जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर मुस्लिम संस्थांकडून अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक काढून संबंधितांवर कारवाई करा !  

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची निवेदनाद्वारे चेतावणी

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ.

रत्नागिरी, २१ फेब्रुवारी (वार्ता.) –  जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर काही मुस्लिम संस्थांकडून अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक तात्काळ काढावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल आणि या परिस्थितीला जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन उत्तरदायी राहील, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. हे निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना देण्यात आले, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री संजय जोशी, प्रभाकर खानविलकर, गणपत निवळकर, छगनलाल चौहान, संजय पावसकर, बाबू पवार, गोविंद भारद्वाज आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वधर्मीय रुग्णांसाठी एक सार्वजनिक रुग्णालय आहे. शासकीय नियमांनुसार आणि भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा रुग्णालय परिसरात एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार करणारे किंवा धार्मिक उपक्रमाचे फलक लावण्यास मनाई आहे.

अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक

२. असे असतांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात आणि इमारतींच्या भिंतींवर ‘इफ्तारीचा इंतजाम’, ‘सेहरी का इंतजाम किया जाएगा’, अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
३. हे फलक यंग मेमन फाऊंडेशन, अरमान ग्रुप यांनी शासकीय ठिकाणी धार्मिक फलक  जाणीवपूर्वक लावल्याचे दिसून येत असून यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते.

४. तरी हे विशिष्ट धार्मिक स्वरूपाचे फलक तात्काळ काढून टाकावेत आणि ते लावणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच यासंदर्भात दखल न घेणारे जिल्हा शासकीय रुग्णालयातील संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांनाही निलंबित करण्यात यावे.

अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक हटवणार ! – डॉ. जयप्रकाश रामानंद

जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ‘असे फलक लावणे अयोग्य असून ते कोणतीही पूर्वअनुमती न घेता अनधिकृतपणे लावण्यात आलेले आहेत आणि ते हटवण्याचे आदेश देतो आहे.

उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आश्वासन !

‘अनधिकृत फलक काढून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’