लहान मुलांचे आजारपण न्यून करण्यासाठी घ्यावयाची काळजी !

लहान मुले वरचेवर सतत आजारी पडत असल्याची तक्रार अनेक पालकांची असते. या तक्रारी ‘कोविड’ महामारीनंतर फारच वाढल्या आहेत. याला कारणेही अनेक आहेत. उपचार म्हणून यांत आयुर्वेद उत्तम काम करतच आहे; मात्र सावधगिरी म्हणून काही महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.

१. आपले मूल आजारी असल्यास ते बरे होईपर्यंत त्याला शाळेत पाठवू नका. याने इतरांना संसर्ग होऊ नये; म्हणून साहाय्य होईल.

२. इतर मुला-मुलींपासून योग्य अंतर राखून रहाण्याची सवय आपल्या पाल्याला लावणे. संशोधन असे सांगते की, अन्य कुणाला स्पर्श – विशेषत: हस्तांदोलन केल्यानंतर स्वतःचे डोळे किंवा नाक यांना हात लावण्याची प्रतिक्षिप्त क्रिया बहुतेकांकडून घडत असते. इतरांपासून मुळातच योग्य अंतर राखून राहिल्यास त्यांना कोणता सर्दी, खोकला संसर्ग झाला असल्यास त्यापासून बचाव होतोच; पण सध्या मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श यांची शिकवण देण्याच्या काळात तर शाळेतूनही योग्य अंतर राखण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने तिथेही लाभ होईल.

वैद्य परीक्षित शेवडे

३. स्वतःचा ‘गट मायक्रोबायोम’ (आतड्यांतील सूक्ष्मजीव समुदाय) उत्तम असल्यास आपण संसर्गांना सहज बळी पडत नाही. आयुर्वेदानुसार अग्नी उत्तम राखल्याने अनेक व्याधी दूर रहातात. यासाठी घरच्या ताज्या अन्नावर भर, विशेषतः कृत्रिम रंग, ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ (पदार्थ टिकवणारे द्रव्य / पदार्थ) घातलेले ‘पॅकेट’बंद (पिशवीबंद) पदार्थ, चॉकलेट टाळणे अत्यंत महत्त्वाचे.

४. आपल्या पाल्याची पुरेशी झोप होत आहे ना, याकडे नीट लक्ष द्या. झोप नीट नसल्यास प्रतिकारशक्ती न्यून होत असते. वारंवार जंत होण्याची प्रवृत्ती असल्यासही झोपेवर परिणाम होतो. यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करा.

५. नियमित व्यायाम, शारीरिक हालचाल यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते. मुलांच्या ‘स्क्रीनटाईम’कडे (भ्रमणभाष बघण्याकडे) लक्ष ठेवा. तो शक्य तितका अल्प ठेवून त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा.

६. आपला पाल्य नाकानेच श्वास घेत आहे ना, याकडे लक्ष ठेवा. तोंडाने श्वास घेतल्यास संसर्गाची शक्यता अनेक पटीने वाढते. ‘टॉन्सिल्स’ सुजणे किंवा ‘अडेनॉईडस्’ यांसारख्या त्रासामुळे मुलांच्या नकळत ती तोंडानेच श्वसन करत असतात. हे दोन्ही त्रास आयुर्वेदाच्या उपचारांनी उत्तमरित्या आटोक्यात येऊ शकतात. नाकाने श्वास घेतल्यास मुळातच संसर्गाला प्रतिबंध होतो.

७. ‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविके)च्या अवाजवी वापराने ‘गट मायक्रोबायोम’ला हानी पोचते. लक्षात घ्या, ‘शुद्ध आयुर्वेदाचे उपचार देऊन लहान मुलांत ‘अँटीबायोटिक्स’चा वापर जवळपास पूर्णपणे बंद करता येऊ शकतो. हीच गोष्ट श्वासाचे पंप आणि काही इंजेक्शन यांनाही लागू होते.

८. नियमित रसायन सेवन. यात सुवर्णप्राशनापासून त्या त्या मुलासाठी सिद्ध केलेल्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार केलेल्या रसायनांचा समावेश होतो. लक्षात घ्या, सुवर्णप्राशन हा मासातून एकदा नव्हे, तर प्रतिदिन करण्याचा उपक्रम आहे. आपल्या वैद्यांशी याविषयी बोलून घ्या. आमच्याकडे या दोन्ही किंवा अन्यही कित्येक रसायनांचा लाभ झालेली असंख्य प्रकरणे आहेत. चांगल्या सवयी प्रतिदिन अंगीकारायच्या असतात, हा पालट आता तरी घडायला हवा.

जन्मजात प्रतिकारशक्ती किंवा मूलभूत व्याधीक्षमत्व उत्तम राखण्यासाठी वर दिलेल्या सवयी उपयुक्त आहेत. त्यांचे पालन केले, तर लहान मुलांची बहुतेक आजारपणे न्यून होतील. त्यातही मुले आजारी पडलीच, तर आयुर्वेद आहेच ! सामान्य समजाच्या अगदी विपरीत. आयुर्वेदाची चाटणे, औषधे लहान मुले अतिशय आवडीने घेतात, हा आमचा आजवरचा अनुभव आहे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.