गोव्यात ३० जूनपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचे ‘चलन’ येणार

२६ जोडरस्त्यांवर अत्याधुनिक प्रणाली कार्यरत करणार

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, १७ जून (वार्ता.) – गोव्यात ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आय.टी.एम्.एस्.) अर्थात् अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली चालू करण्यासाठी २६ प्रमुख ठिकाणांची (‘जंक्शन’ची) निवड करण्यात आली आहे. ३० जूनच्या मध्यरात्रीपासून ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाच्या भ्रमणभाषवर नियमाचे उल्लंघन केल्याचे नोंद झालेल्या छायाचित्रासह चलन पाठवले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आय.टी.एम्.एस्.’ प्रणाली काय आहे ?

‘आय.टी.एम्.एस्.’ ही दंडात्मक कारवाई करणारी संपूर्णपणे ऑनलाईन प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संवेदक (‘सेन्सर्स’) आणि संगणकीय दृश्य तंत्रज्ञान (कॉम्प्युटर व्हिजन) या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून ही यंत्रणा काम करणार आहे.

‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणाली कुठे कार्यान्वित असणार ?

‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणाली मेरशी येथील जोडरस्ता; बिर्ला क्रॉस-वेर्णा, बेळ्ळे-नावेली, जुने मार्केट सर्कल-मडगाव, फातोर्डा, टाटा शो-रूम-नुवे, गोवा सिरॅमिक्स-नुवे, गोरवटी-नुवे, नुवे बगलमार्ग, आर्ले सर्कल, बोळशे सर्कल-घोगळ-मडगाव, मिसिंग लिंक-लोटली, नावेली, पावर हाऊस सर्कल-मडगाव, मुंज विहार सर्कल-मडगाव, टायटन-वेर्णा, आयएफबी-वेर्णा, रवि कॅफे-वेर्णा, चिखली पंचायत, बेताळभाटी, ग्रीन हाऊस-कोलवा, मारीया हॉल-बाणावली, आंबेडकर सर्कल-कुडचडे, तार-बस्तोडा-म्हापसा, आकय-म्हापसा आणि धुळेर-म्हापसा या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे.

या ठिकाणी वाहन चालवतांना भ्रमणभाष वापरणे, सीटबेल्ट न वापरणे, शिरस्त्राण परिधान न करणे, गतीने वाहन चालवणे, आपत्कालीन सेवेला अडथळा निर्माण करणे, ३ जणांनी बसून दुचाकी चालवणे, बेशिस्तपणे ओव्हरटेक करणे (समोरचे वाहन ओलांडणे), धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, मालवाहतुकीच्या वाहनामध्ये प्रवासी वाहतूक करणे, फॅन्सी (चित्रविचित्र) क्रमांकपट्टी वापरणे आदी प्रकार नियमांचे उल्लंघन करणारे आहेत. अशा वेळी दंड ठोठावला जाणार आहे. दुसर्‍यांदा नियम मोडल्यास दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे.