Chhattisgarh Gharwapsi : छत्तीसगडमध्ये  ५० ख्रिस्ती कुटुंबांतील २०० हून अधिक नागरिकांची घरवापसी!

  • ख्रिस्त्यांनी आमीष दाखवून केले होते धर्मांतर !

  • विधीवत हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश !

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश )

कांकेर (छत्तीसगड) – येथील जिल्ह्यात १८ जानेवारीला पीढापाल परिसरात विविध गावांमधून आलेल्या ५० ख्रिस्ती कुटुंबांतील २०० हून अधिक नागरिकांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून त्यांच्या मूळ हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. हा कार्यक्रम समाजाच्या संमतीने आणि पारंपरिक विधींच्या आधारे पार पडला. घरवापसी करणार्‍या नागरिकांनी सांगितले की, आजार बरा होईल, तसेच अन्य आमीष दाखवून पूर्वी त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. आत्मपरीक्षणानंतर त्यांनी पुन्हा स्वतःच्वर मूळ हिंदु धर्माचा स्वीकार केला.

१. पीढापाल, धनतुलसी, मोदे, साल्हेभाट, किरगापाटी आणि तरांदुल या ६ गावांतील ५०   कुटुंबांनी घरवापसीचा निर्णय घेतला. हा निर्णय कुठल्याही दबावाखाली घेतलेला नसून दीर्घकाळ चाललेल्या संवाद आणि बैठका यानंतर घेण्यात आला आहे, असे घरवापसी करणार्‍या नागरिकांनी सांगितले.

२. घरवापसीचा कार्यक्रम पीढापाल गावातील मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. पूजाविधी आणि पारंपरिक संस्कार यांद्वारे नागरिकांना विधीपूर्वक सनातन धर्मात घेण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

३. आदिवासी समाजाचे सदस्य ईश्वर कांवडे यांनी सांगितले की, नागरिकांनी स्वेच्छेने मूळ धर्मात पुनरागमन केले आहे. परिसरातील शेष धर्मांतरित कुटुंबांतील सदस्यही लवकरच घरवापसी करतील.