१. महोत्सवासाठी मैदानाची निवड करण्याच्या प्रक्रियेत स्थूल आणि सूक्ष्म पातळीवर होणार्या विचारप्रक्रियेविषयी उत्तरदायी साधकांकडून शिकता येणे
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’पूर्वी २ मास एका उत्तरदायी साधकांनी मला ‘गोव्यात २५,००० लोक बसू शकतील आणि सुमारे १,००० बसेस अन् गाड्या यांसाठी पार्किंगची सोय करता येईल, असे मैदान आध्यात्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध होईल का ?’, याविषयी विचारणा केली. त्यानंतर आम्ही गोव्यातील सर्व मैदानांना भेट दिली; मात्र आवश्यक ते सर्व निकष पूर्ण करणारे एकही मैदान सापडत नव्हते. शेवटी फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैदान निवडण्यात आले; कारण ते बहुतेक निकष पूर्ण करत होते. या प्रक्रियेतून मला उत्तरदायी साधकांकडून मैदान निवडीसंबंधी आणि त्या अनुषंगाने सूक्ष्म पातळीवर होणार्या विचारप्रक्रियेविषयी पुष्कळ शिकता आले. त्यांचा नम्र समर्पणभाव, निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न यांमुळे मला पुष्कळ प्रेरणा मिळाली.
२. ‘महोत्सवासाठी अनुमती काढणे’ इत्यादी सेवा करतांना श्री. रमेश शिंदे आणि श्री. चेतन राजहंस यांच्याकडून ‘प्रतिकूल परिस्थितीतही शांतपणे अन् संयमाने सेवा करणे’, हा गुण शिकायला मिळणे
मैदान निश्चित झाल्यानंतर ‘विविध प्रकारच्या अनुमती मिळवणे आणि महोत्सवात सरकारचा सहभाग निश्चित करणे’, यांसाठी शासकीय अधिकार्यांना संपर्क करणे आवश्यक होते. त्यानुसार मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री, सचिव, तसेच विविध खात्यांचे संचालक यांना निमंत्रणे देण्यात आली. यापूर्वी एक व्यावसायिक म्हणून माझी त्यांच्याशी क्वचित्च भेट व्हायची; परंतु शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने ही भेट वारंवार होऊ लागली. कधी दोन दिवसांआड, तर कधी प्रतिदिन त्यांना भेटावे लागे. महोत्सवाच्या निमित्ताने असलेली ही सेवा शिकण्याची एक निराळीच प्रक्रिया होती; कारण महोत्सवाविषयीची सूत्रे न्यूनतम वेळेत, अनेकदा गर्दीत उभे राहून आणि नेमकेपणाने सांगणे आवश्यक असायचे. या सगळ्या प्रक्रियेत मला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. ‘त्यांचे विविध विषयांवरील सखोल ज्ञान आणि महत्त्वाचे म्हणजे, भेटीसाठी घंटोन्घंटे वाट पहावी लागली, तरीही त्यांचा अविचल संयम अन् प्रतिकूल परिस्थितीतील त्यांची शांत वृत्ती’, हे खर्या आध्यात्मिक शिस्तीचे उदाहरण होते.
३. ‘सर्व साधकांनी महोत्सवाचा आनंद मुक्तपणे अनुभवावा’, यासाठी सर्व सेवांचे दायित्व ठेकेदारांना दिल्याचे कळताच गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेने मन भरून येणे

सरकारी अनुमती मिळवण्याची प्रक्रिया चालू असतांनाच या भव्य कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सेवा पुरवणार्या ठेकेदारांची निवड करणे आवश्यक होते. माझा स्वतःचा व्यवसाय असला, तरी इतका मोठा कार्यक्रम मी कधीच हाताळलेला नव्हता किंवा त्याचे नियोजन केले नव्हते. माझ्यावर हे उत्तरदायित्व सोपवल्याबद्दल मी वरिष्ठ साधकांप्रती कायम ऋणी राहीन. गेली २५ वर्षे आम्ही साधकच अशा प्रकारच्या सेवा स्वतः करत होतो; परंतु या वेळी ‘सर्व साधकांनी महोत्सवाचा आनंद मुक्तपणे अनुभवावा’, यासाठी सर्व सेवांचे दायित्व ठेकेदारांना देण्यात आले. हे सूत्र लक्षात आल्यावर माझे मन गुरूंप्रतीच्या कृतज्ञतेने भरून आले. आपल्या गुरूंनी आपल्याप्रती दाखवलेली ही आत्मीयता आणि काळजी, म्हणजेच आपल्याला मिळालेले सर्वांत मोठे वरदान आहे.
४. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे अद्वितीयत्व !
४ अ. विविध उपक्रम आणि कार्यक्रम यांमुळे महोत्सवातील वातावरण पवित्र झाल्याचे जाणवणे : हा महोत्सव खरोखरच अद्वितीय होता. ‘अध्यात्म’ हा या महोत्सवाचा केंद्रबिंदू होता. ‘हिंदूसंघटनासाठीच्या उपाययोजना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच यापूर्वी कधीही न पाहिलेल्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन’, यांमुळे तो अधिकच समृद्ध बनला. दर्शनासाठी संतांच्या पादुका उपलब्ध करून दिल्यामुळे त्या वातावरणाला एक पारंपरिक आणि आदरयुक्त स्पर्श झाला होता. त्या पवित्र वातावरणाने उपस्थित प्रत्येक जिवाला ईश्वराच्या अधिक निकट नेले.
४ आ. गुरुकृपेने एकाच व्यासपिठावर मान्यवर, तसेच राजकीय आणि आध्यात्मिक नेते एकत्र येण्याचा दुर्मिळ योग जुळून येणे : या महोत्सवाचे अन्य एक वैशिष्ट्य असे की, एकाच व्यासपिठावर मान्यवर, तसेच राजकीय आणि आध्यात्मिक नेते एकत्र आले होते. परस्परांचा आदर करत झालेले हे एकत्रीकरण फार दुर्मिळ होते. या कार्यक्रमाने आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यांचे मूळ स्वरूप अबाधित राखले. त्यामुळे तो एक संस्मरणीय अन् समृद्ध करणारा अनुभव ठरला. ‘या महोत्सवाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी कृतज्ञ आहे. ‘महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकाच व्यासपिठावर येणे’, ही ईश्वरी कृपाच होती.
४ इ. ‘सर्वांना प्रसादवाटप करणे’, ही ‘प्रत्येक घरात पवित्रता नांदावी’, यासाठी दूरदृष्टी ठेवून रचलेली एक सुबुद्ध संकल्पना असल्याचे जाणवणे : या सर्वांपेक्षा अधिक प्रेरणादायी ठरली, ती संपूर्ण गोवाभर ज्यांनी ज्यांनी या महोत्सवासाठी सहकार्य केले, त्या त्या सर्व सहभागी व्यक्ती, हितचिंतक, अर्पणदाते, शासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांना प्रसादवाटप करण्याची योजना. ‘नामजप करत छोट्या पिशवीत भरलेल्या अक्षता आणि प्रसाद देऊन ‘अक्षता आपल्या घरातल्या धान्याच्या कोठीत ठेवाव्यात’, अशी सूचना देणे’, ही केवळ व्यापक योजना नाही, तर ‘प्रत्येक घरात पवित्रता नांदावी’, यासाठी दूरदृष्टी ठेवून रचलेली एक सुबुद्ध संकल्पना आहे. पवित्रतेचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून ही कल्पना अत्यंत मार्मिक आहे. महोत्सवाचे आशीर्वाद घराघरांत पोचवणारी ही एक पवित्र कृती ठरली.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव खरोखरच प्रेरणादायी होता. महोत्सवाच्या माध्यमातून मला त्याच्या आध्यात्मिक ध्येयांशी जोडले जाण्याची एक संधी मिळाली. या भव्य उत्सवाचा एक भाग व्हायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. महोत्सवातील प्रत्येक क्षण मला काही ना काही शिकवून गेला, तसेच अध्यात्म आणि आंतरिक शांती यांविषयी अमूल्य बोध देणारा ठरला. पवित्र विधी आणि प्रेरणादायी वक्तव्य यांमधून मला आत्मचिंतनाची दिशा मिळाली. या महोत्सवाने एक चिरंतन ठसा उमटवला आहे आणि त्यातून मिळालेली शिकवण मी नम्रतेने अन् आनंदाने पुढे नेईन. ‘या महोत्सवात अनुभवलेली दैवी कृपा सदैव आम्हा सर्वांना मार्गदर्शन करो’, हीच प्रार्थना !’
– श्री. नारायण नाडकर्णी (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (३१.५.२०२५)
|

हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !