‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये महिला तेव्हाच सुरक्षित राहु शकतील, जेव्हा त्यांना पत्नीचा दर्जा मिळेल ! – Madras High Court

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाची स्पष्टोक्ती !

(‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे)

चेन्नई (तमिळनाडू) – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या महिलांना सुरक्षा तेव्हाच मिळेल, जेव्हा त्यांना पत्नीचा दर्जा दिला जाईल. अशा नात्यांमध्ये महिलांना वैवाहिक सुरक्षा मिळत नाही, त्यामुळे महिलांना संरक्षण देणे हे न्यायालयाचे दायित्व आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने या संदर्भातील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी करतांना म्हटले. आरोपीवर आरोप आहे की, तो महिलेसमवेत आधी ‘लिव्ह-इन’मध्ये राहिला. नंतर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेसमवेत शारीरिक संबंध ठेवले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, पुरुष आधी आधुनिक बनून ‘लिव्ह-इन’चे नाते निर्माण करतात. नंतर नातेसंबंध बिघडल्यावर महिलेच्या चारित्र्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ते असे करू शकतात; कारण कायद्यात ‘लिव्ह-इन’विषयी कोणतेही नियम नाहीत. भारतात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला समाज पूर्णपणे स्वीकारत नसला, तरी असे संबंध आता सामान्य झाले आहेत. पुरुष नात्यात असतांना स्वतःला आधुनिक मानू शकतात; पण जेव्हा गोष्टी बिघडायला लागतात, तेव्हा ते महिलांना दोष देण्यास वेळ लावत नाहीत. आरोपीने नात्यात आल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. तथापि त्याच्याविरुद्ध कलम ६९ (फसवून लैंगिक संबंध ठेवणे) अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.