Rajasthan Pakistan Spy : पोखरण (राजस्थान) येथे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या व्यक्तीला अटक  

भारतीय सैन्यदलाशी संबंधित गोपनीय माहिती ‘आय.एस्.आय.’ला पाठवल्याचा आरोप !

(आय.एस्.आय. : इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)

पाकसाठी हेरगिरी करणारा झबराराम

पोखरण (राजस्थान) – राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तान सीमेलगत असलेल्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण परिसरात ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका स्थानिक तरुणाला नुकतीच अटक केली. आरोपी भारतीय सैन्यदलाशी संबंधित युद्धविषयक गोपनीय माहिती पाकला पाठवत होता.

१. गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रफुल्ल कुमार यांनी सांगितले की, राज्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

२. याच कालावधीत पोखरण तालुक्यातील नेडान गावातील झबराराम (वय २८ वर्षे ) याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांना आढळून आले. आरोपी सातत्याने पाकिस्तानी हँडलर्सच्या (हँडलर म्हणजे हस्तक) संपर्कात होता.

३. अन्वेषणात आणि भ्रमणभाषच्या तांत्रिक परीक्षणात गंभीर गोष्टी उघड झाल्या. पाकिस्तानी संस्थांनी त्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये (महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे) अडकवून आर्थिक आमीष दाखवले होते. या आमिषाच्या आहारी जाऊन आरोपी भारतीय सैन्यदलाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकला पाठवत होता.

४. पोलिसांनी झबरारामला जयपूर येथील केंद्रीय अन्वेषण केंद्रात आणले. राजस्थान पोलीस, सैन्यदल गुप्तचर यंत्रणा आणि अन्य सुरक्षा संस्था यांनी संयुक्तपणे सखोल चौकशी केली. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !