वातव्याधी आणि आयुर्वेदातील ‘पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन)’

आजच्या वेगवान जीवनशैलीत शारीरिक वेदना ही एक सामान्य समस्या बनली आहे. मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना यांनी त्रस्त असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

१. ‘वातव्याधी’ म्हणजे काय ? आणि वेदना वाढण्यामागील कारणे

बहुतेक लोक तात्काळ आरामासाठी औषध विक्री दुकानात (‘मेडिकल शॉप’मध्ये) मिळणार्‍या ‘पेनकिलर’ (वेदनाशामक) गोळ्यांकडे वळतात; परंतु सतत वेदनाशामक गोळ्या घेतल्याने शरिरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः जठर, मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) यांच्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदात अशा वेदनांना ‘वातव्याधी’ मानले जाते. जेव्हा शरिरातील ‘वात’ दोषाचे संतुलन बिघडते, तेव्हा शरिरात वेदना होणे, कडकपणा येणे, सांध्यांची हालचाल न्यून होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. आजची अयोग्य आहारपद्धत, वाढता मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, निद्रानाश आणि घंटोन्‌घंटे बसून काम करण्याची सवय ही वात वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

२. वेदना न्यून करण्यासाठी आयुर्वेदाचे उपचार

वैद्या (कु.) नित्यश्री वाय

आयुर्वेद केवळ तात्पुरती वेदना न्यून करत नाही, तर त्या वेदनेच्या मूळ कारणाचे निवारण करण्यावर भर देतो. यामध्ये जीवनशैली, आहार, औषधे आणि पंचकर्म चिकित्सेला विशेष महत्त्व दिले जाते.

अ. वातव्याधी नियंत्रणासाठी ‘अभ्यंग’ (तेल मसाज) ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. प्रतिदिन रिकाम्या पोटी अभ्यंग केल्याने वात शमतो आणि स्नायू, तसेच सांध्यांना बळकटी मिळते. विशेषतः ‘धन्वन्तरि’ तेल, ‘मुरिवेन्ना’ तेल, ‘नारायण’ तेल यांसारख्या आयुर्वेदाच्या तेलांचा वापर केल्याने वेदना आणि कडकपणा न्यून होण्यास साहाय्य होते.

आ. यासह ‘स्वेदन’ (वाफ घेणे / शेकणे) चिकित्सेमुळे शरिराचा कडकपणा न्यून होतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. घरी गरम पाण्याने स्नान करण्यामुळे स्वेदनाचेच कार्य होते आणि शरिराला सुखद अनुभव घेता येतो. रात्रीच्या वेळी ‘पादाभ्यंग’ (पायांना मसाज) केल्याने शरिराचा थकवा न्यून होतो आणि उत्तम झोप लागण्यास साहाय्य होते.

३. आहार आणि योग यांच्या माध्यमातून घ्यायची काळजी

आहाराच्या संदर्भातही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक कोरडे, थंड आणि प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ वात वाढवतात. त्याऐवजी गरम, सात्त्विक आणि सहज पचेल, असा आहार घेणे उत्तम ठरते. प्रतिदिन योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम केल्याने शरिरातील लवचिकता सुधारते अन् वेदना न्यून होतात.

४. दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेद !

आजच्या काळात जेव्हा वेदनाशामक औषधांवरील अवलंबित्व वाढत आहे, तेव्हा आयुर्वेद शरिराला कोणतीही इजा न पोचवता नैसर्गिक आणि सर्वांगीण वेदना व्यवस्थापनाचा मार्ग दाखवतो. निरोगी जीवनशैली आणि आयुर्वेदाचे योग्य पालन करून आपण दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवू शकतो.

– वैद्या (कु.) नित्यश्री वाय., श्री शारदा आयुर्वेदालय, जिल्हा शिवमोग्गा, कर्नाटक.