पाश्चात्त्यांनी अलीकडच्या काळात जे विविध शोध लावले आहेत किंवा विविध विषयांतील ज्या संकल्पना मांडल्या आहेत, त्याचे मूळ सनातन संस्कृतीत असल्याचे अभ्यासाअंती लक्षात येते. अर्थशास्त्रातील अलीकडच्या काळात निर्मिती झालेल्या एका संकल्पनेचे मूळ सनातन संस्कृतीत आणि शिवाच्या रौद्ररूपातील तांडवनृत्यात कसे आहे, ते सोदाहरण पाहू !
शिवाचे तांडव ही ‘सर्जनशील विध्वंसा’ची मूळ सनातन संकल्पना !

ही संकल्पना वाचल्यावर कुठेतरी ऐकल्या ऐकल्यासारखी वाटते. मेंदूला थोडा अधिक ताण दिला, तर मनात येतात ते महादेव. थेट रुद्र स्वरूपातले !
‘रुद्र’ (शिव) हे संहारक देव मानले जातात. ब्रह्मा (निर्माता) आणि विष्णु (पालनकर्ता) यांच्या समवेत शिवाचे कार्य ‘संहार’ किंवा ‘लय’ हे आहे; परंतु रुद्राचा संहार हा क्रूर किंवा नकारात्मक नाही; तो ‘कल्याणकारी विनाश’ आहे !
भगवान शिवाचे ‘तांडव नृत्य’ हे सर्जनशील विध्वंसाचे सर्वांत मोठे प्रतीक आहे. एका हातात ‘डमरू’ (सृजनाचा नाद) आणि दुसर्या हातात ‘अग्नि’ (विनाशाची ज्वाळा) घेऊन नृत्य करणारे नटराज हेच दर्शवतात की; सर्जन आणि विनाश या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. शुम्पिटरची ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ ही संकल्पना मानवी बाजारापुरती मर्यादित आहे; तर रुद्राची विनाशाची संकल्पना ही संपूर्ण ब्रह्मांडाला लागू पडते.
अर्थशास्त्रातील संकल्पना ‘सर्जनशील विध्वंस’ !

जागतिक अर्थशास्त्रात एक अत्यंत प्रभावी संकल्पना आहे; जिचे नाव आहे – ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ म्हणजे सर्जनशील विध्वंस ! जोसेफ शुम्पिटर या प्रख्यात अर्थतज्ञाने वर्ष १९४२ मध्ये त्याच्या ‘कॅपिटलिझम, सोशलिझम अँड डेमोक्रसी’ (भांडवलशाही, समाजवाद आणि लोकशाही) या पुस्तकात ही संकल्पना मांडली. या संकल्पनेचा मूळ गाभा असा आहे, ‘नव्याच्या निर्मितीसाठी जुन्याचा विनाश होणे अपरिहार्य असते.’ जोपर्यंत जुन्या, कालबाह्य गोष्टी नष्ट होत नाहीत; तोपर्यंत नव्या आणि अधिक कार्यक्षम गोष्टींना जागा मिळत नाही.
अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा एखादी नवीन व्यवस्था, तंत्रज्ञान किंवा उत्पादन येते; तेव्हा ते जुन्या व्यवस्थेला मोडीत काढते. उदाहरणार्थ ई-मेलने पत्रांची जागा घेतली, डिजिटल छायाचित्रकाने जुन्या ‘फिल्म रोल’चा अंत केला आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) अनेक जुन्या कार्यपद्धती पालटत आहे. हा विनाश वेदनादायी वाटला, तरी तो प्रगतीसाठी आवश्यक असतो. यालाच अर्थशास्त्रात ‘सर्जनशील विध्वंस’ म्हटले जाते. या संकल्पनेलाच उद्देशून असलेल्या संशोधनावर वर्ष २०२५ चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
‘श्रीरुद्राष्टकम्’मध्ये आलेली ‘सर्जनशील विध्वंसा’ची संकल्पना !

रुद्राच्या या विध्वंसक तरीही कल्याणकारी रूपाचे वर्णन वेदांमध्ये आणि स्तोत्रांमध्ये अत्यंत सुंदररित्या केले आहे. ‘रुद्राष्टकम्’ किंवा वेदांमधील रुद्राच्या वर्णनाशी नाते सांगणारा आणि ‘सर्जनशील विध्वंसा’चा गाभा स्पष्ट करणारा एक श्लोक पहा –
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशमखण्डमजं भानुकोटिप्रकाशम् ।
त्रयःशूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् ।। – श्रीरुद्राष्टकम्
अर्थ : इथे रुद्र ‘प्रचण्डं’ (अतिशय उग्र/विनाशक) आणि ‘भानुकोटिप्रकाशम्’ (करोडो सूर्यांच्या तेजाप्रमाणे नवनिर्माण करणारा) असल्याचे सांगितले आहे. इथे ‘त्रयःशूलनिर्मूलनं’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. याचा अर्थ तो ‘तिन्ही प्रकारच्या तापांचा किंवा अडथळ्यांचा मुळापासून नाश करणारा’ आहे. जेव्हा तो जुनी दु:ख आणि अडथळे यांचे ‘निर्मूलन’ (विनाश) करतो, तेव्हाच तो ‘भावगम्यम्’ (भक्तीने प्राप्त होणारा, नवनिर्मितीचा आनंद देणारा) ठरतो. हे ‘सर्जनशील विध्वंस’ नाही; तर अन्य काय आहे ?
यजुर्वेदात आलेली ‘सर्जनशील विध्वंसा’ची संकल्पना !
आता ही यजुर्वेदीय ऋचाही पहा –
‘या ते॑ रुद्र शि॒वा त॒नूरघो॒राऽपा॑पकाशिनी।
तया॑ नस्त॒न्वा शन्त॑मया॒ गिरि॑शन्ता॒भि चा॑कशीहि ।।’
अर्थ : हे रुद्रा, तुझे जे रूप ‘घोर’ (भयंकर) नाही, तर ‘शिव’ (कल्याणकारी) आणि ‘अपापकाशिनी’ (पाप किंवा अज्ञान जाळून टाकणारे/पुण्य प्रकाश देणारे) आहे, त्या अत्यंत शांत आणि सुखकारक रूपाने तू आमच्याकडे बघ (आमचे कल्याण कर).
ऋग्वेदात आलेली ‘सर्जनशील विध्वंसा’ची संकल्पना !
ऋग्वेदाच्या ७ व्या मंडलातील मृत्युविमोचनी ऋक् पहा –
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ।।’ – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५९, ऋचा १२
अर्थ : कीर्तीमान आणि महाशक्तीशाली त्र्यंबकाचे (रुद्राचे) आम्ही यजन करतो. हे रुद्रा, काकडी देठापासून खुडावी, त्याप्रमाणे आम्हाला मृत्यूपासून मुक्त कर; पण अमरत्वापासून दूर ठेवू नको.
स्थित्यंतराविषयी शोक न बाळगण्यास श्रीकृष्णाने सांगणे !
हे सारं का ? भगवंत म्हणतात –
‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।।’ – २/२७ (भगवद्गीता)
अर्थ : जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.
कालचक्राचे अधिपती – रौद्रारूप महादेव !
‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ ही केवळ नोबेल विजेत्या अर्थतज्ञांच्या पुस्तकातील संकल्पना नसून हा वैदिक काळापासून ज्ञात असलेला विश्वाचा शाश्वत नियम आहे. अर्थशास्त्र ज्याला ‘इनोव्हेशन सायकल’ म्हणते; त्यालाच अध्यात्म ‘कालचक्र’ म्हणते. या पालटाचे; या स्थित्यंतराचे अधिपती आहेत रौद्ररूप महादेव. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे अव्याहत चक्र आहे. आपण येऊ, जाऊ. कदाचित् पुन्हा येऊ, पुन्हा जाऊ; पण महादेव होते, आहेत, रहातील ! तेच या सार्या पसार्यात शाश्वत आहेत ! ते काळाचेही ‘काळ’ आहेत; ते महाकाल आहेत !!
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?