सध्या चालू असलेल्या ‘टी २० विश्वचषका’च्या निमित्ताने…
अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अध्यात्माने धर्म, राष्ट्र, अर्थ, राजकारण, समाजकारण, क्रीडा असे प्रत्येक क्षेत्रच व्यापले आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने आध्यात्मिक दृष्टीकोन बाळगल्यास वा अध्यात्माचा अंगीकार केल्यास संबंधिताला नक्कीच लाभ होतो. याच पद्धतीने चेंडूफळीच्या (क्रिकेटच्या) खेळातील विविध खेळाडूंनी केलेल्या अध्यात्माच्या अंगीकारामुळे त्यांना झालेले लाभ दर्शवणारी काही सूत्रे येथे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
संकलक : श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०२५)

१. ‘अर्जुन पुरस्कार’प्राप्त पद्मभूषण सुनील गावस्कर
कसोटी क्रिकेटविश्वात सर्वप्रथम १०,००० हून अधिक धावा करणार्या सुनील गावस्कर यांच्यावर अध्यात्माचा प्रभाव होता. या संदर्भातील उल्लेख गावस्कर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. त्यांनी एका वार्तालापात सत्य साईबाबा यांच्याविषयी आलेल्या अविस्मरणीय अनुभूती कथन केल्या आहेत. त्यांनी सांगितले, ‘सत्य साईबाबा यांच्या आध्यात्मिक शिकवणीचा माझ्यावर पुष्कळ परिणाम झाला. त्यांचे ग्रंथ वाचल्याने माझ्यात परिस्थिती स्वीकारणे, संयम बाळगणे, प्रतिकूल परिस्थितीतही शांत रहाणे इत्यादी गुण वाढले.’
१ अ. सुनील गावस्कर यांच्या एकाग्रतेचे उदाहरण : एकदा भारत आणि पाकिस्तान यांचा क्रिकेट सामना चालू होता. गावस्कर फलंदाजी करत होते. समोरच उजव्या हाताला जावेद मियांदाद क्षेत्ररक्षण करत होते. त्यांच्यात पुढील संभाषण झाले.
जावेद : क्षमा करा हा, सनीभाई ! मी तुम्हाला शिवी दिली.
सुनील : शिवी दिली ? केव्हा ?
जावेद : अहो, हे काय तुमच्या समोरच तर मी उभा आहे. येथेच तर उभे राहून मी शिवी दिली.
सुनील : मी तर काही ऐकलेच नाही !

जावेद : काय सांगता ? अहो, येथेच तर मी उभा आहे.
सुनील : मला वाटले, तू माझ्या मागे उभ्या असलेल्या सलीम युसूफसह काहीतरी बोलत आहेस.
जावेद : शेवटचे विचारतो, खरेच तुम्ही काही ऐकले नाही ?
सुनील : नाही.
जावेद : (निराशेच्या सुरात) अरेच्चा, मग मी विनाकारणच तुमची क्षमा मागितली !
या प्रसंगावरून सुनील यांच्या शांत रहाण्याचा आणि अयोग्य कृतींकडे दुर्लक्ष करण्याचा विरोधी संघाच्या खेळाडूंवर आपोआपच परिणाम व्हायचा, हे लक्षात येते.
१ आ. सुनील गावस्कर यांच्याविषयी अन्य देशांतील तत्कालीन खेळाडूंची मते
१ आ १. इम्रान खान, पाकिस्तान : गोलंदाजाचे मुख्य अस्त्र असते, उसळता चेंडू. जेव्हा आम्ही सुनील गावस्कर यांना उसळता चेंडू टाकायचो, तर ते शांतपणे तो सोडून द्यायचे. त्यामुळे त्यांना बाद करणे आम्हाला अवघड जात होते.
सुनील यांनी ज्या काळात मैदान गाजवले, तो काळ भयंकर गोलंदाजांचा काळ होता. वेस्ट इंडिजच्या ७ फूट उंचीच्या गोलंदाजांच्या वेगवान चेंडूंचा सामना तेव्हा सुनील शिरस्त्राण न घालता करायचा ! त्यामुळे माझ्या मते विश्वातील महान फलंदाज सुनीलच आहे !
१ आ २. व्हिव्हियन रिचर्ड्स, वेस्ट इंडिज : मी वेस्ट इंडिज संघात असल्याने मला वेस्ट इंडिजचे मायकेल होल्डींग, जोएल गार्नर, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स यांसारख्या फलंदाजांना घाबरवणार्या गोलंदाजांचा कधी सामना करावा लागला नाही; मात्र या सर्वांना पुरून उरले, ते सुनील गावस्कर ! त्यांनी या सर्वांसह अन्य देशांतील भेदक गोलंदाजीचा न घाबरता सामना करतांनाच खोर्याने धावा करून ते ‘सर्वाेत्तम फलंदाज’ असल्याचे सिद्ध केले आहे.
२. ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ प्राप्त भारतरत्न सचिन तेंडुलकर

२ अ. सचिन यांनी अध्यात्माचा आधार घेतल्याचे काही प्रसंग
२ अ १. सचिन हे श्री सत्यसाईबाबा यांचे भक्त आहेत. त्यांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले आहे की, सत्यसाईबाबा यांनी मला मनःशांती कशी मिळवायची अन् करुणा कशी कृतीत आणायची, हे शिकवले.
२ अ २. सचिन त्यांच्या क्रिकेटच्या साहित्यासमवेत नेहमी श्री गणेशाचे चित्र ठेवत असत. खेळातील कठीण समयीही ते श्री गणेशाचा धावा करत असत.
२ अ ३. सचिन यांच्या हाताच्या कोपराला जेव्हा दुखापत (टेनिस एल्बो) झाली आणि त्यांचा खेळ कायमचा थांबवावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा त्यांनी नारायण नागबळीसारखे आध्यात्मिक उपाय श्रद्धापूर्वक केले.
२ अ ४. भारतीय संस्कारांचे पालन करणारे सचिन हे क्रिकेटविश्वातील एक अजातशत्रू आणि सत्शील खेळाडू मानले जातात. त्यांच्या २४ वर्षांच्या क्रिकेटच्या कारकीर्दीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे अपवर्तन केलेले नाही अन् कुणाशीही त्यांचा वाद झाला नाही.
२ आ. १६ वर्षांच्या सचिन यांच्या निर्भयतेची प्रचीती देणारे प्रसंग : सचिन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ष १९८९ मध्ये पाकिस्तान दौर्यातून पदार्पण केले. या दौर्याच्या पहिल्या कसोटीत सचिन फलंदाजीला आले. तेव्हा पाकचे कर्णधार इम्रान खान यांनी त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी विचारले, ‘ए पोरा, तू येतांना आईची अनुमती घेऊन आला आहेस कि नाही ?’ सचिन काही बोलले नाहीत. त्यांनी २४ चेंडूत १५ धावा केल्या. तेव्हा बाद (आऊट) झाल्यावर सचिन यांना ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट मला जमणार नाही’, असा विचार आला; पण त्यावर त्यांनी आत्मबळाने मात केली. शेवटच्या कसोटीपर्यंत त्यांच्या विचारात मोठे परिवर्तन घडले होते.
या दौर्यातील चौथ्या कसोटीत पाकचे गोलंदाज वसीम अक्रम यांचा उसळता चेंडू शिरस्त्राणाच्या खालून आत घुसून १६ वर्षांच्या कोवळ्या सचिन यांच्या जबड्याला लागला. तोंडातून रक्ताची धार लागली. सहकारी फलंदाज नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांना ‘रिटायर्ड हर्ट’ (दुखापतीमुळे स्वतःहून अर्धवट डाव सोडून मैदान सोडणे) हो’, असे सांगितले; मात्र छोटे सचिन निर्धाराने म्हणाले, ‘मी खेळीन !’ त्याने रक्त थुंकले. संघाच्या आधुनिक वैद्यांनी पट्टी (बँडेज) बांधली. वेदना सहन करत सचिन पुन्हा खेळू लागले आणि त्यांनी ५७ धावा केल्या.
२ इ. सचिन यांच्या संयमाचे दर्शन घडवणारा प्रसंग : पाकचे गोलंदाज सकलेन मुश्ताक यांनी सांगितले की, मुश्ताक नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून नावलौकिकास येत होते. पाकमध्ये कसोटी सामना चालू होता. सचिन खेळपट्टीवर होते आणि मुश्ताक त्यांना गोलंदाजी करत होते. मुश्ताक यांची गोलंदाजी चांगली होत होती; मात्र सचिनही चिकाटीने फलंदाजी करत असल्याने ते बाद होत नव्हते. तेव्हा मुश्ताक यांनी सचिनला चिथवण्यासाठी काही अपशब्द वापरले. सचिन यांनी प्रथम दुर्लक्ष केले; मात्र दुसर्यांदा त्यांनी अपशब्द वापरल्यावर सचिन त्यांना समजावत म्हणाले, ‘सकलेन तू एक चांगला, होतकरू आणि हुशार खेळाडू आहेस. तुला हे अशा पद्धतीचे अपशब्द वापरणे शोभत नाही. फलंदाजाला बाद करण्यासाठी तुझी गोलंदाजी पुरेशी आहे, तुला अशा वागण्याची आवश्यकता नाही.’ हे शब्द ऐकून सकलेन यांचा विरोध पूर्णतः मावळला. पुढची ४ षटके गोलंदाजी करेपर्यंत सकलेन यांच्या मनात हेच विचार घोळत होते की, मी चूक केली.
२ ई. दिवंगत शेन वॉर्न यांचे सचिन यांच्याविषयीचे मत : जगातील सर्वाेत्कृष्ट फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न म्हणाले होते, ‘‘सचिन यांना गोलंदाजी करतांना मला कधीच त्यांचा राग आला नाही; कारण त्यांच्या शांतचित्ताने केलेल्या फलंदाजीत कधीही अहंकार डोकावायचाच नाही !’’
३. ‘अर्जुन पुरस्कार’प्राप्त पद्मश्री विराट कोहली

विराट कोहली हे सध्याच्या पिढीतील अत्यंत आक्रमक खेळाडू मानले जायचे. वर्ष २०१८ पर्यंत त्यांच्या अहंकाराशी संबंधित सूत्रे अधिक चर्चेत येत असत; मात्र पुढे विराट यांनी आध्यात्मिक दृष्टीकोन, ध्यानधारणा आदींचा आधार घ्यायला प्रारंभ केला. ते निमकरोली बाबांच्या आश्रमात जाऊन आले. तेथील अनुयायांनी त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. विराट यांनी प्रेमानंद महाराजांचेही मार्गदर्शन घेतले. त्यामुळे विराट यांच्यामध्ये आमूलाग्र पालट झाले.
३ अ. विराट यांच्यातील पालट दर्शवणारे प्रसंग : वर्ष २०१९ च्या विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना चालू होता. ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आले असता भारतीय प्रेक्षक त्यांची टर उडवू लागले, त्यांना चिडवू लागले. तेव्हा विराट हे स्वतः पुढे आले. त्यांनी प्रेक्षकांना शांत केले आणि त्यांनी ‘स्मिथ त्यांच्यावरील बंदी उठल्यानंतर प्रथमच क्रिकेट खेळत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवा !’, असे हातवारे करून समजावले. प्रेक्षकांनी विराट यांचे एेकले आणि स्मिथ यांना प्रोत्साहन दिले.
३ आ. विराट यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ! : विराट यांनी जाहीरपणे सांगितले, ‘‘मी ध्यानधारणेमुळेच शांत, मनाने कणखर आणि भावनिकदृष्ट्या संतुलित झालो. त्याच्यामुळेच माझी कारकीर्द फुलत गेली.’’
४. अध्यात्माचा आधार घेतलेले अन्य काही श्रद्धाळू क्रिकेटपटू अन् त्यांचे यश
४ अ. पूर्ण कारकीर्दीत एकदाही नियमबाह्य चेंडू (नो बॉल) न टाकणारे कपिल देव
४ आ. फलंदाजीची भक्कम ‘भिंत’ (द वॉल) मानले जाणारे संयमी अन् शांत राहुल द्रविड
४ इ. नाक फुटल्यानंतरही गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करणारे अनिल कुंबळे
४ इ. ‘क्रोधशून्य कर्णधार’ (कॅप्टन कूल) मानले जाणारे महेंद्रसिंह धोनी
४ ई. विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानातील मातीप्रतीही कृतज्ञता व्यक्त करणार;, स्वतःच्या विक्रमांचा विचार न करणारे अन् सर्वत्र सहजतेने वावरणारे निगर्वी रोहित शर्मा
४ उ. हिंदु धर्मावर प्रचंड निष्ठा असलेले दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज केशव महाराज
४ ऊ. भारतीय योगाभ्यासाचा अंगीकार करणारे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ब्रेट ली, तसेच भारताला विश्वचषक मिळवून देणारे प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गॅरी कर्स्टन
४ ए. भारतीय संस्कृतीप्रती आदर म्हणून स्वतःच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवणारे ‘क्षेत्ररक्षणाचे सुपरमॅन’ मानले जाणारे दक्षिण आफ्रिकेचे जॉन्टी र्होड्स
५. अध्यात्माचे महत्त्व जाणा ! :

वरील विश्लेषणावरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
५ अ. जेव्हा खेळाडू मैदानावर उभा असतो, तेव्हा त्याच्यावर त्याच्या देशाच्या कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांचे ओझे असते. अपयशाची भीती, यशाची लालसा आणि क्षणोक्षणीचा मानसिक दबाव यांनी त्याला घेरलेले असतो. अशा वेळी, केवळ शारीरिक कौशल्ये पुरेशी नसतात, तर विजय मिळवण्यासाठी सद्गुणांची, म्हणजेच अध्यात्माची आवश्यकता असते.
५ आ. अध्यात्म ही ती ‘शक्ती’ आहे, जी गावस्करांना उसळत्या चेंडूंपुढेही शांतपणे उभे ठाकण्याची आणि विरोधकांच्या शिवीगाळाकडे दुर्लक्ष करून ‘निष्काम कर्म’ करण्याची प्रेरणा देते.
५ इ. अध्यात्म ही ती ‘करुणा’ आहे, जी सचिनला निष्ठूर प्रतिस्पर्ध्यांशीही वाद न घालता त्याला समजावण्याची सत्शील वृत्ती देते, ज्यामुळे प्रतिस्पर्ध्याचे वैर क्षणार्धात मावळते.
५ ई. अध्यात्म ही ती ‘जागृती’ आहे, जी विराट कोहलींसारख्या आक्रमक खेळाडूच्या अहंकाराचे रूपांतर संवेदनशीलतेत करते. ज्यामुळे तो केवळ ‘उत्कृष्ट खेळाडू’ रहात नाही, तर एक ‘आदर्श व्यक्ती’ म्हणून समोर येतो.
५ उ. क्रिकेट हा केवळ धावा, फलंदाज बाद होणे वा विक्रम यांचा खेळ नाही. तो मनःशक्ती, संयम, स्वभाव परिवर्तन आणि ‘अहं’विरहित वृत्ती यांचा आरसा आहे. तो अध्यात्माच्या आधारानेच खेळावा लागतो. अध्यात्माचा आधार घेऊन खेळणारा खेळाडू आधी स्वतःतील दोष, अहंकार यांच्यावर विजय मिळवतो आणि त्यानंतर त्याला प्रतिस्पर्धी संघावरही विजय मिळवता येतो.
५ ऊ. कला, क्रीडा आदी क्षेत्रांतील कौशल्य सरावाने प्राप्त करता येते; मात्र ते टिकवण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता असते. व्यक्तीने त्याच्या त्या त्या क्षेत्राचा ‘साधना’ म्हणून अंगीकार करावा लागतो. जेव्हा तुम्ही कौशल्य आणि अध्यात्म यांची सांगड घालता, तेव्हा खेळ (संबंधित क्षेत्र) तर जिंकता येतोच, याखेरीज जीवनही जिंकता येते. कौशल्य तुम्हाला ‘विजयी’ बनवते, तर त्याला दिलेली अध्यात्माची जोड तुम्हाला ‘महान व्यक्ती’ बनवते !
६. आवाहन :
आज भारतातील ६५ कोटी लोकांना क्रिकेटची आवड आहे. त्या सर्वांसह अन्य सर्व क्रीडाप्रेमींना आवाहन आहे की, वर दिलेल्या खेळाडूंचा केवळ पैसा, प्रसिद्धी, छानछोकीपणा, शरीरसौष्ठव यांकडे लक्ष न देता, त्यांनी केलेल्या अध्यात्माच्या अंगीकाराचा पैलूही लक्षात घ्या, म्हणजेच तुम्हीही तुम्हाला शक्य असलेली साधना (उदा. नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, सत्सेवा, त्याग, प्रीती, हिंदु राष्ट्राची स्थापना) करा ! यासाठी सनातन संस्था तुम्हाला सदैव साहाय्य करील ! परिणामी तुमचे जीवन खर्या अर्थाने आनंदी होईल !
हा लेख वाचून प्रत्येक क्रीडाप्रेमीला साधना करण्याची सद्बुद्धी होवो, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !