नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना !

पुणे – नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेने अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतरही आरोपीने मृतदेहावर अत्याचार केल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला. विशेष सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालाचा संदर्भ देत हा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर सादर केला. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष वाचून दाखवत त्यांनी आरोपीच्या क्रूर वृत्तीचे स्वरूप स्पष्ट केले.

अन्वेषणातील पत्रव्यवहार, वैद्यकीय पुरावे, शवविच्छेदन अहवाल, अत्याचारांचे स्वरूप, मृत्यूचे कारण इत्यादी महत्त्वाचे पुरावे त्यांनी न्यायालयात सादर केले. अंतिम साक्षीदार आणि मुख्य अन्वेषण अधिकारी यांच्या उलट तपासणीचे काम विशेष सरकारी अधिवक्ता अजय मिसर आणि त्यांचे साहाय्यक अधिवक्ता प्रथमेश शिंगणे यांनी केले. सरकारी पक्षाची साक्ष झाल्यानंतर आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया चालू होईल. या सुनावणीच्या वेळी तक्रारदार पक्षाच्या अधिवक्त्या राधिका नावंदर जोशी आणि अधिवक्ता मनीष पाडेकर न्यायालयात उपस्थित होते.