‘टेनिस एल्बो’ ही अधिकतर प्रौढांना होणारी कोपर दुखण्याची एक समस्या !

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १२२

‘आपण सर्व जण हाताने बरीच कामे करतो जस कीे, लिहिणे, कपडे धुणे, भाजी चिरणे, टंकलेखन करणे इत्यादी. कल्पना करा, उद्या आपल्याला वेदना झाल्यामुळे हे करताच आले नाही तर ? आपले घरकाम आणि कार्यालयातील सर्व काम ठप्प होऊन जाईल. ज्यांनी हे अनुभवले असेल त्यांना वेगळी कल्पना द्यायला नको. अशा प्रकारे आपल्याला त्रास देणार्‍या अनेक आजारांपैकी एक आहे ‘टेनिस एल्बो.’ त्याविषयी आपण जाणून घेऊया…

कोपर दुखण्याची समस्या !

१. ‘टेनिस एल्बो’ (लॅटरल एपिकॉन्डाल्जिया)

‘टेनिस एल्बो’, म्हणजे ज्याला वैद्यकीय भाषेत ‘लॅटरल एपिकॉन्डाल्जिया’ म्हणतात. ही अधिकतर प्रौढांना होणारी कोपर दुखण्याची एक सामान्य समस्या आहे. ‘टेनिस एल्बो’ या नावावरून ‘ही समस्या केवळ टेनिस खेळणार्‍या खेळाडूंनाच होत असते’, असे वाटते; पण प्रत्यक्षात तसे नाही.’ संशोधनानुसार टेनिस एल्बो होणार्‍यांमध्ये केवळ ५ ते १० टक्केच रुग्ण टेनिस खेळाडू असतात. ही समस्या बहुतेक वेळा प्रतिदिन काम करतांना हात, मनगट आणि कोपर अधिक प्रमाणात वापरणार्‍या व्यक्तींमध्ये आढळते.

२. ‘टेनिस एल्बो’ कुणाला होऊ शकतो ?

‘टेनिस एल्बो’ विशेषतः ३५ ते ५५ या वयोगटातील लोकांना अधिक प्रमाणात होतो; कारण या वयात शरिराची दुरुस्ती करण्याची क्षमता आणि स्नायूंची शक्ती थोडी न्यून होत जाते; पण कामाचा ताण मात्र तसाच किंवा अधिक असतो. ज्या कामांमध्ये सतत पकड घेणे, मनगट किंवा हात (फोर-आर्म) फिरवणे किंवा हाताने काम करणे आवश्यक असते, जसे की, कामगार, ‘प्लंबर’, ‘इलेक्ट्र्रिशियन’, सुतार, स्वयंपाकी, संगणक वापरणारे, कारखान्यातील कामगार यांच्यात ही समस्या अधिक प्रमाणात आढळते, तसेच अकस्मात् अधिक काम चालू करणे, म्हणजे सुटीत अधिक खेळणार्‍या किंवा बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा काम चालू करणार्‍या व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो.

३. ‘टेनिस एल्बो’मध्ये नेमके काय होते ?

कोपरापासून मनगटापर्यंत जाणार्‍या स्नायूंच्या स्नायूबंधावर (टेंडनवर) ताण आल्यामुळे तेथे वेदना निर्माण होतात. पूर्वी ‘सूज (इनफ्लॅमेशन) येणे’, हे ‘टेनिस एल्बो’ होण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात होते; पण आता ‘ही समस्या टेंडनची (स्नायूबंधची) झीज होणे आणि टेंडनला इजा झाल्यावर तो पूर्ण बरा न होणे’ या कारणांमुळे होते’, असे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोपराच्या बाहेरील भागात असलेले स्नायूबंध (टेंडन) प्रभावित होतात. हा स्नायूबंध मनगट सरळ ठेवणार्‍या स्नायूंना कोपराशी जोडतो. जेव्हा आपण कोणतीही वस्तू पकडतो, उदा. ‘रॅकेट’, ‘माऊस’ (संगणकातील साधन) इत्यादी, तेव्हा हे स्नायू मनगट स्थिर ठेवतात. मनगटावर सतत ताण येत राहिला (चित्र १) आणि त्याला पुरेशी विश्रांती मिळाली नाही, तर टेंडनमध्ये सूक्ष्म जखमा होतात. स्नायूबंध किंवा अन्य काही आजारांमुळे शरीर त्या दुरुस्त करू शकत नाही, तेव्हा वेदना होतात आणि अशक्तपणा (कमजोरी) येतो.

४. ‘टेनिस एल्बो’ होण्याची कारणे

४ अ. मुख्य कारण : ‘मनगट सरळ आणि वरच्या दिशेने वाकवलेले ठेवून किंवा मनगटाची सतत हालचाल करून काम करत रहाणे’, हे ‘टेनिस एल्बो’ होण्याचे मुख्य कारण आहे.

४ आ. सामान्य कारणे : ‘अधिक कालावधीसाठी ‘माऊस’ वापरणे, घरकाम करणे, कपडे पिळणे, हाताने जड कामे करणे आणि बसण्याची अयोग्य पद्धत’, ही सामान्य कारणे आहेत.

श्री. निमिष म्हात्रे

५. ‘टेनिस एल्बो’ झाल्याची लक्षणे

५ अ. वेदना होणे : ‘टेनिस एल्बो’मध्ये कोपराच्या बाहेरील बाजूला वेदना जाणवतात. या वेदना हातात (चित्र २) खालच्या भागात पसरू शकतात. वस्तू पकडतांना, हलकी वस्तू उचलतांना, दाराचे ‘हँडल’ फिरवतांना, हात मिळवतांना, टंकलेखन करतांना किंवा लिहितांना वेदना वाढतात.

५ आ. पकड सैल (कमजोर) वाटते आणि हात लवकर थकतो.

६. ‘टेनिस एल्बो’ होण्याचा धोका वाढवणारे घटक

खांद्यांचे स्नायू कमकुवत असल्यास कोपरांवर अधिक ताण येतो, तसेच पकड सैल (कमजोर) असणे, धूम्रपान, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या समस्या ‘टेंडन’ बरे होण्यास अडथळा आणतात.

७. दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम

‘सकाळी उठल्यावर जडपणा जाणवणे आणि काम केल्यावर वेदना वाढणे’, ही या आजाराची लक्षणे आहेत. यामुळे प्रतिदिन करायच्या कामांवर किंवा कार्यालयीन कामकाजावर (नोकरीवर) मोठा परिणाम होऊ शकतो. ‘टेनिस एल्बो’चा त्रास दीर्घकाळ होत राहिल्यास कार्यालयातील अनुपस्थितीही वाढू शकते.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (१०.२.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1011973.html

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷