जिल्हा न्यायालयाच्या परिसरात ‘जिओ’चे नेटवर्क येत नसल्याने अधिवक्त्यांकडून लोक न्यायालयात याचिका

जियोचे अध्यक्ष आकाश आणि ईशा अंबानी यांना बनवले पक्षकार !

पानिपत (हरियाणा) – येथे जिल्हा न्यायालयाच्या परिसरात भ्रमणभाषचे नेटवर्क (संपर्क) येत नसल्याने त्रस्त अधिवक्त्यांनी टेलिकॉम आस्थापन ‘रिलायन्स जिओ’विरुद्ध लोक न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यात आस्थापनाचे अध्यक्ष आकाश अंबानी आणि व्यवस्थापकीय संचालिका ईशा अंबानी यांनाही पक्षकार बनवण्यात आले आहे.

याचिकेत अधिवक्त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या कक्षामध्ये रेंज (संचार संकेत) येत नाही. पक्षकारांशी बोलण्यासाठी त्यांना मोकळ्या मैदानात जावे लागते. यामुळे न्यायालयीन कामांमध्ये अनावश्यक विलंब होतो. याचिकाकर्ते अधिवक्ता अमित राठी यांनी सांगितले की, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करतांना सर्वांना समन्स प्रसारित करून उत्तर मागवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० फेब्रुवारी या दिवशी निश्चित करण्यात आली आहे.