थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)

तिहेरी तलाक; गुन्हा नोंद

पनवेल – येथे तिहेरी तलाकप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रारदार महिलेला पतीने ३ वेळा ‘तलाक’ म्हणत घटस्फोट दिला. सासरच्यांनी तिचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला.


समुद्रकिनार्‍यावर तेलाचा तवंग याला उत्तरदायी कोण ?

उरण – येथील नागाव-पिरवाडी समुद्रकिनार्‍यावर तेलाचा तवंग पसरला आहे. यामुळे सागरी जिवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात विविध रासायनिक उद्योग आणि आस्थापने मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा तवंग आला का, याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.


पोलीसदलाच्या आधुनिकीकरणासाठी निधी संमत !

मुंबई – महाराष्ट्र पोलीसदलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३ कोटी २८ लाख रुपयांची योजना संमत करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ६० टक्के निधी केंद्र, तर ४० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. सागरी सुरक्षा, अमली पदार्थवरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास यातून साहाय्य होईल.

संपादकीय भूमिका : पोलीसदलाच्या आधुनिकीकरणासह महाराष्ट्र गुन्हेगारीमुक्त होण्यासाठीही तातडीने पावले उचलली पाहिजेत !


उद्वाहन यंत्रावरून हाणामारी !

डोंबिवली – येथे इमारतीत उद्वाहन यंत्राच्या वादातून हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. उद्वाहन यंत्राच्या वापरामुळे वीजदेयकात वाढ होत असल्याने रात्रीच्या वेळी ते बंद ठेवण्याचे काहींचे म्हणणे होते, तर काहींचा त्यांना विरोध होत होता.

संपादकीय भूमिका : संयम नष्ट झाल्याचा परिणाम !


रासायनिक रंग मिसळलेला चहा जप्त !

मुंबई – अंधेरीत चहा अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यात रासायनिक रंग मिसळला जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत समोर आला. या कारवाईत ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंगासह २ लाख १८ सहस्र रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षा केव्हा होणार ?