(टीप : केस स्टडी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे सखोल परीक्षण)
‘आपल्याला शारीरिक त्रास झाल्यावर आपण भौतिकोपचार तज्ञाकडे (‘फिजिओथेरपिस्ट’कडे) जातो. तेव्हा तेथे आपल्या त्रासानुसार आपल्याला उपचार दिले जातात. विशिष्ट उपचारांनंतर त्रासानुरूप व्यायामही करण्यास सांगितले जाते. रुग्णाने हे व्यायाम नियमित करून काही दिवसांनी भौतिकोपचार तज्ञाला आढावा द्यायचा असतो. त्यामुळे भौतिकोपचार तज्ञ रुग्णाची पुन्हा पडताळणी करतो आणि त्या रुग्णाला पुढील टप्प्याचे व्यायाम देत असतो. रुग्ण टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता सुधारून त्रासापासून मुक्त होऊ लागतो; पण बर्याचदा असे लक्षात येते की, रुग्णाला दिलेले व्यायाम रुग्ण सातत्याने करत नाही. व्यायाम केल्यावर तात्कालिक वेदना न्यून झाल्यानंतर रुग्ण व्यायाम करणे बंद करतो आणि त्यामुळे त्या रुग्णामध्ये सुधारणा दिसून येत नाही. ‘रुग्णाने व्यायाम कोणते करावेत ? कसे करावेत ? उपचारांची दिशा कोणती असावी ?’, यांविषयी भौतिकोपचार तज्ञ त्याला मार्गदर्शन करतो; पण ‘सांगितलेले व्यायाम सातत्याने करणे’, हे त्या रुग्णाचेच दायित्व असते.
धान्य निवडण्याची सेवा करणार्या ६५ वर्षांच्या एका साधिकेचा अनुभव सांगण्यासारखा आहे. त्यांनी आयुष्यभर शेतात मोठ्या प्रमाणात श्रमाची कामे केली होती. ‘जड वस्तू उचलणे, सतत वाकून काम करणे’, यांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करण्याची सवय होती. त्यांचे स्नायू मुळातच बळकट होते; पण आता त्यांच्या दिनक्रमात पालट होऊन त्यांची बैठी जीवनशैली झाली होती.

१. साधिकेची पडताळणी केल्यावर लक्षात आलेली सूत्रे
अ. त्यांना मान सतत खाली वाकवून सलग ५ – ६ घंटे बसून धान्य निवडावे लागत होते. त्यामुळे त्यांची पाठ, खांदा आणि मान यांवर पुष्कळ ताण होता.
आ. या ताणामुळे स्नायूंमध्ये संवेदनशील बिंदू (Trigger Points) निर्माण झाले होते.
इ. त्यांना ‘फ्रोजन शोल्डर्स’सदृश (आखडलेल्या खांद्यांची) लक्षणे दिसू लागली होती.
ई. त्यांना त्यांचे दोन्ही खांदे पूर्णपणे वर नेता येत नव्हते.
उ. त्यांच्या पाठीच्या वरच्या भागात आणि बाजूच्या स्नायूंमध्ये पुष्कळ कडकपणा (spasm) होता. त्यामुळे हलके दाबल्यावरही त्यांच्या स्नायूंमध्ये पुष्कळ वेदना (Tenderness) होत होत्या.

२. भौतिकोपचार तज्ञाने सांगितलेले व्यायाम साधिकेने सकारात्मक राहून नियमितपणे आणि सातत्याने करणे
‘सलग एकाच स्थितीत मान खाली वाकवून धान्य निवडण्यासाठी बसणे, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव’, ही त्यांच्या वेदनांची कारणे होती. मी त्यांच्या त्रासासाठी आवश्यक ते भौतिकोपचार केले आणि त्यांना त्यांच्या त्रासानुरूप व्यायाम करायला सांगितले. मी सांगितलेले व्यायाम साधिकेने नियमितपणे केले. त्यांनी व्यायामाची दिनचर्या प्रामाणिकपणे पाळली आणि त्यात सातत्य ठेवले. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे व्यायामाच्या संदर्भात त्या नेहमी सकारात्मक होत्या. या साधिकेला उपचारांच्या वेळी वेदना होत असल्या, तरी त्याकडे पहाण्याची त्यांची दृष्टी सकारात्मक होती. परिणामस्वरूप काही दिवसांत त्यांच्या वेदना न्यून होत गेल्या आणि त्यांची हालचाल सुधारू लागली.
३. व्यायाम केल्यावर साधिकेला झालेले लाभ
अ. पूर्वी १०० अंश कोनातून वर जाणारे त्यांचे दोन्ही हात आता त्यांना १८० अंश कोनातून वर नेता येऊ लागले.
आ. त्यांना त्यांचे खांदेही वर नेता येऊ लागले आणि त्यांच्या खांद्यांची हालचाल मोकळेपणाने होऊ लागली.
इ. हालचाली करतांना आणि दाबल्यावर होणार्या वेदना लक्षणीयरित्या न्यून झाल्या.
ई. स्नायूंची शक्ती आणि लवचिकता वाढली.
उ. स्नायूंमधील संवेदनशील बिंदू (Trigger points) आणि घट्टपणा नाहीसा झाला.
४. ‘केस स्टडी’वरून स्पष्ट झालेले सूत्र
या उदाहरणावरून स्पष्टपणे लक्षात येते, ‘एखाद्याचे वय अधिक असले, तरी मनाने सकारात्मक राहून नियमितपणे योग्य व्यायाम केल्यामुळे त्याच्या शरिरात सुधारणा होऊ शकते.’ व्यायाम १ – २ दिवस केल्याने नव्हे, तर नियमितपणे केल्यावरच शरिरात योग्य सुधारणा होत असतात.
यासाठी भौतिकोपचार तज्ञाने (‘फिजिओथेरपिस्ट’ने) दिलेली व्यायामाची दिनचर्या पाळून आजारांपासून लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करूया ! स्वावलंबी बनूया !’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (२७.१२.२०२५)
🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !