‘नुकताच सर्वत्र नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष सर्वांनी साजरे केले. या निमित्ताने आठवडाभर सुटी होती. त्यामुळे लोकांकडून काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संगीतरजनी, मेजवानी, कुप्रसिद्ध ‘सनबर्न फेस्टिव्हल’ अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच प्रतिवर्षीप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीला ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले. या संपूर्ण काळात ध्वनीप्रदूषणाच्या संबंधातील नियम शिथिल होते. त्यामुळे अनेक शहरांत मोठ्या आवाजातील वाद्यवृंद चालू होते. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ‘डॉल्बी सिस्टम’ (मोठ्या आवाजाची ध्वनीक्षेपक यंत्रणा)वर सिनेमाची गाणी लावली गेली.
गोव्यासारख्या राज्यात तर रात्री उशिरापर्यंत संगीत मेजवान्या चालू असल्याने शेजारच्या परिसरात रहाणार्या लोकांना त्या ध्वनीप्रदूषणाचा पुष्कळ त्रास झाला. याच्या अनेक तक्रारी लोकांनी करूनही या संगीतरजनी साजर्या करणार्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. कदाचित् यामागे काही अर्थकारण असेल, हा भाग निराळा; परंतु ‘स्वतःच्या क्षणिक सुखासाठी आपण इतरांच्या सुखावर विरजण घालत आहोत’, याचे समाजभान या लोकांना का राहू नये ? आपल्या कोणत्याही कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. हा एक सामान्य मनुष्यधर्म आहे; परंतु याचा विसर पडल्याने लोक इतरांचा अजिबात विचार करत नाहीत. ‘अशा प्रवृत्तींना आळा कोण घालणार ?’, हा यक्षप्रश्न आहे.
श्री. योगेश जलतारे, ‘समूह संपादक’, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (७.१.२०२६)
१. विवाह समारंभ, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका, क्रिकेटच्या मॅच इत्यादी प्रसंगी वेळेचे भान न ठेवता फटाके फोडणे
मागील मासात पुण्यात एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलाचा विवाह ठरला. त्या मुलाला विवाहस्थळी घेऊन जाण्यासाठी या परिवाराने मोठी वरात काढून रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजातील फटाके फोडले, सोबत बँडबाजा होताच. एक वेळ लग्नाची वरात म्हणून हे सर्व स्वाभाविक म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी हाच प्रकार, नंतर नवीन सुनेला घेऊन हा परिवार घरी पोचला, तेव्हा परत मध्यरात्री फटाके फोडण्यात आले आणि अपप्रकाराचे टोक, म्हणजे विवाहाच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाच्या दिवशीसुद्धा आजूबाजूच्या लोकांचा जराही विचार न करता या परिवारातील सदस्यांनी रात्री उशिरापर्यंत अक्षरशः धिंगाणा घातला. लग्नाचा आनंद साजरा करणे, हे अमान्य नाही; परंतु त्यामुळे आपल्याला शेजारच्या लोकांना रात्री-अपरात्री त्रास देण्याचा अधिकार प्राप्त होतो का ? याचे उत्तर निश्चितच ‘नाही’ असे आहे.
आज केवळ लग्नप्रसंगी नव्हे, तर क्रिकेटची मॅच जिंकल्यावर, धार्मिक उत्सवात किंवा काही ठिकाणी आठवड्यातील नियमित आरतीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याची शिकवण कुठलाही धर्मग्रंथ देत नाही. असे असतांनाही लोक स्वतःच्या सुखासाठी फटाके फोडतात, हरकत नाही; परंतु स्वतःच्या या कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी आपण घ्यायला हवी; कारण यामुळे आजारी रुग्ण, अभ्यास करणारे विद्यार्थी, वयस्कर लोक या सर्वांची झोपमोड होते. यासह त्यांना या आवाजामुळे मानसिक त्रासही होतो.

२. ‘सायलेन्सर’ काढून दुचाकी आणि चारचाकी गाड्या भरधाव वेगाने अन् किंचाळत चालवणे
सध्या ही एक विकृती बरीच शहरे आणि गावे येथील युवकांमध्ये फोफावलेली दिसून येते. आपल्या वाहनाच्या आवाजामुळे अवती-भवतीचे वयस्कर लोक वा रुग्ण यांना त्रास होत असेल, याचा विचार युवक करतांना दिसत नाहीत. वयस्कर सोडा, त्या वाटेने जाणार्या अन्य वाहनचालकांच्या मनातही त्या आवाजामुळे एक प्रकारची दहशत मनात निर्माण होते. काही ठिकाणी असेही पहायला मिळाले की, रस्त्याने कुणी दुचाकी किंवा चारचाकी चालवत जात असतांना शेजारी अचानक एखादे चारचाकी वाहन येते आणि त्या वाहनातील सर्व युवक एकाच वेळी मोठ्या आवाजात अन्य वाहनाच्या चालकाच्या कानाशी किंचाळतात. त्यामुळे तो चालक क्षणभर भांबावतो. याप्रसंगी अपघात होण्याचीही भीती असते. काही मुले आवश्यक नसतांना मोठ्याने ‘हॉर्न’ वाजवत गाड्या चालवतात.
३. स्वतःच्या सुखासाठी इतरांशी भांडणे
स्वतःच्या सुखाला पहिले प्राधान्य मिळावे, या हेतूने अनेक लोक गर्दीच्या ठिकाणी इतरांना अक्षरशः मागे ढकलतात किंवा प्रसंगी तुडवतातही. त्यामुळेच चेंगराचेंगरीच्या घटना होतात. अनेक लोक सहलीला आनंद घेण्यासाठी जातात; परंतु प्रवासात अन्य प्रवाशांशी थोड्या थोड्या गोष्टींसाठी वाद घालतात. समुद्रकिनार्यावर गेल्यानंतर मौजमजेच्या नावाखाली तेथे कचरा करून ठेवतात. काही जण धावत्या वाहनातून रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. काही जण दारू पिऊन धिंगाणा घालतात.
४. जागोजागी थुंकणे आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे
ही तर संपूर्ण भारतातील एक सर्वसामायिक समस्या आहे. लोक सुख मिळते; म्हणून स्वतःची व्यसने पूर्ण करतात. याविषयी आपण त्यांना काही सांगू शकत नाही; परंतु ‘हे करत असतांनाच इतरांचा विचार करायला विसरतात’, याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे. अनेक लोक पान-गुटखा यांच्या पिचकार्या रस्त्यावर, इमारतीच्या जिन्यात, इतकेच नव्हे, तर मंदिर परिसरातही टाकत असतात. धूम्रपान करणारे लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या वातावरणात धूर सोडून अवतीभोवतीच्या लोकांची इच्छा नसतांनाही त्यांना बळजोरीने धूम्रपान करवतात.
५. अंघोळ करून नद्या घाण करणे
नद्या, वने, डोंगर, दर्या येथे पर्यटकांकडून होणारे प्रदूषणही समाजाची मोठी हानी करणारे आहे. लोक नदी वा तलाव यांमध्ये अंघोळ करतात, त्या ठिकाणी पचापच थुंकतात. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले नदीचे अगदी शुद्ध पाणीही घाण होते. अनेक पर्यटक प्लास्टिकचा कचरा, पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या निसर्गरम्य ठिकाणी टाकून निघून जातात. काही शहरांत पाण्यावर तरंगणारे ‘कॅसिनो’ आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असतांनाही या कॅसिनोंना अनुमती देऊन काही लोकांच्या सुखासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरले जाते.
६. धर्मांधांचा उन्माद !
या सर्व समाजघातक अपप्रकारांच्या जोडीला अन्य एक त्रासदायक, म्हणजे मशिदींमधून दिवसातून ५ वेळा कर्णकर्कश आवाजात भोंगे लावून दिली जाणारी बांग ! भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अजान देण्याला कुणाचा विरोध नाही; परंतु ती भोंगे लावून देण्याचा अधिकार कुणाला नाही आणि ती धार्मिकही नाही. संत कबीर यांनी स्वतः सांगितले, ‘मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगराचा आवाजही ईश्वराला ऐकू जातो.’ त्यामुळे मोठ्याने बांग देण्याची मुळात आवश्यकताच नाही. ‘मशिदीत अजान देण्यासाठी भोंगे वापरता येणार नाहीत’, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नुकत्याच एका प्रकरणात दिलेल्या निर्णयात पुन्हा स्पष्ट केले आहे.
तसे हे काही नवीन नाही. यापूर्वीही सर्वाेच्च न्यायालयासह विविध न्यायालयांनी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनीप्रदूषण होऊ नये, या दृष्टीने दिशादर्शन केले आहे, तसेच ‘नमाजपठणासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचा हक्क कुठलाही धर्मग्रंथ देत नाही’, हे न्यायालयाने यापूर्वीही सांगितलेले आहे. दुर्दैवाने उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याची हवी तशी कार्यवाही होत नसल्याने ही समस्या सुटत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो.
पाप भोगावेच लागेल !
सुख उपभोगण्यासाठी विविध माध्यमांचा आपण वापर करत असू; परंतु त्यामुळे इतरांना त्रास होत असल्यास त्याचे पाप स्वतःला निश्चितच भोगावे लागेल. त्यामुळे त्याची काळजी घेऊन आपण समाजाला त्रास होणार नाही, हे पाहिले पाहिजे.
– श्री. योगेश जलतारे
या कृतीमुळे इतरांना त्रास होत असल्याने यातून कुणाचेही धर्मपालन होणे शक्य नाही. अर्थात् ‘हा विचार केवळ हिंदु धर्मियांना लागू होतो, इतरांना नाही’, असेच सामान्य माणसाला वाटत असते; कारण ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) ही संकल्पना केवळ हिंदु धर्मातच असल्याने हिंदूंच्या दृष्टीने ‘संपूर्ण समाज एक कुटुंब आहे’ आणि त्यामुळे स्वाभाविकपणे हिंदु समाजाची काळजी घेतांना काही प्रमाणात तरी आढळतात. बाकीच्यांना याचे देणे-घेणे नसते. त्यामुळेच दिवसभरात ५ वेळा मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर दिली जाणारी अजान आपल्याला ऐकावी लागते, यावर कुठलाही प्रतिबंध नाही. हिंदूंनी मात्र त्यांच्या मिरवणुका रात्री १० वाजण्याच्या आत पूर्ण करायच्या असतात. मंदिरातील भजने, कीर्तने रात्री १० वाजण्याच्या आतच बंद करायची असतात. सकाळी देवाची आळवणी करण्यासाठी मंदिरात लावण्यात येणार्या भुपाळ्या तर आता जवळपास बंदच झाल्या आहेत.
असो, लेखाचा मुख्य विषय हिंदू आणि इतरांमध्ये करण्यात येत असलेल्या भेदभावाचा नसून समाजभान राखण्याचा आहे.’
संपादकीय भूमिकाकुठे समाजाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे आपले पूर्वज, तर कुठे स्वसुखासाठी समाजाला वेठीस धरणारे आताचे स्वार्थांध नागरिक ! |

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !