व्यक्तीमत्त्वातील ‘अंतर्मुखता’ हा पैलू दर्शवणार्‍या ग्रहयोगांचे विवेचन !

‘साधनेमध्ये अंतर्मुखतेला अग्रगण्य स्थान आहे. काही व्यक्तींमध्ये पूर्वजन्मांच्या साधनेमुळे अंतर्मुखता मुळात असते; तर काहींना ती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीची मुळात असलेली अंतर्मुखता किती आहे, याचा बोध होऊ शकतो. अंतर्मुखतेचे महत्त्व आणि अंतर्मुखता दर्शवणारे ग्रहयोग यांचे विवेचन पुढे दिले आहे. 

१. अंतर्मुखतेचे महत्त्व

१ अ. अंतर्मुखतेमुळे जीवनातील समस्यांची मूळ कारणे जाणता येणे : ‘अंतर्मुखता, म्हणजे स्वतःचे विचार, हेतू अन् कृती यांचे निरीक्षण करण्याची किंवा आत्मपरीक्षण करण्याची वृत्ती.’ व्यक्तीचे बाह्यमन हे चंचल आणि उथळ स्वरूपाचे असते, तर अंतर्मन हे स्थिर आणि सखोल असते. अंतर्मुख होणे, म्हणजे बाह्यमनापेक्षा अंतर्मनाचा ठाव घेणे. अंतर्मनातील कामना, धारणा, सवयी, संस्कार आदींचा मागोवा घेणे. अंतर्मुखतेमुळे व्यक्तीला जीवनातील समस्यांच्या मुळाशी जाता येते. मूळ समस्या कळल्याने तिला त्यावर योग्य उपाययोजना काढता येते.

१ आ. अंतर्मुखतेमुळे अध्यात्माचा प्रवास आरंभ होणे : अध्यात्मात अंतर्मुखतेला पुष्कळ महत्त्व आहे. अंतर्मुखतेमुळेच साधनेचा प्रवास आरंभ होतो. मानवी मन स्वभावतः बहिर्मुख असते. ते बाह्य आणि स्थूल गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करते; परंतु या गोष्टींतून मिळणारे सुख हे शारीरिक किंवा मानसिक स्तरावरचे असते, तसेच ते तात्कालिक असते. बाह्य गोष्टींतून आंतरिक शांती लाभत नाही आणि कशाचीतरी उणीव भासत रहाते.

जीवन जगतांना मनुष्याला अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. या अनुभवांतून तो घडत असतो. या त्याच्या प्रवासात कधीतरी त्याला ‘हे जीवन कशासाठी आहे ? माझा जन्म कशासाठी झाला आहे ? माझे ध्येय काय आहे ?’, आदी प्रश्न पडतात; म्हणजेच तो जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी प्रेरित होतो. त्या वेळी तो अंतर्मुख झालेला असतो. ही अंतर्मुखता त्याला अध्यात्माच्या मार्गावर घेऊन येते. अंतर्मुख स्थितीत असतांना त्याला आनंद आणि शांती यांची अनुभूती येते. पूर्वीच्या सवयी आणि चित्तातील संस्कार यांमुळे त्याचे मन पुनःपुन्हा बहिर्मुख होत रहाते; परंतु तो पुन्हा अंतर्मुख होण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची अंतर्मुखता जसजशी वाढत जाईल, तसतशी त्याच्या मनाची स्थिरता वाढत जाते.

श्री. राज कर्वे

१ इ. अंतर्मुखतेमुळे साधनेत होणारे लाभ

१. अंतर्मुखतेमुळे व्यक्ती इतरांची चूक न पहाता स्वतःची चूक पहाते. त्यामुळे स्वतःतील उणिवांची जाणीव होऊन तिला स्वतःमध्ये पालट करता येतो.

२. व्यक्ती तिच्या कृतीमागील विचार अन् उद्देश यांचे निरीक्षण करते. त्यामुळे तिची चिंतनशीलता, प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा वाढते.

३. व्यक्ती असत्यकथन करणे, स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, खोटी प्रतिमा निर्माण करणे आदी गोष्टी करण्यापासून परावृत्त होते. त्यामुळे तिच्या मनाची सात्त्विकता वाढते.

४. जीवनात अनिष्ट प्रसंग घडल्यावर ‘या प्रसंगातून ईश्वराला मला घडवायचे आणि शिकवायचे आहे’, असा दृष्टीकोन ठेवून ती सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करते.

५. ती अधिकार, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आदींच्या मागे लागत नाही. ती आवश्यकतेपुरता व्यावहारिक कृती करते. ती तिची आंतरिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करते.

६. ती ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्यामुळे आनंदात वाढ होते.

७. ती इतरांना साहाय्य करण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे तिच्यातील व्यापकता वाढते.

८. ती ‘राष्ट्र आणि धर्म मला काय लाभ देतात ?’, यापेक्षा ‘मी राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय योगदान करू ?’, याचा विचार करते.

९. अंतर्मुखता जितकी वाढते, तितकी सत्यनिष्ठता, प्रीती, स्थिरता, आनंद आणि शांती वाढते.

क्रियमाण वापरून अंतर्मुखता वाढवता येणे

कुंडलीतील ग्रहयोग हे व्यक्तीच्या मूलभूत प्रवृत्तीचे दर्शक असतात; परंतु ते मनुष्याच्या भविष्याचे निर्णायक घटक नसतात. जन्मकुंडलीत अंतर्मुखता दर्शवणारे योग अल्प असले, तरी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, संतांचा सत्संग, मनन-चिंतन करणे, मनाच्या विचारप्रक्रियेकडे लक्ष देणे, ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे आदी प्रयत्नांमुळे अंतर्मुखता वाढू शकते.

– श्री. राज कर्वे

२. अंतर्मुखतेला प्रभावित करणारे काही घटक

अ. बालपणीचे संस्कार : व्यक्तीवर बालपणी कुटुंबियांकडून धर्माचरण, सदाचरण, साधना आदींचे संस्कार झाले असतील, तर तिच्या व्यक्तीमत्त्वात अंतर्मुखता वाढण्यास साहाय्य होते.

आ. व्यक्तीचे वाढते वय : व्यक्तीचे वय जसजसे वाढते, तसतशी ती अधिक अनुभवी होत जाते. अनुभवांमुळे तिची प्रगल्भता वाढत असते. साधारणपणे तारुण्यात ऊर्जा, बळ आणि उत्साह दांडगा असल्याने व्यक्तीत विचारीपणा अल्प असतो; परंतु ती जशी प्रौढ होते, तसा तिच्यातील विवेक वाढत जातो.

इ. समाजाची मानसिकता : व्यक्तीवर समाजमनाचा मोठा प्रभाव असतो. समाजाची मानसिकता बहिर्मुखी किंवा अंतर्मुखी जशी असेल, त्यानुसार व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होतो.

ई. पूर्वजन्मांचे संस्कार : व्यक्तीने पूर्वजन्मांत धर्माचरण किंवा साधना केलेली असेल, तर तिच्या चित्तावर सात्त्विकतेचे संस्कार असतात. हे संस्कार पुढील जन्मी जिवासोबत येतात. हे संस्कार प्रबळ असतील, तर व्यक्तीच्या सभोवतालचे वातावरण जरी बहिर्मुख असले, तरी तिच्यातील अंतर्मुखतेचा दीप प्रज्वलित असतो अन् योग्य संधी मिळाल्यावर तो प्रकाशमान होतो.

वरील घटकांपैकी ‘पूर्वजन्मांतील संस्कार’ हा घटक जन्मकुंडलीद्वारे कळू शकतो; कारण जन्मकुंडली प्रारब्धाची दर्शक असते. नवग्रहांपैकी कोणते योग व्यक्तीमत्त्वात अंतर्मुखता दर्शवतात, हे आता पाहूया.

३. व्यक्तीमत्त्वातील ‘अंतर्मुखता’ हा पैलू दर्शवणारे ग्रहयोग

नवग्रहांमध्ये चंद्र, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू हे ग्रह भौतिक प्रकृतीचे आहेत. त्यांच्यात एकमेकांमध्ये असलेले योग (संबंध) व्यक्तीच्या स्वभावात बहिर्मुखता दर्शवतात. याउलट रवि, गुरु, शनि आणि केतू हे ग्रह आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. त्यांच्यात एकमेकांमध्ये असलेले योग व्यक्तीच्या स्वभावात अंतर्मुखता दर्शवतात. यांपैकी ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांचे अन्य ग्रहांशी असलेले योग अंतर्मुखतेच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे आहेत. त्याचे विवेचन पुढे दिले आहे.

३ अ. गुरु ग्रहाचे अन्य ग्रहांशी होणारे योग आणि त्यांचा परिणाम

१. गुरूचा चंद्राशी योग : हा योग सात्त्विक मनोवृत्ती दर्शवतो. हा योग असलेल्या व्यक्तीत इतरांचा विचार, नम्रता, श्रद्धाशीलता, सकारात्मकता, आनंदीपणा आदी वैशिष्ट्ये असतात.

२. गुरूचा बुधाशी योग : हा योग सात्त्विक बुद्धी दर्शवतो. हा योग असलेल्या व्यक्तीत निरीक्षणक्षमता, तर्कशक्ती, अभ्यासूवृत्ती, चिंतनशीलता आदी वैशिष्ट्ये असतात.

३. गुरूचा शुक्राशी योग : हा योग सात्विक आनंद दर्शवतो. हा योग असलेल्या व्यक्तीमध्ये इतरांविषयी प्रेम असते. तिच्यामध्ये भाव असल्याने तिला ईश्वराच्या अनुसंधानात रहाता येते.

४. गुरूचा मंगळाशी योग : हा योग सात्त्विक कर्म दर्शवतो. हा योग असलेली व्यक्ती समाजाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित होते. तिच्यात व्यापकत्व येते.

५. गुरूचा रवीशी योग : हा योग सात्त्विक आकांक्षा दर्शवतो. हा योग असलेली व्यक्ती उच्च आदर्शांकडे आकर्षित होते. हा योग नैतिकता, सत्यनिष्ठा आणि ज्ञानशक्ती दर्शवतो.

६. गुरूचा केतूशी योग : हा योग व्यक्तीला धर्माचरण करण्यास उद्युक्त् करतो. अशी व्यक्ती सदाचारी, सद्गुणी आणि परोपकारी असते.

३ आ. शनीचे अन्य ग्रहांशी होणारे योग आणि त्यांचा परिणाम

१. शनीचा बुधाशी योग : हा योग वैचारिक प्रगल्भता दर्शवतो. हा योग असलेल्या व्यक्तीमध्ये सामंजस्य आणि विवेकशक्ती असते. अशा व्यक्तीची विचारसरणी तत्त्वज्ञानी असते.

२. शनीचा शुक्राशी योग : हा योग मायेपासून अलिप्तता दर्शवतो. हा योग असलेली व्यक्ती भावनिक संबंधांमध्ये अडकण्याची शक्यता अल्प असते. तिच्यात विरक्ती लवकर निर्माण होते.

३. शनीचा रवीशी योग : हा योग स्वयंशिस्त, प्रामाणिकता आणि समर्पण दर्शवतो. हा योग असलेल्या व्यक्तीमध्ये सेवाभाव असतो.

४. शनीचा गुरूशी योग : हा योग आध्यात्मिक प्रगल्भता दर्शवतो. हा योग असलेली व्यक्ती कर्तव्य म्हणून कर्म करते; पण त्यांत आसक्त न होण्याचा प्रयत्न करते.

५. शनीचा केतूशी योग : हा योग विरक्ती, त्यागीपणा, सेवाभाव आणि समर्पण दर्शवतो. हा योग असलेली व्यक्ती स्वतःला सत्कार्यामध्ये झोकून देते.

वरील ग्रहयोग व्यक्तीच्या कुंडलीत अधिक प्रमाणात असल्यास, तसेच बहिर्मुखता दर्शवणारे ग्रहयोग अल्प प्रमाणात असल्यास त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व मूलतः अंतर्मुख असते. हा तिने पूर्वजन्मांमध्ये केलेल्या सदाचरणाचा किंवा साधनेचा परिणाम असतो. हे ग्रहयोग ज्या राशींमधून होतात आणि कुंडलीतील ज्या स्थानांमध्ये होतात, त्यानुसार त्यांच्या परिणामात विविधता येते.

४. उदाहरणार्थ कुंडल्या

येथे काही संत आणि साधक यांच्या कुंडल्यांमध्ये अंतर्मुखता दर्शवणारे योग किती प्रमाणात आहेत, हे दिले आहे.

अ. संत क्र. १ : यांच्या कुंडलीत रवि-शुक्र आणि शुक्र-मंगळ हे बहिर्मुखता दर्शवणारे योग आहेत; तर बुध-शनि, शुक्र-शनि, शुक्र-गुरु, रवि-शनि आणि गुरु-शनि हे अंतर्मुखता दर्शवणारे योग आहेत. त्यामुळे बहिर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ३० टक्के असून अंतर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ७० टक्के आहे.

आ. संत क्र. २ : यांच्या कुंडलीत चंद्र-मंगळ आणि शुक्र-मंगळ हे बहिर्मुखता दर्शवणारे योग आहेत; तर रवि-चंद्र, चंद्र-गुरु, चंद्र-शनि, शुक्र-शनि, रवि-गुरु, रवि-शनि आणि गुरु-शनि हे अंतर्मुखता दर्शवणारे योग आहेत. त्यामुळे बहिर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण २० टक्के असून अंतर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ८० टक्के आहे.

इ. साधक क्र. ३ : यांच्या कुंडलीत चंद्र-बुध, चंद्र-शुक्र आणि बुध-शुक्र हे बहिर्मुखता दर्शवणारे योग आहेत; तर चंद्र-गुरु, बुध-गुरु, शुक्र-गुरु, रवि-केतू आणि गुरु-शनि हे अंतर्मुखता दर्शवणारे योग आहेत. त्यामुळे बहिर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ४० टक्के असून अंतर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ६० टक्के आहे.

ई. साधक क्र. ४ : यांच्या कुंडलीत चंद्र-बुध, चंद्र-शुक्र, चंद्र-मंगळ, बुध-मंगळ आणि शुक्र-मंगळ हे बहिर्मुखता दर्शवणारे योग आहेत; तर चंद्र-गुरु, बुध-गुरु, बुध-केतू , गुरु-केतू, रवि-गुरु आणि रवि-शनि हे अंतर्मुखता दर्शवणारे योग आहेत. त्यामुळे बहिर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ४० टक्के असून अंतर्मुखता दर्शवणार्‍या योगांचे प्रमाण ६० टक्के आहे.

वरील उदाहरणांतील संत आणि साधक यांच्या कुंडल्यांत अंतर्मुखता दर्शवणारे ग्रहयोग अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्त्वात अंतर्मुखतेचे बीज अगोदरपासून होते. त्यामुळे साधना आरंभ केल्यानंतर त्यांच्यात अंतर्मुखता लवकर निर्माण झाली.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.११.२०२५)