संपादकीय : शहरी नक्षलवादाची मुळे उखडा !

देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात अर्थात् जे.एन्.यू.मध्ये २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री साम्यवादी गटाच्या १०० ते १५० विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) गटाच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक आणि हिंसक आक्रमण केले. त्यात २ विद्यार्थी गंभीर घायाळ झाले. साम्यवादी विद्यार्थी येथे नेहमीप्रमाणेच आंदोलन (कि दहशत निर्माण ?) करत होते आणि त्या वेळीच त्यांनी विद्यापिठाच्या परिसरात ही दंगल करून हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. जे.एन्.यू.च्या कुलगुरु डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी दलित विद्यार्थ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा कांगावा करून हे विद्यार्थी आंदोलन करत होते आणि याच शहरी नक्षलवाद्यांनी हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांवर हे आक्रमण केले. आता पत्रकारिता, समाजमाध्यमे, तसेच लेखक, शिक्षक, विद्यार्थी, समाजसेवक, अभिनेते आदी सर्व स्तरांवर लपून राहिलेल्या शहरी नक्षलवाद्यांना शोधून त्यांचा बीमोड करण्याचे सरकारने मनावर घेतले पाहिजे; कारण जोपर्यंत शहरी नक्षलवाद संपत नाही, तोपर्यंत नक्षलवादाचा पूर्ण बीमोड होणे केवळ अशक्य आहे. केंद्रशासनाने जंगली नक्षलवाद संपवण्याचे मनावर घेतले आणि करून दाखवले, आता त्याचा उत्तरार्ध हिंदू आणि भारतीय नागरिक यांना पहायचा आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये अशाच प्रकारे जे.एन्.यू.मधील साम्यवादी विद्यार्थ्यांनी दंगल करून हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांना मारण्यासाठी हॉकीच्या आणि अन्य काठ्या आणल्या होत्या. त्या वेळी दंगल करण्यासाठी बाहेरील माणसे विद्यापिठात घुसल्याचे उघडकीस आले होते. आताच्या प्रसंगातही तीच शक्यता दाट आहे. संघ किंवा भाजप यांच्या धोरणानुसार त्यांनी साम्यवाद्यांचा अड्डा असलेल्या जे.एन्.यू. विद्यापिठात साम्यवाद्यांची दादागिरी न्यून करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ किंवा राष्ट्रवादी विचारांची त्यांची अभाविप ही संघटना चांगल्या प्रकारे सक्रीय केली. त्यामुळे तेथील राष्ट्रद्रोही कुकृत्ये निदान बाहेर तरी येऊ लागली. तेथे राष्ट्रवादी विचारांचे शिक्षकही नेमण्याचा प्रयत्न झाला; परंतु तेथील शहरी नक्षलवाद्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या साम्यवादी विद्यार्थ्यांचा राष्ट्र आणि धर्म द्वेष काही न्यून झालेला नाही; कारण त्यांचे स्रोत वेगळे आहेत. यात साम्यवादी विद्यार्थ्यांना अतीकठोर शिक्षा झाली नाही, तर हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थ्यांचे कायमचे खच्चीकरण होऊ शकते. अशा साम्यवाद्यांच्या ‘अड्ड्यां’मधील नक्षलवादी हिंसाचार पूर्णपणे मोडून काढणे, हे विद्यापीठ प्रशासनासह शिक्षण विभागाचेही दायित्व रहाते.

शहरी नक्षलवाद्यांचे वैचारिक आणि आर्थिक स्रोत तोडा !

एकेकाळी लपूनछपून आतंकवाद किंवा नक्षलवाद यांचे समर्थन करणारे येथील साम्यवादी विद्यार्थी आता अतिशय उग्रपणे जंगली नक्षलवाद्यांचा पुरस्कार करत आंदोलन करतात, हे अधिक चिंताजनक आहे. ‘हा केवळ वैचारिक मतभेद आहे’, असे गोंडसपणे माध्यमांनी म्हणणे, ही माध्यमांचीही दिवाळखोरी आहे. हा राष्ट्रविरोध आहे; किंबहुना राष्ट्र्रद्रोह आहे. हिडमा नावाच्या कुख्यात नक्षलवाद्याला गेल्या वर्षी नोव्हेंबर मासात सुरक्षा यंत्रणांनी ठार केल्यावर ‘प्रत्येक घरातून हिडिमा निघेल’, अशा घोषणा देत देहलीचे रस्ते अडवले गेले. या विद्यार्थ्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य राष्ट्रविघातक ठरत आहे, याची जाणीव त्यांच्या पालकांनीही त्यांना करून देणे आवश्यक आहे. अर्थात् अशा प्रकारची मुले इतकी स्वकेंद्रित झालेली आहेत की, जी कुणालाच जुमानत नाहीत. वर्ष २०२३ मध्ये प्रक्षोभक भाषणे, उद्घोष, आंदोलने करणार्‍यांना दंडापासून आणि विद्यापिठातून हकालपट्टी करण्यापर्यंत नियम केले आहेत. तरीही त्याचा धाक विद्यार्थ्यांना नाही. आतापर्यंत काही विद्यार्थ्यांवर दंडआकारणी आदी कार्यवाही होत आहे; मात्र तरीही त्याचा काही परिणाम झालेला नाही. याचाच अर्थ ‘काही विद्यार्थ्यांचा उद्देश केवळ शिक्षण नव्हे, तर वर्षानुवर्षे या विद्यापिठात राहून हिंदुविरोधी वातावरण अबाधित ठेवणे हा आहे’, असेच वाटते. त्यामुळे आतातरी या विद्यार्थ्यांवर काय कारवाई होणार ? हे पुढे आले पाहिजे. शिक्षण घेण्याच्या ठिकाणी राष्ट्रद्रोही कारवायांची पाळेमुळे रुजली आहेत आणि आतापर्यंत ती मुळापासून न उखडली गेल्यामुळे विद्यार्थी-पत्रकारिता-माध्यमे-लेखन-कार्यकर्ते-ते थेट जंगली नक्षलवादी, अशी त्यांची साखळी (एक प्रकारची ‘इकोसिस्टम’) आहे. नेमके कुठले प्रवाह त्यांना तरुणवयात चुकीच्या दिशेने प्रभावित करून देशविरोधी बनवत आहेत आणि त्यांचे तारुण्यच नव्हे, तर पूर्ण जीवन व्यर्थ करत आहेत, ते वैचारिक प्रवाह रोखले गेले पाहिजेत. जसे जंगली नक्षलवाद्यांचे आर्थिक स्रोत रोखले गेले, तसे या विद्यार्थ्यांना ‘मार्गदर्शन’ करणार्‍यांचे आर्थिक स्रोत रोखले गेले पाहिजेत. सरकारने पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा संशय असणार्‍या शहरी नक्षलवाद्यांना कारागृहातून मुक्त केले. हेच या विद्यार्थ्यांचे आदर्श असू शकतात. वर्ष २०२१ मध्ये झालेली ‘डिस्मेंटलिंग हिंदुत्व’ (हिंदुत्वाचा विध्वंस) यांसारखी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषद हे त्यांचे वैचारिक स्रोत असू शकतात. या परिषदेची सहप्रायोजक अमेरिकेतील ५० हून अधिक विद्यापिठे होती. ‘हिंदुत्व विचारसरणी दलितांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारी आहे’, हे दाखवण्यासाठी ही परिषद होती. जे.एन्.यू. विद्यापिठातील आताच्या दंगलीचे मूळ कारण कुलगुरूंचे दलितविरोधी वक्तव्य असल्याचे ठरवून त्याला विरोध करणे, हेच आहे. हे विलक्षण साम्य दंगलीचे वैचारिक स्रोत कुठपर्यंत जातात, हे उघड करते. ‘सर्व डोळे गाझावर’ यांसारखी आंतरराष्ट्रीय ‘टूलकीट’ किंवा सोनम वांगचुक यांच्यासारख्यांची आंदोलने, ही या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असतात. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही अमेरिकेत हिंदुविरोधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने ‘हिंदुत्व ही नाझीवादी, अल्पसंख्यांकविरोधी, नागरी हक्कांची पायमल्ली करणारी विचारसरणी’, असे पसरवले गेले. या आर्थिक महासत्तेच्या स्रोताकडून येणारी विचारसरणी नाही म्हटले, तरी सर्व जगावर प्रभाव टाकते. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अग्नीशामक पावडर फेकणे, यांसारख्या भयानक कृती करण्याची मनोवृत्ती ही महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या सामान्य विद्यार्थ्याची नसते, तर द्वेषाने भरलेल्या विचारसरणीतून आलेल्या जिहाद्याची असते. समता, राज्यघटना आदी गोष्टी अशा दंगलीतील कुठल्या वैचारिकतेशी साम्य दाखवतात ? कुठले अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कुठल्या लोकशाहीच्या नियमात बसतात ? याची उत्तरे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना प्रसिद्धीमाध्यमे अन् सरकार विचारणार का ? त्यांनी ती विचारली पाहिजेत. साम्यवाद्यांनी आतापर्यंत अनेक हत्याकांडे केल्याचा इतिहास आहे. त्याची ‘री’ ओढत हे विद्यार्थी चुकीच्या पायंड्यावरून जात आहेत. ‘या हिंदूबहुल देशात कडक कायदा आणि सुव्यवस्था आहे’, याचीही जाणीव करून दिली पाहिजे; अन्यथा विद्यापिठाच्या माध्यमातून फोफावलेला शहरी नक्षलवाद कधी शमणारच नाही !

जंगली नक्षलवादाप्रमाणे जे.एन्.यू. विद्यापिठातील साम्यवादी विद्यार्थ्यांच्या रूपातील शहरी नक्षलवादही संपवणे आवश्यक !