विकतचे दही घेण्यापेक्षा घरी विरजण लावून बनवलेले दही खा !
दही किंवा ताक यांचे सेवन करतांना ते घरीच बनवले गेले पाहिजे. ‘बाजारातील दही नको’, याविषयी मी निक्षून रुग्णांना सांगत असतो. यावर ‘उत्तम ब्रँडचे (नामांकित आस्थापनाचे) पॅकेटबंद दही घेतले, तर काय हरकत आहे ?’, असा प्रश्न काही जण विचारतात. याचे वैज्ञानिक उत्तर आजवर देत होतोच; पण आता तर याला पुराव्याची जोड मिळाली आहे.

१. पॅकेटबंद दह्याच्या चाचणीत आढळून आलेले चिंतादायक निरीक्षण
‘ट्रस्टीफाईड’ नामक यू ट्यूब चॅनेलने ‘अमूल’च्या पॅकेटबंद दह्याची चाचणी केली, तेव्हा त्यांना त्यात ‘Coliforms (कोलिफॉर्म्स – जीवाणू)’ आणि ‘Yeast & Molds (ईस्ट अन् मोल्ड्स – बुरशी प्रजातीतील सूक्ष्मजीव)’ हे अनुमती असलेल्या मात्रेच्या अनुक्रमे अनुमाने ७६०० पट आणि २० पट अधिक आढळून आले आहेत ! त्यांनी पूर्वीही यावर व्हिडिओ केला होता, ज्यात असेच भरमसाट प्रमाण आल्यावर ‘अमूल’ने ‘त्या दह्याची हाताळणी नीट झाली नसेल’, वगैरे कारणे दिली होती. आता तीही शंका राहू नये, याची काळजी घेत त्यांनी पुन्हा चाचणी केल्यावर हे निरीक्षण आले आहे.
बाजारातील दह्यात ‘कोलिफॉर्म्स’ आणि ‘ईस्ट अन् मोल्ड्स’ यांचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असणे, हे आरोग्यासाठी नक्कीच चिंतेचे लक्षण आहे. हे प्रामुख्याने अस्वच्छता किंवा दूध प्रक्रिया करतांना झालेल्या चुकीमुळे घडते.
‘पाश्चराईज’ (निर्जुंतक) केलेल्या दूधात ‘बॅक्टेरिया’ (जीवाणू) आढळणे घातक !

दह्यात निघालेले घातक घटक हे दुधातूनच गेले असल्याची शक्यता सर्वाधिक होती ! आता त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. ‘ट्रस्टीफाईड’ नामक यू ट्यूब चॅनेलने आता ‘अमूल’, ‘मदर डेअरी’ आणि ‘कंट्री डिलाईट’ या ‘ब्रँड’चे दूध पडताळल्यावर त्यातही हेच घातक घटक आढळले. याचाच अर्थ दह्यातील घातक ‘बॅक्टेरिया’ (जीवाणू) हे चुकीच्या हाताळणीतून जाण्याची शक्यता अल्प असून दुधातूनच गेले असल्याची शक्यता दाट आहे. ‘पाश्चराईज’ (निर्जुंतक) केलेल्या दूधातही हे घटक सापडावे, याचा अर्थ डेअरीमध्ये जमा झालेल्या दुधाची गुणवत्ता काय असेल, याची कल्पनाही न केलेली बरी !
आता बिल गेट्स भारतात कृत्रिम रेतन केंद्रासाठी व्यय करणार असल्याची माहिती आहे. जागतिक पटलावर चालू असलेल्या घडामोडींचे बिंदू जोडून पहायचे असतात. फार वेगळे चित्र वेळेत समोर येत असते. ‘कोविड’ महामारीच्या वेळी मी रुग्णांना वेळेत सजग करत होतो आणि आताही करत आहे. भारतातील देशी गायीचे पालन करणार्या गोपालकांनी प्रयोगशाळेच्या काही मूलभूत चाचण्या करून स्वतःकडील दुधाची गुणवत्ता सिद्ध करायची, हीच वेळ आहे. आपण नोंदणीकृत प्रयोगशाळांतून हे करून दाखवले, तर ‘देशी गायीचे दूध फारच महाग असते !’, या आक्षेपाला थेट उत्तर देता येईल. खरेतर या चाचण्या पार केल्या, तर या मताचा प्रश्नच उपस्थित होणार नाही.
– वैद्य परीक्षित शेवडे
२. ‘कोलिफॉर्म्स’ आणि ‘ईस्ट अन् मोल्ड्स’ यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होणारे घातक परिणाम

यामुळे होणारे घातक परिणाम खालीलप्रमाणे आहेत :
अ. पचनसंस्थेचे विकार (Digestive Issues) : ‘कोलिफॉर्म्स’ हे प्रामुख्याने विष्ठेतील प्रदूषणाचे निदर्शक मानले जातात. दह्यात यांचे प्रमाण अधिक असल्यास खालील त्रास होऊ शकतात –
अ १. जुलाब आणि उलट्या : दूषित दही खाल्ल्यामुळे तीव्र ‘फूड पॉयझनिंग’ (अन्न विषबाधा) होऊ शकते.
अ २. पोटदुखी आणि पेटके : आतड्यांमध्ये संसर्ग झाल्यामुळे पोटात प्रचंड वेदना होऊ शकतात.
अ ३. ‘टायफॉईड’ किंवा ‘कॉलरा’ : जर ‘कोलिफॉर्म्स’मध्ये घातक जीवाणू (उदा. E. coli – आतड्यांशी संबंधित जीवाणू) असतील, तर गंभीर आजार उद्भवू शकतात.
आ. ‘ईस्ट’ आणि ‘मोल्ड्स’चे धोके : ‘ईस्ट’ आणि ‘मोल्ड्स’मुळे दह्याची चव अन् गुणवत्ता तर बिघडतेच; पण ते शरिरासाठी विषारी ठरू शकतात.
आ १. ‘मायकोटॉक्सिन्स (Mycotoxins)’ : काही प्रकारचे ‘मोल्ड्स’ विषारी घटक सिद्ध करतात, जे शरिरात गेल्यावर यकृताला (‘लिव्हर’ला) इजा पोचवू शकतात.
आ २. ऍलर्जी : ज्यांना बुरशीची ॲलर्जी आहे, अशा व्यक्तींना श्वसनाचा त्रास किंवा त्वचेवर खाज येण्यासारखे प्रकार घडू शकतात.
आ ३. प्रतिकारशक्तीवर परिणाम : दीर्घकाळ अशा दूषित पदार्थांचे सेवन केल्यास शरिराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती न्यून होऊ शकते.
प्रश्न एका ‘ब्रँड’चा नाही. अनेक रुग्णांना बाजारातील दही खाल्ल्यावर जुलाब झाले असल्याचे प्रत्यक्षात दिसते. पोटाचे आरोग्य राखण्यासाठी म्हणून ताक/ दही घेतांना प्रत्यक्षात अपाय होण्याची शक्यताच अधिक असल्याचे प्रत्यक्ष रुग्णसेवेतही दिसते आणि आता त्याच्या कारणांवर एकप्रकारे प्रयोगशाळेची मोहोरच लागली आहे. घरीच दही लावतांना मिळणारे दूध किती चांगल्या प्रतीचे आहे, हा चर्चेचा वेगळा विषय असू शकतो; पण किमान त्याने हे विकतचे दुखणे तरी निर्माण होणार नाही, हे नक्की ! मधला कुठलाही मार्ग शोधू नका, तर विरजण लावायला शिका !!
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !