अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथे झालेल्या गेल्या वर्षी ‘आयुर्वेद एक्सपो’मध्ये वैद्य सुविनय दामले यांनी दिलेल्या व्याख्यानाचा सारांश येथे दिला आहे.
अनेक वेळा अनेक आरोग्य तपासणी शिबिरे होत असतात. तज्ञ आधुनिक वैद्य (डॉक्टर) येणार, आधुनिक यंत्रांनी तपासण्या होणार, भविष्यातील रोगाचे निदान लवकर होणार, अर्ध्या किमतीत तपासण्या, ‘तपासणी पॅकेज’, ‘ऑफर’…. वगैरे वगैरे. अशा कोणत्याही आमिषांना कुणी बळी पडू नये. एक वैद्य म्हणून कुणीही असे उघडपणे सांगणार नाही; पण ‘बुडतां हे जन न देखवे डोळां’; म्हणून सांगायचे धाडस करत आहे.

१. आरोग्य तपासणी शिबिरांमधून नव्या रोगांचा जन्म
खरे सांगायचे, तर अशा विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरांमधूनच नवीन नवीन रोग जन्माला घातले जातात. अहवालामध्ये (‘रिपोर्ट’मध्ये) कुठेतरी जरा अल्प, जरा अधिक दाखवले जाते. (प्रत्यक्षात ते खरे असतात का ? देव जाणे !); पण एक किडा डोक्यात सोडून दिला जातो. नसलेल्या रोगावर हळूहळू विष पसरवणारी (स्लो पॉयझन) औषधे चालू होतात. कॅल्शियम अल्प; थोडा रक्तदाब; ‘इसीजी’ (हृदय स्पंदन आलेख) अहवालात असलेला थोडा पालट; कदाचित् कर्करोग होऊ शकेल, अशी छोटीशी गाठ; ‘थायरॉईड’ वाढत आहे, रक्तातील साखर काठावर आली आहे, ‘कोलेस्टेरॉल’ वाढले आहे…. अशा अनेक लक्षणांपैकी प्रत्येकाला एक एक संभाव्य धोकादायक भीती सांगितली जाते. आपणही ‘चला आता औषधे चालू झाली’, असे स्वतःच कौतुक करत एकच गोळी खाऊ लागतो. (आरंभी अभिमानाने तपासणी अहवाल दाखवले जातात. मोठमोठ्या ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयांची नावे घ्यायला, मोठेपणा मिरवायला जरा बरे वाटते.)

२. गोळ्यांवर गोळ्या कशा चालू होतात ?
असे करता करता किती वर्षे आपण नाहक रसायनाची गोळी खात आहोत ? हेही लक्षात येत नाही. जरासा रक्तदाब वाढला की, एक गोळी आयुष्यभरासाठी चालू होते. (ज्या रक्तदाबाचा खरेतर आपल्याला काहीच त्रास नसतो आणि काही वेळा रक्तदाब वाढणे, ही शरिराची आवश्यकता असते) त्या गोळीने लघवी अधिक होते. रक्तातील पाणी बळजोरीने बाहेर काढले जाते. खरेतर ताण निर्माण होतो मनावर, त्याचा ताण येतो मेंदूला, रोगाचे नाव रक्ताशी संबंधित असलेल्या हृदयावर आणि औषध जाते मूत्रपिंडात ! यालाच म्हणतात, ‘रोग मांडीला औषध शेंडीला’… असो !
लघवीला अधिक झाल्याने रक्ताचे ‘पी.एच्.’ (आम्ल-आम्लारी यांचे प्रमाण) पालटते. थोडक्यात रक्त जाड होते, मग रक्त पातळ करणारी गोळी चालू होते. ही ‘इकोस्प्रीन’ची एकच गोळी हृदयातील रक्त पातळ करता करता सर्व शरीरातील रक्त पातळ करते. (ही गोळी उर्वरित सर्व अवयवतज्ञांना म्हणजे दंतवैद्य (डेंटिस्ट), शल्यविशारद (सर्जन), हाडांचे वैद्य (ऑर्थोपेडिक्स), पोटाच्या विकारांचे वैद्य (गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट) यांना नको असते; कारण या गोळीने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.) परिणामी महत्त्वाच्या अवयवातील रक्ताचे ‘पी.एच्.’ पालटते. ते अवयव कमकुवत होऊ लागतात. (दुधात पाणी घातलेल्या चहाचा आनंद कसा मिळेल ? तसे हे आहे) अवयवांची उपासमार होते. अधिक रसायनाची भर रक्तात पडत जाते. तेवढे रसायन बाहेर काढायला यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, गर्भाशय या अवयवांना आपण छळतो.
आवश्यकतेपेक्षा रक्त जाड झाल्याने चिकटपणा वाढतो (त्याला ‘ॲलोपथी’नुसार ‘कोलेस्टेरॉल’ म्हणतात) आणि चरबी चिकटणे चालू होते. इथेच ‘फॅटी लिव्हर’ या (नसलेल्या) आजाराचा जन्म होतो, मग त्यावर गोळी चालू होते.
नंतर येतो औषधातील ‘स्टॅटीन’ गट ! या गटातील औषधे चालू झाली की, रक्तातील साखर वाढू लागते, म्हणजे तपासणी अहवालामध्ये मधुमेह दिसतो. (प्रत्यक्षात मधुमेहाचे एकही लक्षण रुग्णाला जाणवत नसते. मी याला ‘टाईप ३ डायबेटिस’ म्हणतो)
अशीच ५-६ वर्षे जातात. एकही औषध बंद होत नाही. कधीतरी ‘थायरॉईड’ तपासले, तर ते पण हट्टाने वाढते किंवा न्यून होते. आधी २५, नंतर ५०, १०० अशी चढती भाजणी चालू होते आणि समप्रमाणात ‘साईड इफेक्ट्स’ही होतात.
याच गोळ्यांचा परिणाम म्हणून ‘क्रिएटिनिन’ वाढत जाते. आता … ? ‘डायलिसिस’ ! तोपर्यंत भरल्या खात्यापित्या घरात ४ वेळा जेवूनही जीवनसत्त्वांची कमतरता दिसू लागते, मग ‘व्हिटॅमिन्स’चा मारा चालू होतो. ‘व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, … झेड्’ पर्यंत गोळ्या चालू होतात. ज्यांची खरेतर आवश्यकताच नसते. तोपर्यंत अनावश्यक रसायने सांध्यांच्या आजूबाजूला जमा होऊ लागतात.

३. दुखणे, चुकीचे व्यायाम ते कर्करोगापर्यंतच्या शंका
‘दुखतंय, दुखतंय’ या गोंडस नावाने व्यायामाला फाटा देऊन विदेशी शौचालय वापरणे चालू झालेले असते. आधुनिक वैद्यांनी ‘तुमच्यासाठी हा एकच व्यायाम आहे’, असे रुग्णांना सांगितल्यामुळे वाढलेली ढेरी सांभाळत, गुडघ्यावर भार टाकत, एका बाजूने लंगडत ते चालत असतात. ‘मॉर्निंग वॉक’च्या वेडापायी (सकाळी सकाळी चालणे, हा भारतीय व्यायाम प्रकारच नाही) आमचे सांधे आणखी झिजवले जातात.
वेदनाशामक औषधे आत जायला लागतात. आतड्यांची कोमल त्वचा जळायला लागलेली असते. पोटदुखी चालू होते. त्याच्या तपासण्या होतात. सर्व छिद्रांतून आतमधे नळ्या घालून पडताळून त्यातून ‘अल्सर’, ‘टीबी’ची लक्षणे ते अगदी कर्करोगापर्यंतच्या शंका आधुनिक वैद्य घेतातच. खरेतर या केवळ शंकाच असतात. बहुतेक वेळेस काहीच नसते. केवळ शंका असते.
४. सामाजिक माध्यमांवरून मिळणारे आरोग्य सल्ले
काही महाभाग व्हॉट्सॲप, फेसबुक यांवरील सल्ले वाचून विज्ञापनांना भुलून आयुर्वेदाचे खोटे सल्ले आणि नको ती औषधे स्वतःच्या मनाने खातच असतात. यासाठी कायम आयुर्वेदातील तज्ञ आणि शासनमान्य अधिकृत वैद्यांचा सल्ला घ्यावा. एव्हाना १० ते १५ प्रकारच्या गोळ्या चालू झालेल्या असतात. कुणीतरी आयुर्वेदातील तज्ञ आपण गाठतोही; पण आधीच्या रसायनांच्या गोळ्या-औषधे चालू ठेवून स्वतःची चूर्णे, गोळ्या, वट्या ते वैद्य देतातच.
एवढे करून छातीत, पाठीत दुखणे चालूच असते. तपासण्यांची कागदपत्रे वाढतच जातात. गोळ्या-औषधे चालूच असतात. गुण चार आणे नाही; पण दुखणे वाढतच असते. बाहेरची बाधा तपासून अंगारे-धुपारेही होतात. वास्तूशास्त्रानुसार तोडफोड होते. नवीन रत्न, आभूषणे खरेदी होते. लांबलांबचे वैदू, डॉक्टरही पाठी पडतात; पण कुणालाच अचूक निदान मिळत नाही. ‘एनर्जी’ काही वाढत नाही.
आपत्कालीन स्थिती ‘इसीजी’ (हृदयाचा स्पंदन आलेख), ‘स्ट्रेसटेस्ट’ (ताणाविषयीची चाचणी), ‘अँजिओग्राफी’ (हृदयातील रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी करायची चाचणी) आणि लगेचच ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म) करायला भागच पाडले जाते. ज्या कारणासाठी आधुनिक वैद्यांकडे जात आहोत, ते कारण, लक्षण बाजूलाच रहाते आणि नको तेच निदान बाहेर येते अन् नको ती औषधे, नको ते पथ्य, पुन्हा त्यातून कमतरता असे कायमस्वरूपी पाठी लागतात.
याचा आरंभ कुठून झाला, ते आठवा. विनामूल्य आरोग्य तपासणी अथवा स्वतःच्या मनाने करवून घेतलेल्या तपासण्या किंवा सहजपणे आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या आरोग्य तपासण्या ! … आणि केवळ एकच गोळी ! काय करायचे हे तुम्हीच ठरवा !
आरोग्यम् धनसंपदा ! आनंदी रहा, हसत रहा !
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
शासकीय कर्ज संमत करून देण्याचे आमीष दाखवून शेकडो महिलांची फसवणूक !
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
भावना बोथट झाल्या ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण