतो.
या वचनाची आता राष्ट्राला चांगली जाणीव झाली आहे.
(समाप्त)
– डॉ. (सौ.) शुभा साठे, नागपूर (१३.१.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?