परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शिकवणीप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहून साधनामय जीवन जगणारे देहली सेवाकेंद्रातील साधक !

‘कधी कधी सेवेनिमित्त माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी संपर्क येतो. मी फेब्रुवारी २०२५ मध्ये सेवेनिमित्त ५ दिवस देहली येथे गेले होते. तेथील साधकांना भेटल्यावर मला ‘सद्गुरु पिंगळेकाका यांनी या साधकांना किती चांगल्या प्रकारे घडवले आहे !’, याचे दर्शन झाले. 

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. काटकसरीपणा

देहलीत फेब्रुवारीमध्ये पुष्कळ थंडी होती. त्या थंडीत तेथील सर्व साधक ‘इलेक्ट्रिक रॉड’चा वापर करून स्नानासाठी पाणी तापवत. तेथील प्रत्येक साधक एक बालदी गरम पाण्यातच स्नान करायचा.

२. प्रेमभाव

अ. एकदा रात्री झोपतांना मी कु. प्रियांका सिंह हिला म्हणाले, ‘‘आज माझे अंग पुष्कळ दुखत आहे.’’ दुसर्‍या दिवशी मी अल्पाहार बनवायला गेल्यावर प्रियांकाताईने स्वतःच्या स्नानानंतर माझ्यासाठी पाणी तापवायला ठेवले, तसेच तिने तिच्या गरम पाण्यातील अर्धी बालदी गरम पाणी माझ्यासाठी अतिरिक्त काढून ठेवले. नंतर तिने मला सांगितले, ‘‘पाणी तापले आहे.’’ हे बघून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘प्रसारातील साधक पुष्कळ तडजोड आणि काटकसर करून आनंदाने सेवाकेंद्रात रहातात’, हे पाहून माझा भाव जागृत झाला.

आ. एकदा श्री. कार्तिक साळुंके यांना पोटाच्या त्रासामुळे प्रसारातून रात्रीच्या जेवणासाठी आलेली भाजी चालणार नव्हती. तेव्हा प्रियांकाताई स्वतः थकलेली असतांनाही तत्परतेने कार्तिकदादांसाठी दुसरी भाजी बनवली.


संतांचा एकमेकांप्रतीचा कृतज्ञताभाव !

सुश्री सुप्रिया टोणपे

‘एकदा मला पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ५० वर्षे) यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका (वय ५८ वर्षे) यांना निरोप देण्यास सांगितले, ‘‘सद्गुरु काका, ‘आपण आम्हाला सेवेत मार्गदर्शन करता’, यासाठी मी कृतज्ञ आहे. आपल्या प्रसारातील अनुभवामुळे आम्हाला सेवेची पुढची दिशा मिळत असते.’’ तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका यांनी मला पू. संदीपदादा यांना निरोप देण्यास सांगितले, ‘‘पू. संदीपदादा यांना ‘मी स्वतः कृतज्ञ आहे’, असे सांगा. या सेवेमुळे मला ‘ई-बूक’ (ebook) (टीप १) आणि ‘ऑडिओ बूक’ (Audio book) (टीप २) या नवीन गोष्टी शिकता आल्या.’’ त्या वेळी मला ‘संतांना अशा प्रकारे अनुभवणे’, म्हणजे खर्‍या अर्थाने देवत्व अनुभवण्यासारखे आहे’, याची जाणीव झाली.

टीप १ – ई-बूक : इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाचता येतील, अशी पुस्तके.


टीप २ – ऑडिओ बूक : एखाद्या पुस्तकाचे ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) केलेले वाचन, जे आपण ऐकू शकतो.’


– सुश्री सुप्रिया गजेंद्र टोणपे, फोंडा, गोवा. (१९.७.२०२५)

३. परिस्थितीशी जुळवून घेणे 

देहली सेवाकेंद्रात साधकसंख्या अल्प असल्याने तेथे अल्पाहार सेवाकेंद्रात बनवला जातो आणि जेवणाची व्यवस्था प्रसारातील साधकांकडून करण्यात येते. मी तेथे असतांना एकदा ‘सकाळच्या अल्पाहारासाठी साबुदाण्याची खिचडी बनवूया’, असे ठरले. मला सेवेसाठी वेळेत आणि लवकर निघायचे असल्याने मी ‘रात्रीच शेंगदाणे भाजून ठेवूया’, या विचाराने तिथे रहाणारे साधक श्री. नरेंद्र सुर्वेदादा यांना विचारले, ‘‘शेंगदाणे कुठे ठेवले आहेत ?’’

तेव्हा दादा म्हणाले, ‘‘आपल्याकडे शेंगदाणे नाहीत.’’ तेव्हा मला वाटले, ‘दाण्याच्या कुटाविना साबुदाण्याची खिचडी बनवणे कसे शक्य आहे ?’; कारण मी यापूर्वी साबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याच्या कुटाविना कधीच केली नव्हती; परंतु तिथे असलेल्या सर्व साधकांनी मला आनंदाने सांगितले, ‘‘ताई, तुम्ही दाण्याचे कूट न घालताही खिचडी बनवू शकता. आम्हाला ती चालेल.’’

त्यानंतर त्यांनी मला सद्गुरु पिंगळेकाका यांच्या समवेत असतांना घडलेला एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ‘‘एकदा गाजराचा हलवा करण्यासाठी सेवाकेंद्रातील प्रत्येक साधकाने स्वतःकडे असलेल्या वैयक्तिक तुपामधून एक एक चमचा तूप दिले. हे सद्गुरु पिंगळेकाकांना कळले आणि ते म्हणाले, ‘‘गाजराचा हलवा आपण सेवाकेंद्रातील उपलब्ध तेलातून बनवू शकलो असतो. पुढच्या वेळी आपण गाजराचा हलवा सेवाकेंद्रात उपलब्ध असणार्‍या तेलामध्येच करूया आणि त्याची चव चाखूया.’’ तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांचे आज्ञापालन म्हणून आम्ही पुढच्या वेळी गाजराचा हलवा तेलात बनवला आणि तो अप्रतिम झाला. ‘तो हलवा तुपामध्येच केला आहे’, असे वाटत होते. किंबहुना पूर्वी तुपात केलेल्या गाजराच्या हलव्यापेक्षा तो अधिक चविष्ट झाला होता.’’ हा प्रसंग ऐकल्यावर मी शेंगदाण्याचे कूट न घालता साबुदाण्याची खिचडी बनवली. देवाच्या कृपेने ती चांगली झाली आणि सर्व साधकांनी ती आनंदाने खाल्ली.

देहली सेवाकेंद्रात रहातांना ‘गुरुदेवांनी आपल्याला आश्रमात जे उपलब्ध करून दिले आहे, त्या उपलब्ध सामुग्रीमध्ये पदार्थ बनवल्यास देवाची कृपा होऊन तो पदार्थ चांगला होतो. आपली आवड-नावड न्यून होण्यास साहाय्य होते. पदार्थ बनवतांना आणि खातांना भाव महत्त्वाचा !’, ही सद्गुरु पिंगळेकाकांनी दिलेली शिकवण माझ्या मनावर बिंबली.

४. अविरत सेवारत असणे

कु. प्रियांका सिंह आणि श्री. कार्तिक साळुंके हे ‘वर्ल्ड बूक फेअर’च्या सेवेत होते. ते रात्री १.३० – २ वाजेपर्यंत सेवा पूर्ण करूनच झोपत असत. रात्री २ वाजल्यानंतर झोपूनही दादा सकाळी ६ वाजता उठत असत आणि ‘साधकांना पाणी मिळावे’, यासाठी पाणी आल्यावर यंत्र चालू करून पाणी भरत असत. श्री. नरेंद्र सुर्वे हेसुद्धा सकाळी लवकर उठत असत. रात्री अत्यल्प झोप घेऊनही साधक दिवसभर सेवारत असायचे. त्यांच्या तोंडून कधी ‘थकलो आहे’, असे आले नाही. यावरून माझ्या लक्षात आले, ‘सद्गुरु पिंगळेकाका यांनी तेथील साधकांना ‘आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारून त्यातही साधना कशी होईल ?’, हे शिकवले असल्याने ‘साधक आहे त्या परिस्थितीत आनंदी राहून साधनारत आहेत. देहली सेवाकेंद्रातील प्रसारात सेवा करणारे साधक प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहून खर्‍या अर्थाने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीप्रमाणे साधनामय जीवन जगत आहेत.’

५. देहली सेवाकेंद्रातील साधकांना पाहिल्यावर रामनाथी आश्रमात रहाणारे साधक भाग्यवान असून त्यांच्यासाठी प्रसारात रहाणार्‍या साधकांपेक्षा साधना सोपी असल्याचे लक्षात येणे  

देहली सेवाकेंद्रातील साधकांना पाहिल्यावर मला जाणीव झाली, ‘रामनाथी आश्रमात असणारे आम्ही साधक किती भाग्यवान आहोत ! आमच्यासाठी सर्वच गोष्टी विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. ‘एखादी गोष्ट नाही’ अथवा ‘संपली आहे’, असे येथे कधीच होत नाही. जेवणातही सर्व पदार्थ नेहमीच उपलब्ध असतात. आश्रमात असतांना एखाद्या वेळी प्रकृती ठीक नसल्यास सेवेची तडजोड करता येते; पण देहलीसारख्या सेवाकेंद्रांमध्ये किंवा प्रसारात मुळातच साधक अल्प असल्याने तडजोड करायला कुणीच नसते. रुग्णाईत असतांनासुद्धा साधकांना त्यांच्या सेवा कराव्याच लागतात. आश्रमात राहून सेवा करणार्‍या साधकांसाठी साधना पुष्कळ सोपी आहे.’

‘प.पू. गुरुमाऊली, ‘मला प्रसारातील साधकांचे जीवन जवळून पहाता आले आणि ‘प्रतिकूल परिस्थितीमध्येही आनंदाने आणि निष्ठेने साधना कशी करावी ?’, हे शिकता आले’, यासाठी मी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते अन् ‘प्रसारातील साधकांचे गुण माझ्यातही येऊ द्या’, अशी आर्तभावाने प्रार्थना करते.’

– सुश्री सुप्रिया गजेंद्र टोणपे, फोंडा, गोवा. (१९.७.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक