कोल्हापुरात पाणीबाणी; नगरसेवक आक्रमक !

  • कोल्हापूर महापालिका सर्वसाधारण सभा

  • २० हून अधिक टँकर देण्याची आयुक्तांची ग्वाही !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – शहरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेला अपुरा पाणीपुरवठा, वारंवार मागणी करूनही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर न मिळणे या कारणांमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासन १० टँकर चालू असल्याची माहिती देत आहे, प्रत्यक्षात ३ ते ४ टँकरच चालू आहेत. जलसंधारण विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्या नियोजनशून्यतेचा फटका कोल्हापूरकरांना बसत आहे. आणि यामुळे पाणीपुरवठ्याच्या सर्व योजना बंद पडल्या आहेत, असा आरोप करत तात्काळ उपाययोजना काढण्याची मागणी केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून १८ जूनला सायंकाळपर्यंत शहराचा पाणीपुरठा सुरळीत होईल. आता २० टँकर देण्यात येतील, तसेच आढावा घेऊन आवश्यकतेनुसार टँकर वाढवू, अशी ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. १८ जून या दिवशी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ. रूपाराणी निकम होत्या.

प्रशासनाने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन ४ नगरसेवकांसाठी पाण्याचा १ टँकर द्यावा, तसेच कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत. – महापौर सौ. रूपाराणी निकम

शिवसेनेचे नगरसेवक श्री. शारंगधर देशमुख यांनी ‘प्रत्येक प्रभागात टँकर द्या’, अशी मागणी केली. काही नगरसेवकांनी ‘गत वेळी गणेशोत्सवाच्या कालावधीत घेतलेल्या टँकरचे देयक महापालिका प्रशासनाने दिलेले नाही’, असा आरोप केला.

या प्रसंगी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, ‘‘राज्यात कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या काळम्मावाडी धरणातून येणारे पाणी अल्प झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या आता सोडवण्यात आली आहे. शिंगणापूर, बालिंगा येथील पाणी योजनांची दुरुस्तीही करण्यात आली आहे. खराब झालेले ‘बरगे’ (फळ्या) पालटण्यात आलेल्या आहेत. टँकर भरण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या शहरातील सर्व विहिरी, कूपनलिका यांची दुरुस्ती करून त्यातून पाणीपुरवठा करण्यात येईल.’’