‘फायबरयुक्त’ (तंतूमय पदार्थ) खाणे, याचे कायमच सगळ्यांच्या मनात काही ग्रह आहेत. प्रतिदिनच्या फायबरसाठी काकडी आणि गाजर किंवा मुलांच्या डब्यात काकडी किंवा टोमॅटो कापून देणे, ही प्रथा पुष्कळ साधारण आहे. फायबरविषयी एक मोठा गैरसमज हा आहे, ‘जर मी कच्चे खाल्ले, तरच फायबर मिळते.’

तंतूमय पदार्थ शिजवून खाणे, ही पाश्चात्त्य पद्धत आणि त्याचे दुष्परिणाम
फायबर किंवा तंतू हे निरनिराळ्या धान्य कडधान्य यांच्या साली, फळे, भाज्या यांच्यामध्ये असते. भाकरी, पोळी, भाज्या, कोशिंबीर असा भारतीय पद्धतीचा चौरस आहार अधिकाधिक असेल, तर हे तंतूयुक्त पदार्थ पोटात आपोआप भरपूर जात असतात. मुद्दाम वेगळे कच्चे खायची आवश्यकता नाही. ही पद्धत जिथे ब्रेड, मांस आणि बटाटा अधिक खाल्ला जातो, अशा पाश्चिमात्य देशातून आली; कारण तिथे ती आवश्यकता होती. तिथेही आता कच्च्या भाज्या खाण्याऐवजी शिजवून खाणे, हे प्रचलित होऊ लागले आहे.
मुळातच ‘सेल्युलोज’ (वनस्पतींचे मूळ द्रव्य) पचवणारा ‘एन्झाईम’ (सजिवांच्या शरिरात बनणारे प्रथिन) माणसांच्या पोटात नाही. ‘सेल्युलोज’ पचायला जडच आहे. गायी रवंथ करत बसतात, हे आपण ऐकले आहे, आपल्यात तीही सोय नाही. भाज्या शिजवल्या की, त्यातील फायबरचे विभाजन होते. ते कच्चे खाल्ले, तर होत नाही; ज्यामुळे पचनावर ताण येतो. त्यातून जर आतड्यांचे चलनवलन चांगले नसेल, तर ते पाण्याने फुगून आतड्यात पडून रहाते आणि ‘गट फ्लोरां’च्या (आतड्यांतील सूक्ष्मजंतूंचा समुदायांच्या) साहाय्याने त्याचे पचन होतांना वायू सिद्ध होतो. यातून ढेकरा येणे, पोटात गच्च होणे, घशाशी येणे, असे त्रास होतांना दिसतात.

तंतूमययुक्त पदार्थ खातांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
१. आयुर्वेदात ‘उष्णं अश्नीयात्, स्निग्धं अश्नीयात्’, हे तत्त्व खाल्लेले चांगल्या पद्धतीत पचावे म्हणून सांगितले आहे. यानुसार भाज्या नेहमी शिजवून, ताज्या आणि गरम खाल्लेल्या चांगल्या.
२. कोशिंबिरी खातांना आवर्जून फोडणी देऊन, लिंबू पिळून किंवा डाळिंब घालून कराव्यात. जिरे, मिरे, आले या गोष्टी कोशिंबिरीची सुपाच्यता (पचन) वाढवतात.
३. जेवणाच्या प्रमाणात किंवा जेवणाच्या ऐवजी कच्चे खाऊ नये. दाताचा, खाण्याच्या वेगाचा आणि पचनाचा विचार करता मध्यम पर्याय म्हणून वयस्कर लोकांना सूप हा पर्याय चांगला आहे.
४. पिकलेली फळे तशीच खावी; कारण पिकण्याच्या प्रक्रियेत त्यातील घटक आणि तंतू युक्त पदार्थ पचायला आधीपेक्षा सुपाच्य आपोआप होतात. त्यामुळे मुळात फळेही जडच असली, तरी कच्च्या भाज्यांच्या अपेक्षेत प्रमाणात खाल्लेले फळ चांगले पचते.

५. ‘इरिटेबल बोवेल सिंड्रोम’ (आतड्यांचा एक विकार), आतड्यांच्या कुठल्याही दाहक स्थितीमध्ये कच्च्या भाज्या त्रासदायक आहेत, त्यामुळे आम्ही त्या पूर्णपणे टाळायला सांगतो. गरोदर असतांना त्या पूर्णपणे टाळाव्यात. सर्वांनीच विशेषतः कोबी, कडधान्ये, पालक या भाज्या सामान्यपणे पचडी, कोशिंबीर, अशा स्वरूपात न वापरता शिजवूनच वापराव्या. शिजवल्याने त्यात असलेले पचायला जड, नैसर्गिकरीत्या असलेले पचायला हानीकारक अशा काही घटकांसह काही अत्यंत त्रासदायक जीवाणूंचा नाश होतो.
६. भारतीय पद्धतीत वाढलेले ताट डोळ्यासमोर आणावे. कोशिंबीर, चटणी हे पदार्थ डावीकडे असतात आणि ते रूची वाढण्याकरता खावेत. जिथे जे पदार्थ जितक्या प्रमाणात आहेत, ते तसे खावेत. असे जेवण करतांना एकदम भरभर आणि न चावता खाऊ नये.
७. जीवाणू संसर्ग आणि पचन हे विचार लक्षात घेता व्यायाम केल्यावर दुधी, कडुनिंब, काकडी, संमिश्र भाज्यांचे रस (ज्यूस) टाळावेत.
प्रतिदिन व्यायाम करणारे, वय लहान असणारे या वर्गातील व्यक्तींना कच्चे पदार्थ त्या मानाने पचतात; कारण दात नीट असतात, चलन वलन नीट असते. या लेखामध्ये सांगितलेल्या पदार्थांचा संबंध त्यांच्या चांगले असणे किंवा नसणे, अशा गुणांशी नसून या लिखाणाच्या संदर्भात ते पदार्थ खातांना घ्यायच्या प्रमाणाशी आणि पद्धतीशी संबंधित आहे.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !