अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने ‘यूएस् इंडो-पॅसिफिक कमांड’चे नाव पालटून पुन्हा ‘यूएस् पॅसिफिक कमांड’ असे केले. अमेरिकेचे तत्कालीन संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी वर्ष २०१८ मध्ये कमांडच्या नावात पालट करत त्यात ‘इंडो’ शब्द जोडला होता. चीनविरुद्ध भारताला महत्त्व देण्यासाठी ट्रम्प यांनीच नाव पालटले होते. त्या वेळी अमेरिकेने म्हटले होते की, हिंद महासागर (इंडियन ओशन) क्षेत्राचे सामरिक महत्त्व वाढत असून हे क्षेत्र प्रशांत महासागरच्या (पॅसिफिक ओशन) सुरक्षा व्यवस्थेशी पूर्वीपेक्षा अधिक जोडले गेले आहे.

काय आहे ‘यूएस्- पॅसिफिक कमांड’ ?

अमेरिकेचे सैन्यदल संपूर्ण जगाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागतो. त्यांच्यासाठी ११ कमांड आहेत. यांपैकी ६ धोरणात्मक म्हणजे ‘स्ट्रॅटेजिक’ (अण्वस्त्र आणि जागतिक रणनीतिक कारवायांचे नियोजन करणारे) आणि ५ कार्यात्मक म्हणजे ‘फंक्शनल’ (विशिष्ट प्रदेशाऐवजी विशिष्ट सैनिकी कामकाजासाठी उत्तरदायी असलेले) कमांड आहेत. ‘यूएस पॅसिफिक’ हे स्ट्रॅटेजिक कमांडचा भाग आहे. ही अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत महत्त्वाच्या सैन्य कमांडपैकी एक आहे. ही कमांड आशिया आणि प्रशांत महासागर परिसरात सक्रीय आहे.