सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईच्या, श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या मृत्यूच्या क्षणी आणि मृत्यूनंतर अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

(कै.) श्रीमती प्रभावती गजानन शिंदे

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती प्रभावती शिंदे !

१ अ. ‘आईचा अंतिम समय जवळ आला आहे’, असे वाटून तिच्या छातीवर हात ठेवल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण होऊन भाव जागृत होणे : ‘९.१.२०२६ या दिवशी सकाळी ९ वाजता मी आईच्या खोलीत गेल्यावर ‘ती तोंडाने श्वास घेत आहे’, हे मी पाहिले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, ‘तिचा अंतिम समय जवळ आला आहे.’ मी तिच्या छातीवर हात ठेवल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांची तीव्रतेने आठवण आली आणि त्यांनी आतापर्यंत आईसाठी विविध माध्यमांतून केलेल्या कृपेची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली. आईचा मृत्यू समीप आला; म्हणून नव्हे, तर गुरुदेवांप्रतीच्या कृतज्ञताभावाने माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

१ आ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांना ‘आई सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवणे : त्या वेळी आई अतिशय स्थिर आणि शांत होती. काही वेळानंतर पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत) आईला भेटायला आल्या. तेव्हा त्यांना ‘आई सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवले. यावरून ‘सकाळी आईच्या हृदयावर हात ठेवल्यावर माझा भाव का जागृत झाला होता ?’, हे माझ्या लक्षात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे त्यांच्या आईच्या देहावसानाच्या संदर्भातील लेख वाचून त्यातून खूप शिकायला मिळाले. सर्व प्रारब्धभोग आनंदाने सहन करणार्‍या आणि जीवनाच्या अंतिम क्षणीही देवाच्या अनुसंधानात असणार्‍या त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती शिंदे यांना त्यांची साधना अन् आश्रमातील सात्त्विक वातावरण यांमुळे शांतपणाने मृत्यू आला. मृत्यूनंतरही उच्च लोकांत त्यांची साधना होत राहील ! सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी या लेखातून साधना करण्याचे आणि देवावर श्रद्धा असण्याचे महत्त्व अगदी योग्य शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून कृतज्ञताभाव जाणवतो. आईचा मृत्यू झाल्यावर अस्थिर न होता वातावरणातील पालट आणि स्पंदने अनुभवणारे अन् आईला पुढील गती मिळाल्याची अनुभूती घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे अभिनंदन करावे, तेवढे थोडे ! मलाही असे लिखाण लिहिता आले नसते. 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१६.१.२०२६)

२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेमुळे आईला शांतपणे मृत्यूला सामोरे जाता येणे 

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

२ अ. शारीरिक व्याधींमुळे त्रास होत असतांनाही आई शांत आणि स्थिर असणे : सकाळी १० वाजता ‘आईचा रक्तदाब न्यून होत गेला, तसेच तिची नाडीही लागत नाही’, हे वैद्यांच्या लक्षात आले. आईला अनेक शारीरिक व्याधी झाल्या होत्या; परंतु या स्थितीतही आई अतिशय शांत आणि स्थिर होती.

२ आ. प्रारब्धभोग भोगण्यासाठी गुरुमाऊलींनी आईला ऊर्जा आणि चैतन्य दिल्यामुळे तिला शारीरिक त्रास शांतपणे सहन करता येणे

१. मागील १० वर्षांपासून आईच्या हृदयाचे केवळ २५ टक्केच कार्य चालू होते, तरीही तिला कधी हृदयविकाराचा झटका आला नाही. याविषयी आधुनिक वैद्यांना आश्चर्य वाटत असे.

२. आईच्या मूत्रपिंडाचे कार्य पुष्कळ न्यून झाले होते.

३. मागील काही मासांपासून आई पूर्णपणे झोपून असल्यामुळे तिचे अंग दुखत असे.

४. वर्ष २००० पासून आईचे दात पुष्कळ झिजले होते; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काढता येत नव्हते. ‘भूलतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आईचे दात शस्त्रकर्मगृहात काढावे लागणार’, असे दंतवैद्यांनी सांगितले होते. ‘आईचे वय आणि प्रकृती पाहून ते अत्यंत जोखमीचे आहे’, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आईचे दात काढता आले नव्हते. अलीकडच्या काळात तिचे दात पुष्कळ दुखत असल्याने तिला दातांनी काहीच चावता येत नव्हते.

५. आईला पुष्कळ वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होत होता. मागील एक मासापासून तो त्रास वाढला होता.

एवढी सगळी दुखणी असूनही आईच्या चेहर्‍यावर वेदनेचा किंवा दुःखाचा लवलेशही नव्हता. हे तिच्यावर असलेली गुरुदेवांची अपार कृपा आणि वरदहस्त यांमुळेच शक्य झाले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आईला प्रारब्धभोग भोगण्यासाठी ऊर्जा आणि चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवले.

यावरून ‘साधना करणार्‍या जिवांवर ईश्वर कशी कृपा करतो ?’, हेही मला अनुभवता आले आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात आले.

२ इ. शांतपणे झालेला आईचा मृत्यू ! : आईचा मृत्यू दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी एकदम शांतपणे झाला. मृत्यूनंतर वातावरणातील हलकेपणा आणखी वाढला. खोलीतील स्पंदने स्थिर आणि शांत वाटत होती. वातावरणात आनंद प्रक्षेपित होत होता आणि तो अनुभवता येत होता.

३. अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सूक्ष्मातील अस्तित्व आणि त्यांनी निर्माण केलेले अभेद्य संरक्षककवच यांमुळे मृत्यूनंतर वाईट शक्तींचा त्रास न होता ‘आई उच्च लोकांत जात आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे : दुपारी साधारण ३.३० वाजता मी डोळे मिटून आईच्या खोलीत २ मिनिटे बसलो होतो. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘आई वर वर उच्च लोकात जात होती. आईचा हात नमस्काराच्या मुद्रेत होता. ‘आई कुणाला नमस्कार करत आहे ?’, हे पाहिले असता मला समोर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव दिसले. तेही तिच्याकडे हास्यमुद्रेने पाहून नमस्कार करत होते. आईच्या भोवती चैतन्याचे अभेद्य संरक्षककवच होते. त्या कवचाच्या बाहेर दोन्ही बाजूंनी काळ्या रंगाचे हात दिसत होते. ते हात आईचा हात खेचण्याचा प्रयत्न करत होते; परंतु ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व आणि त्यांनी आईच्या भोवती निर्माण केलेले अभेद्य संरक्षककवच’ यांमुळे आईला त्या वाईट शक्तींचा स्पर्श होत नव्हता. आई अत्यंत आनंदाने परब्रह्म गुरुदेवांना नमस्कार करून नमस्काराच्या मुद्रेत वर वर जात होती.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आईने ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती आणि ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून बाहेर पडली होती. ‘साधकाचा एकदा पकडलेला हात गुरु कधीच सोडत नाहीत’, हे अनुभूतीतून मला शिकता आले. गुरुदेवांच्या कृपेने आईचा पुढचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडणारच आहे आणि तिची पुढची साधनाही तेच करून घेणार आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

हे लिखाण करत असतांना सतत सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांची कृपा आठवून माझ्या डोळ्यांतून कृतज्ञताभावाने अश्रू येत होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी लिहून घेतलेले हे लिखाण कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !

 इदं न मम ।

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद पनवेल. (११.१.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक