देवनागरी लिपीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह !

आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता. स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्म, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे, यांविषयी दोघांमध्येही बर्‍यापैकी एकवाक्यता होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह

१. वीर सावरकर यांनी परकीय शब्दांना सुटसुटीत, चपखल अन् अर्थवाही मराठी प्रतिशब्द देणे

महाराष्ट्रात बहुतेकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीचे कार्य किमान ऐकून तरी ठाऊक असते. इंग्रज, अरब, तुर्क, अफगाण इत्यादी परकीय राज्यकर्ते आणि आक्रमक यांच्या प्रभावामुळे भारतीय भाषांमध्ये तुर्की, फारसी, अरबी, इंग्रजी अन् अन्य परभाषिक शब्द मिसळले. ‘परकीय शब्दांपासून सुटका करणे, म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीचे एक अंग आहे’, हा सावरकर यांचा विचार होता.

१३ शतके विविध राज्यकर्त्यांच्या गुलामीत घालवल्यानंतर स्वतःचे राज्य स्वतः मिळवलेल्या भारतियांनी फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरते मर्यादित न रहाता सर्व क्षेत्रांमधून गुलामगिरीच्या सर्व खाणाखुणा मिटवाव्यात आणि आत्मविश्वासाने जगातील आव्हानांना भिडावे, ही त्यांची कळकळ अन् तळमळ होती. यासाठीच मराठीत रुजलेल्या अनेक इंग्रजी, फारसी आणि अरबी शब्दांना अतिशय सोपे, सुटसुटीत, चपखल अन् अर्थवाही मराठी प्रतिशब्द वीर सावरकर यांनी सिद्ध केले. आजच्या मराठीत दैनंदिन व्यवहारात रुजलेले शेकडो शब्द ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे. उदा. ‘मुव्ही’साठी ‘चित्रपट’, ‘तारीख’साठी ‘दिनांक’, ‘शहीद’साठी ‘हुतात्मा’ इत्यादी.

२. ‘राष्ट्रभाषा’ आणि ‘राष्ट्रलिपी’ यांविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मत

त्याचप्रमाणे ‘स्वतंत्र भारताची राष्ट्रीय भाषा (केंद्र सरकारची राजभाषा) कोणती असावी’, असा प्रश्न जेव्हा पुढे आला, तेव्हा ‘हिंदी’ ही भारतीय भाषा आणि ‘देवनागरी’ ही भारतीय लिपी यांचा पुरस्कार ‘राष्ट्रभाषा’, तसेच ‘राष्ट्रलिपी’ म्हणून सावरकर यांनी केला. सावरकर म्हणतात, ‘भाषाशुद्धीचेच नव्हे, तर सर्व सुधारणांचे मर्म असावे की, स्वकीय संस्कृतीत जे उत्तम, कार्यक्षम वा हितकारक आहे, त्याचा निष्कारण त्याग करू नये आणि विदेशी संस्कृतीतील आपल्यात नाही असे जे उत्तम, जे कार्यक्षम अन् जे हितकारक ते सकारण स्वीकारण्यास कचरू नये.’

३. ‘पंजाबी भाषा अन् लिपीची समस्या’ यांविषयी भगतसिंह यांनी निबंध लिहिणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदर्श मानून क्रांतीकार्य करणार्‍या भारतभरच्या अनेक युवकांमध्येही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या भाषिक विचाराचा ठसा उमटलाच. याचे उदाहरण, म्हणजे हुतात्मा भगतसिंह यांनी मांडलेला भाषिक विचार.

भगतसिंह इयत्ता ११ वीमध्ये शिकत असतांना तत्कालीन पंजाब प्रांतात ‘पंजाबी भाषा आणि लिपीची समस्या’, या विषयावर निबंध स्पर्धा झाली होती. ज्यात भगतसिंह यांचा राज्यात पहिला क्रमांक आला. त्याकाळी पंजाबी शीख हे ‘गुरुमुखी’ लिपीत लिहिलेल्या पंजाबी भाषेचे खंदे पुरस्कर्ते होते. हिंदु (विशेषतः आर्य समाजी) हे देवनागरी लिपीत लिहिलेल्या संस्कृतप्रचुर हिंदीविषयी आग्रही होते, तर पंजाबी मुम (आई) हे अरबी लिपीत लिहिलेल्या उर्दूचा अधिकाधिक वापर करत असत, म्हणजेच १ प्रांत, ३ भाषा, ३ लिपी. ‘भाषा आणि लिपी यांचा हा तिढा सोडवण्यासाठी काय उपाय असला पाहिजे ?’, यावर भगतसिंह यांनी स्वतःचे अभ्यासपूर्ण मत ‘पंजाबी भाषा अन् लिपीची समस्या’, या निबंधात मांडले आहेत.

त्यासाठी भगतसिंह यांनी देवनागरी, गुरुमुखी, अरबी या तिन्ही लिपींच्या त्रुटी आणि बलस्थान यांचे मूल्यांकन केले आहे. ‘गुरुमुखी लिपी शिखांसाठी धार्मिक महत्त्वाची असली, तरीही त्यामध्ये जोडाक्षरे लिहिण्याची सोय नाही. त्यामुळे ‘आर्य’, ‘स्वराज्य’ असे शब्दसुद्धा गुरुमुखी लिपीत लिहितांना ‘आरय’, ‘सवराजय’ असे लिहावे लागतात, त्यामुळे अर्थ व्यक्त होण्यात मर्यादा येते. उर्दू भाषा ज्यात लिहिली जाते, त्या अरबी लिपीमध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार यातील काहीच न लिहिता नुसतीच अक्षरे (व्यंजने) एकाला एक जोडून लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच स्वतःच्या धार्मिक आणि प्रांतिक अस्मिता बाजूला ठेवून पंजाबी भाषेसाठी हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीचा स्वीकार करावा, जेणेकरून पंजाबी भाषेत अर्थ व्यक्त करणे अधिक अचूक होईल अन् उर्वरित भारतीय साहित्यविश्वाशी पंजाबी साहित्यविश्व अधिक दृढपणे जोडले जाईल’, असे भगतसिंह यांनी म्हटले आहे.

४. राष्ट्रभाषा आणि राष्ट्रलिपी यांविषयी विविध नेत्यांचे मत

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह यांसारखे विचारवंत असा भाषिक विचार मांडत असतांना इतर भारतीय नेत्यांचे याविषयी विचार काय होते, याकडे दृष्टी टाकणे अधिक उद्बोधक ठरेल.

अ. म. गांधींचे मत असे होते की, मुसलमानांना हा देश परका वाटू नये, यासाठी अरबी लिपीत लिहिलेल्या उर्दू भाषेचा राज्यभाषा म्हणून सर्व भारतियांनी स्वीकार करावा.

आ. पंडित नेहरू आणि मौलाना आझाद यांचे मत होते की, अतीसंस्कृतप्रचुर अथवा अतीफारसीप्रचुर नसलेली ‘हिंदुस्थानी’ नावाची बोलीभाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जावी अन् तिचे एकच लिखाण देवनागरी, तसेच अरबी या दोन्ही लिपींमध्ये लिहिले जावे.

इ. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मत होते की, हिंदीसह सर्व भारतीय भाषांसाठी रोमन लिपी वापरली जावी. पुढे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या ‘संविधान सभे’ने उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करून देवनागरी लिपीत लिहिली जाणारी संस्कृतनिष्ठ हिंदी ही केंद्र सरकारची राजभाषा म्हणून स्वीकारली.

५. स्वतंत्र भारतात देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेचा स्वीकार केला जाणे !

अरबी, रोमन वगैरे लिपींपेक्षा देवनागरी लिपी अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक असल्यामुळे तिचा अंगीकार करावा, असा शास्त्रीय दृष्टीकोन सावरकर अन् भगतसिंह या दोघांच्याही विचारांमध्ये होता. भारतीय संस्कृती आणि समाजमन यांच्या विविध पैलूंमध्ये ओतप्रोत भरलेले भारतीयत्व भाषेमध्ये अन् साहित्यात कसे प्रतिबिंबित होते, याची त्यांना चांगलीच जाणीव होती. त्यामुळे ते भारतीयपण भाषा आणि लिपी यांमधून टिकवण्यासाठी काय पावले उचलावीत, याची त्यांना सुस्पष्ट कल्पना होती. स्वतंत्र भारताचे भाषिक धोरण ठरवण्यामध्ये सावरकर आणि भगतसिंह या दोघांचाही प्रत्यक्ष सहभाग नसूनही देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदी भाषेचा स्वीकार केलेला आहे. सावरकर आणि भगतसिंह या दोघांचेही भाषिक विचार किती मूलगामी अन् दूरदर्शी होते, याचा प्रत्यय येण्यासाठी हेच तथ्य पुरेसे आहे. आपली आणि यापुढील पिढ्यांचे हे दायित्व आहे की, आपल्यातील भारतीयपण भाषिक क्षेत्रातही जपावे अन् वृद्धींगत करावे.

– तन्मय केळकर

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, २७.५.२०२०)