Odisha Tobacco Ban : ओडिशा राज्यात गुटख्यावर बंदी !

भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा राज्यशासनाने राज्यात गुटखा, पान मसाला, जर्दा, खैनी, तंबाखू किंवा निकोटिन यांपासून बनवली सर्व उत्पादने, त्यांचे पॅकेजिंग, साठवणूक आणि विक्री, यांवर संपूर्ण राज्यात बंदी घातली आहे. यासंदर्भात सरकारने २१ जानेवारीला अधिकृत अधिसूचना प्रसारित केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि ‘अन्न सुरक्षा अन् मानक प्राधिकरणा’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारेही बंदी घालण्यात आली आहे. सरकारने नागरिकांना नव्या नियमांचे पालन करण्याचे आणि निरोगी अन् ‘तंबाखूमुक्त ओडिशा’ निर्माण करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम !

आरोग्य अधिकार्‍यांच्या मते तंबाखू आणि निकोटिनयुक्त उत्पादने यांमुळे तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, तसेच शरिराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करणारे जीवघेणे आजार होतात. अशा पदार्थांमुळे विशेषतः मुले आणि तरुणांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो.

इतर राज्यांतून ओडिशात विक्री होत होता गुटखा !

ओडिशा सरकारने यापूर्वीच वर्ष २०१३ मध्ये तंबाखू आणि निकोटिनयुक्त उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री यांवर बंदी घातली होती. तरीही इतर राज्यांतून ही उत्पादने ओडिशामध्ये आणून विकली जात होती. मागील वर्षी मार्चमध्ये विधानसभेत मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले होते की, १६ राज्यांतून तंबाखू आणि निकोटिनयुक्त उत्पादने आयात केली जात होती. ११ वर्षांत या उत्पादनांच्या विक्रीतून राज्य सरकारला ६ सहस्र ५९६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले होते की वर्ष २०१४-१५ मध्ये तंबाखू आणि पान मसाला यांच्या विक्रीतून १७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, जे वर्ष २०२४-२५ मध्ये वाढून १ सहस्र ४८ कोटी रुपयांपर्यंत पोचले. आता पान मसाला, तंबाखू, जर्दा, खैनी आणि तंबाखू किंवा निकोटिनपासून बनवलेल्या सर्व पदार्थांवर संपूर्ण बंदी घालण्यात आल्याने ओडिशामध्ये ही उत्पादने उपलब्ध रहाणार नाहीत. या निर्णयाचा राज्य सरकारच्या महसुलावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

ओडिशातील भाजप सरकारचे अभिनंदन !  भाजपशासित ओडिशा सरकार गुटख्यावर बंदी घालू शकते, तर अन्य भाजपशासित राज्ये ती का घालत नाहीत ?, असा प्रश्न उपस्थित होतो !