Bangladesh Hindu Attacks : गेल्या वर्षी बांगलादेशात ९५ मंदिरांवर आक्रमणे, तर ६६ हिंदूंच्या हत्या !

ढाका (बांगलादेश) – ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल’ने दावा केला आहे की, वर्ष २०२५ मध्ये बांगलादेशात धार्मिक हिंसेच्या ५२२ घटना घडल्या. यात ६६ जणांचा मृत्यू झाला, तसेच ९५ मंदिरे आणि धार्मिक स्थळे यांवर आक्रमणे करण्यात आली. अंतरिम सरकारने केवळ ७१ घटनाच धार्मिक हिंसेच्या स्वरूपाच्या असल्याचे म्हटले होते.

‘युनिटी कौन्सिल’ने पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांक समुदायांना कसे लक्ष्य केले जात आहे ?, याची माहिती दिली. कौन्सिलचे कार्यकारी महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांनी माध्यमांतील वृत्तांच्या आधारे संकलित केलेली आकडेवारी सादर केली. या आकडेवारीनुसार महिलांवरील अत्याचारांच्या २८ घटना नोंदवण्यात आल्या; यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्कार यांचा समावेश आहे. १०२ घरे आणि दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली. ६६ प्रकरणांमध्ये भूमी आणि मालमत्ता बळकावण्यात आली. अपहरणारच्या ३८, ठार मारण्याच्या ४७ धमक्या आणि ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली ३६ जणांना अटक करण्यात आली.

जानेवारी २०२६ मध्येही धार्मिक हिंसाचार

१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत ४२ नव्या हिंसक घटना नोंदल्या गेल्या. या  दिवसांत ११ हत्या झाल्या. मंदिरे आणि चर्च यांवर ९ वेळा आक्रमणे झाली. अल्पसंख्यांक समुदाय भीतीच्या छायेखाली आहे. मतदान करण्यास लोक घाबरले, तर त्याचे दायित्व सरकार आणि निवडणूक आयोग यांचे असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मोनिंद्र कुमार नाथ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, सरकारच्या व्याख्येनुसार हत्या, बलात्कार किंवा घर जाळणे हे तोपर्यंत धार्मिक ठरत नाही, जोपर्यंत ते मंदिराच्या आवारात घडत नाही. ही अल्पसंख्यांकांची केलेली फसवणूक आहे.

प्रमुख हिंदु नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा, तसेच अन्य नेत्यांवर दाखल खटल्यांचा उल्लेख करत, सरकारच गुन्हे करत असल्याचा आरोपही करण्यात आला.