बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा; परंतु आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सर्वांत उपेक्षित प्रांत आहे. दशकांपासून चालू असलेला येथील स्वातंत्र्यलढा आता एका अत्यंत घातक आणि निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (‘बी.एल्.ए.’ने) पुकारलेले ‘ऑपरेशन हेरोफ (ब्लॅक स्टॉर्म) २.०’ हे केवळ स्थानिक बंड राहिलेले नाही, तर ते पाकिस्तानचे लष्करी वर्चस्व आणि चीनची जागतिक महत्त्वाकांक्षा यांना दिलेले थेट आव्हान आहे. हा संघर्ष आता डोंगरदर्यांतून निघून शहरांच्या वेशीवर आणि चिनी प्रकल्पांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

१. ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ : युद्धाचे पालटलेले स्वरूप

पूर्वीचा बलुच संघर्ष हा मुख्यतः ‘हिट अँड रन’ (आक्रमण करा आणि पळून जा), या गनिमी काव्यावर आधारित होता; मात्र ‘ऑपरेशन हेरोफ २.०’मध्ये ‘बी.एल्.ए.’ने स्वतःची रणनीती पूर्णपणे पालटली आहे.
अ. समन्वित आणि बहुशहरी आक्रमणे : एकाच रात्रीत क्वेट्टा, ग्वादर, मस्तुंग आणि कलात यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आक्रमणे करून ‘बी.एल्.ए.’ने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश चव्हाट्यावर आणले आहे.
आ. आत्मघाती कारवाया आणि ‘मजिद ब्रिगेड’ : ‘बी.एल्.ए.’ची ‘मजिद ब्रिगेड’ आता आत्मघाती आक्रमणांचा वापर करत आहे. हे पालटलेले स्वरूप लष्करासाठी अधिक चिंताजनक आहे; कारण यात आक्रमण करणारा ‘करो किंवा मरो’, या जिद्दीने उतरत आहेत.
इ. महिला लढवय्यांचा सहभाग : शारी बलुचपासून चालू झालेला महिला आत्मघाती आक्रमणांचा ‘ट्रेंड’ (पद्धत) आता अधिक व्यापक झाला आहे. महिलांचा सहभाग या चळवळीला केवळ लष्करी नव्हे, तर सामाजिक अधिष्ठान प्राप्त करून देत आहे. सुरक्षादलांसाठी महिलांची पडताळणी करणे, हे तांत्रिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनले आहे.

२. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि चिनी अस्वस्थता
बलुचिस्तान हा चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे, विशेषतः ग्वादर बंदर; मात्र स्थानिक बलुच जनतेचा असा आरोप आहे की, त्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट चीन आणि पंजाब (पाकिस्तान) मिळून करत आहेत.
अ. चिनी नागरिकांवर लक्ष्य : ‘ऑपरेशन हेरोफ’च्या अंतर्गत चिनी अभियंते आणि कामगार यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत. यामुळे बीजिंगचा इस्लामाबादवरील विश्वास उडाला आहे.
आ. सुरक्षेचा व्यय : चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला स्वतःच्या लष्कराचा मोठा हिस्सा तिथे तैनात करावा लागत आहे, ज्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच खिळखिळी होत आहे.
इ. चीनचा दबाव : चीन आता त्याच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचे खासगी सुरक्षा रक्षक किंवा लष्करी तुकड्या तैनात करण्याची मागणी करत आहे, जी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वासाठी धोक्याची घंटा आहे.
३. पाकिस्तानी लष्कराच्या अपयशाची मीमांसा
जगातील ७ व्या क्रमांकाचे मोठे सैन्य असूनही पाकिस्तान बलुचिस्तानवर नियंत्रण मिळवू शकलेले नाही. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :

४. अफगाणिस्तानचा ‘फॅक्टर’ आणि प्रादेशिक राजकारण
पाकिस्तान वारंवार असा आरोप करतो की, ‘बी.एल्.ए.’ला अफगाणिस्तान आणि भारत यांच्याकडून साहाय्य मिळते. तथापि सद्यःस्थितीत तालिबानशासित अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. ‘ड्युरंड लाईन’वरील वादामुळे तालिबानने बलुच बंडखोरांकडे काणाडोळा केला असावा, असे मानले जाते; परंतु हे विसरता कामा नये की, हा संघर्ष मुख्यतः पाकिस्तानच्या अंतर्गत शोषणाचा परिणाम आहे.
५. संभाव्य दडपशाही आणि त्याचे परिणाम
‘ऑपरेशन हेरोफ’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान सरकार ‘ऑपरेशन अज्म-ए-इस्तेहकाम’सारख्या मोहिमा राबवत आहे. याचे परिणाम घातक ठरू शकतात.
अ. इंटरनेट आणि दळणवळण बंदी : माहिती दडपण्यासाठी इंटरनेट बंद केल्यामुळे सामान्य जनतेचा रोष अधिक वाढतो.
आ. सक्तीने गायब करणे (Enforced Disappearances) : संशयावरून तरुणांना उचलणे, या दुष्प्रवृत्तीमुळे ‘बलुच एकजुटता समिती’सारख्या नागरी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. माहंग बलुच यांच्यासारख्या नेतृत्वाखाली आता ही चळवळ शहरांमधील सुशिक्षित वर्गापर्यंत पोचली आहे.
६. भविष्यातील चित्र : संघर्षाची पुढील दिशा
येत्या ३ ते ५ वर्षांत बलुचिस्तानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
अ. जातीय दरी : पंजाबी लष्करी अधिकारी विरुद्ध बलुच ओळख हा संघर्ष गृहयुद्धाच्या दिशेने झुकू शकतो.
आ. आर्थिक दिवाळखोरी : जर चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्प बंद पडले किंवा चीनने गुंतवणूक मागे घेतली, तर पाकिस्तान पूर्णपणे आर्थिक गर्तेत सापडेल.
इ. राजकीय स्वायत्ततेची मागणी : जर पाकिस्तानने वेळीच लष्करी दडपशाही थांबवून राजकीय संवाद चालू केला नाही, तर बलुचिस्तानचा ‘दुसरा बांगलादेश’ होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.
७. पाकिस्तानची आतंकवादविरोधी रणनीती आणि सद्यःस्थिती
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याने मागे सोडलेली शस्त्रे ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) द्वारे ‘बी.एल्.ए.’ला पुरवली जात आहेत. जेव्हा खैबर पख्तुनख्वामध्ये ‘टीटीपी’वर दबाव येतो, तेव्हा ‘बी.एल्.ए.’ त्यांना आश्रय देते. एकत्रितपणे या दोन्ही गटांचा प्रभाव इतक्या मोठ्या क्षेत्रावर आहे की, पाकिस्तानी सैन्य एकाच वेळी दोन्ही ठिकाणी कारवाई करू शकत नाही. अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला ‘टीटीपी’वर दबाव आणणे आवश्यक वाटत नाही, तसेच पाकिस्तानचे समर्थक ‘हक्कानी नेटवर्क’ आता अफगाणिस्तानमध्ये पूर्वीइतके शक्तीशाली राहिलेले नाही.
आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारण असल्याने पाकिस्तानसाठी प्रदीर्घ आणि मोठी आतंकवादविरोधी मोहीम राबवणे कठीण जाईल.
८. निष्कर्ष
‘ऑपरेशन हेरोफ २.०’ हे पाकिस्तानसाठी केवळ लष्करी आव्हान नसून ते त्यांच्या धोरणात्मक अपयशाचे प्रतिबिंब आहे. बंदुकीच्या जोरावर एखादा भूभाग जिंकता येतो; पण तेथील लोकांची मने नाही. जोपर्यंत पाकिस्तान बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्थानिकांचा हक्क मान्य करत नाही आणि लष्करी अत्याचारांना पूर्णविराम देत नाही, तोपर्यंत बलुचिस्तानचा हा वणवा विझणे अशक्य आहे. पाकिस्तानला आता ‘लष्करी तोडगा’ सोडून ‘राजकीय तडजोडी’चा विचार करावा लागेल, अन्यथा हा ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ पाकिस्तानच्या नकाशावर कायमस्वरूपी ओरखडा उमटवेल.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (७.२.२०२६)
तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !
वातव्याधी आणि आयुर्वेदातील ‘पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन)’
कतारपासून कोळशापर्यंत : अखेर भारत स्वतःचे ऊर्जेवरील अवलंबित्व सोडू शकेल का ?
… तर जात्यात जाण्याची वेळ कधीही येऊ शकते !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !