धन्योऽहं धन्योऽहं !

धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किञ्चित् ।
धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमत्र सम्पन्नम् ॥ – अवधूतोपनिषत्, श्लोक ३२

अर्थ : मी धन्य आहे, मी धन्य आहे, आता माझे कोणतेही कर्तव्य शेष राहिले नाही. मी धन्य आहे, मी धन्य आहे, मला जे प्राप्त करायचे आहे, ते सर्व मला येथे प्राप्त झाले आहे.

‘तरुणपणापासून ‘ज्याला’ सतत आव्हान दिले होते आणि जो ‘त्यांच्या’ समोर येण्यास धजत नव्हता, तो ‘मृत्यू’ आता ‘स्वातंत्र्यविरां’च्या शय्येपाशी येऊन उभा होता आणि त्याच्या स्वाधीन होण्यास स्वातंत्र्यवीरही आनंदाने सिद्ध होते. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी सकाळी ११ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांचा देह मृत्यूला अर्पण केला. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यविरांनी शेवटच्या क्षणी मृत्यूला कवटाळले, ते पाहून लोक म्हणतात, ‘सावरकर यांनी तर आत्महत्याच केली’; परंतु ‘आत्महत्या’ आणि ‘आत्मार्पण’ यांत भेद आहे. स्वतः सावरकरच लिहितात, ‘अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतांनाही सुखाने जगता येत नाही; म्हणून अत्यंत अतृप्त अशा मनःस्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणतः ‘आत्महत्या’ म्हटले जाते; परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू पूर्णपणे यशस्वी झालेला आहे, अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ असे म्हणतात.’ म्हणून २६ फेब्रुवारी हा सावरकर यांचा ‘आत्मार्पण’ दिन !

स्वतःचे कर्तव्य पार पडले आहे, आता कर्तव्य काही उरले नाही. या उदात्त भावनेने कृतकृत्य होऊन आयुष्याची इतिश्री करणार्‍यांची भारतीय परंपराच आहे. कुमारिलभद्र, आद्यशंकराचार्य, श्रीचैतन्य महाप्रभु, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदासस्वामी, संत एकनाथ, जगद्गुरु संत तुकाराम या थोर महान परंपरेत स्वातंत्र्यवीर सावरकरही जाऊन बसले ! जन्मभर मृत्यूला आव्हान देऊन त्याच्याशी झुंज घेणार्‍या आणि त्याला पराभूत करणार्‍या सावरकर यांनी ‘प्रायोपवेशन’ (मृत्यू येईपर्यंत उपोषण) करून मृत्यूला आलिंगन दिले. आज या ऐतिहासिक घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली.

१. भारताला ‘महासत्ता’ बनवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जाणीवपूर्वक कार्यवाहीत आणणे आवश्यक !

मृत्यूनंतर ‘विनायक दामोदर सावरकर’ नामक मृत्तिकावत् देह विद्युत्दाहिनीच्या स्वाधीन झाला आणि नष्टही झाला; पण देह गेला, तरी त्या व्यक्तीमत्त्वाच्या आठवणी इतरांच्या कायम स्मरणात असतात. कालांतराने आठवणीही विस्मरणात गेल्या तरी ‘विचार’ चिरंतन असतो. तो ‘विचारच’ पिढ्यान्‌पिढ्यांना अविरतपणे मार्गदर्शन करत असतो.

डॉ. (सौ.) शुभा साठे

आज भारतासमोर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जायचे, तर राजकीय, परराष्ट्रीय, आर्थिक, औद्योगिक, शेती आणि सुरक्षा यांच्याविषयीच्या धोरणांची आखणी करायला हवी. यासमवेतच आतंकवादाची पाळेमुळे उखडून टाकायची आहेत. आसाम, ईशान्येकडील राज्ये, बांगलादेशातून घुसखोरी आणि पाकव्याप्त काश्मीर यांचे प्रश्नही सोडवायचे आहेत. हिंदुत्व मनामनांत रुजवायचे आहे. सैन्याचे सबलीकरण करून शस्त्रास्त्रांविषयी अद्ययावत् बनायचे आहे. थोडक्यात भारताला ‘महासत्ता’ बनायचे आहे. त्यासाठी एकमेव रामबाण इलाज, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक कार्यवाहीत आणायला हवे. त्या विचारांचे चिंतन आणि मनन करून प्रत्येकाने कृतीशील योगदान द्यायला हवे.

२. काय होता सावरकर यांचा विचार ?

एका वाक्यात सांगायचे, तर असे म्हणता येईल, ‘जे जे राष्ट्रहितार्थ, ते ते जोपासायचे आणि जे जे राष्ट्रहितास घातक, राष्ट्राच्या प्रगतीस बाधक ते ते त्याज्य !’ वैयक्तिक जीवनात सावरकर यांनी स्वार्थाला कधीच स्थान दिले नाही; पण राष्ट्राविषयी मात्र ‘राष्ट्रीय स्वार्थालाच’ प्राधान्य दिले. ‘ज्या राष्ट्राशी मैत्री केल्यावर आपल्या देशाचा लाभ होणार आहे, त्याच राष्ट्राशी सख्य जोडायचे. आपल्या प्रगतीच्या आड जो येईल तो शत्रू !’, हीच त्यांची स्वच्छ, स्पष्ट आणि सुलभ अशी नीती होती. ‘राष्ट्रहितापलीकडे कोणताच विचार नाही, योग्य-अयोग्य ठरवण्याची कसोटी एकच – राष्ट्रहित !’ मग तिथे कुणाच्या भावना, हितसंबंध जोपासणे नाही कि मतपेट्यांचा विचार नाही. सद्यःस्थितीत आपल्या सगळ्यांचाच ‘अर्जुन’ झाला आहे. अशा वेळेस योग्य मार्ग दाखवणार्‍या श्रीकृष्णाची आवश्यकता आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारच श्रीकृष्णाची भूमिका निभावणार आहेत.

३. सावरकर यांनी कशाकशाचा विचार केला ?

अ. सावरकर यांच्या मते ‘हिंदुत्व’ हा भारताचा आत्मा आणि तेच त्यांचे वेदकाळापासून आजपावेतो टिकून राहिलेले स्वत्व ! याच स्वत्वाचा विचार त्यांनी केला.

आ. ‘राष्ट्र’ ही काल, आज आणि उद्याही प्रभावी प्रेरणा रहाणार असल्यामुळे त्यांनी ‘हिंदु राष्ट्रवादाचा’ विचार केला.

इ. राष्ट्राच्या या मूलभूत विचारांसमवेतच राष्ट्रभाषा, राष्ट्रलिपी आणि राष्ट्रध्वज या राष्ट्राच्या विविध अंगांचा विचार केला.

ई. हे राष्ट्र जागतिक संघर्षात मानाने जगायला हवे. असे असेल, तर ते विज्ञाननिष्ठ आणि अद्ययावत् पाहिजे; म्हणून विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला.

उ. अस्पृश्यता आणि विटाळ या कल्पनांचा उच्छेद झाल्याविना राष्ट्र संघटित होणार नाही; म्हणून जात्युच्छेदनाचा विचार मांडला.

ऊ. सत्य, हिंसा-अहिंसा यांचा सूक्ष्म विचार करून इतिहासातील चुकांचे परीक्षण करून मर्मस्थाने आणि बलस्थाने स्पष्ट करण्यासाठी इतिहास लिहिला. त्यातूनच काही त्रिकालाबाधित विचार मांडला. उदाहरणार्थ ‘जशास तसे’, ‘शहास प्रतिशाठ्यम्’, ‘सद्गुण विकृती’.

ए. स्वभाषाभिमान हा राष्ट्रभावनेचा महत्त्वाचा घटक म्हणून भाषाशुद्धीचे विचार मांडले आणि या सगळ्यातून राष्ट्र सबलीकरणाचा मार्ग सांगितला.

सावरकर यांचे वैशिष्ट्य हे आहे की, ते केवळ विचार करून किंवा मांडून थांबले नाहीत, तर त्या विचारांच्या अनुरोधाने समाज परिवर्तन करण्याकरता लोकप्रियता तुच्छ मानून सेनापती आणि सैनिक म्हणूनही जिवापाड झटले. तलवारीने लिहिले आणि दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन लढले. त्यांचे विचार, आचार आणि उच्चार यांमध्ये कुठेही विसंगती दिसत नाही. म्हणूनच सावरकर यांना हिंदुस्थानच्या एका श्रेष्ठ निर्मात्याला समग्रपणे आणि सम्यकपणे समजून घेणे आवश्यक आहे. आंधळा जयजयकार किंवा कुत्सित उपेक्षा अथवा पूर्वग्रहजन्य राग यांना दूर सारले पाहिजे.

४. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी झुंजणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

सावरकर जे जीवन जगले, त्या जीवनाला एक निश्चित हेतू होता, ध्येय होते. त्यांनी एक निश्चित जीवितकार्य स्वीकारले होते आणि तेही वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ! चापेकर बंधूंच्या हौतात्म्याने त्यांच्यातील शत्रूंजयवृत्ती चेतावली गेली आणि ते कुलदेवीच्या चरणांना स्पर्श करून प्रतिज्ञाबद्ध झाले. ‘माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून चापेकरांसारखा ‘शत्रूशी मारिता मारिता मरेतो झुंजेन !’ किंवा छत्रपती शिवाजी यांच्यासारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करीन !’, हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा साधनांशी तडजोड केली, बाण पालटले; पण लक्ष्य तेच कायम ठेवले. स्वातंत्र्याच्या प्रश्नावर मात्र कधीच तडजोड केली नाही. ‘प्राण कि स्वातंत्र्य ?’, यामध्ये ‘प्राण’ गेला, तरी बेहत्तर; पण ‘स्वातंत्र्य’ मिळवणारच !’, या शपथेला ते अखेरपर्यंत जागले.

सावरकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच स्वप्ने पडत होती, ती या देशाच्या अस्मितेची, पराक्रमाची, स्वयंतेजाची ! त्यांना ध्यास होता तो राष्ट्राच्या आत्मोद्धाराचा आणि त्यांची प्रतिज्ञा होती ती प्रकाशपूजनाची ! अस्मितायुक्त, स्वयंपूर्ण आणि स्वायत्त भारत हे त्यांचे सर्वांत मोठे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘वेडे’ म्हणणारे लोक होतेच; पण ‘इतिहास’ घडवणारी माणसे अशीच वेडी असतात ! ही माणसे स्वतः पलीकडचा पुष्कळ मोठा कालखंड पाहू शकतात. ‘तोरण’ बाधणार्‍या बाल शिवाजीला जे दिसले, तेच सावरकर यांनाही दिसले असले पाहिजे; म्हणूनच स्वतःच्या सर्वस्वाचा होम करून पराक्रमाचा एक उत्तुंग आदर्श त्यांनी निर्माण करून ठेवला. अखेरपर्यंत हा माणूस सेनानी आणि सैनिक होता, त्यांच्या कानात घुमत होती गर्जना, ‘हर हर महादेव !

जय एकलिंगजी !’

(क्रमशः)

– डॉ. शुभा साठे, नागपूर (१३.१.२०२६)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1012548.html