वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक ११
वास्तूशास्त्राचा अभ्यास करतांना आपल्याला ऊर्जांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते; कारण या विश्वात कार्यरत असणार्या विविध ऊर्जांचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. वास्तूशास्त्रानुसार ४ ऊर्जा कार्य करतात. वैश्विक (ब्रह्मांड) ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, विद्युत् ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा ! या लेखामध्ये आपण या ऊर्जांविषयी माहिती जाणून घेऊया.
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998560.html

१. वैश्विक ऊर्जा
१ अ. शुभऊर्जेची घरामध्ये सतत साठवण करून ठेवावी ! : वास्तूशास्त्रानुसार वैश्विक (ब्रह्मांड) ऊर्जा या पूर्व आणि उत्तर दिशांकडून येत असतात. त्या ऊर्जा शुभ स्वरूपाच्या असतात. शुभऊर्जेची घरामध्ये सतत साठवण करून ठेवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण भूमी, बांधकाम किंवा घराच्या छताचा उतार कोणत्या दिशेला आहे, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते.
१ आ. वास्तूशास्त्रामध्ये उताराला असलेले महत्त्व : जर वास्तूचा उतार पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल, तर त्या दिशांनी येणारी शुभ ऊर्जा वास्तूमध्ये बराच काळ साठून राहू शकते. याउलट जर उतार दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल, तर ही ऊर्जा प्रभावित होऊन लगेच निघून जाते. ती आपल्या वास्तूमध्ये साठून राहू शकत नाही. म्हणून वास्तूशास्त्रामध्ये उताराला (प्लव) शास्त्रकारांनी पुष्कळ महत्त्व दिलेले आहे.
१ इ. पूर्व आणि उत्तर दिशा उघडी ठेवण्याचे महत्त्व : वास्तूशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशांकडून शुभ ऊर्जा येते. त्यामुळे आपण कुंपणाची भिंत, दारे-खिडक्या, तसेच सज्जा (बाल्कनी) बांधतांना दक्षिण अन् पश्चिम दिशा अधिकाधिक बंद करून पूर्व आणि उत्तर दिशा उघडी ठेवल्यास त्या दिशांकडून येणारी ऊर्जा वास्तूत साठून रहाते. ती तेथे रहाणार्या लोकांना सतत ऊर्जा प्रदान करते. याउलट जर दक्षिण किंवा पश्चिम दिशा जर उघडी असली, तर केलेले बांधकाम दुप्पट वेळ खाणारे, पैसा वाया घालवणारे, तसेच श्रम आणि मनःस्ताप वाढवणारे असते.
याचा अर्थ असा नाही की, दक्षिण आणि पश्चिम दिशेला खिडकी इत्यादी घेऊ नये; परंतु प्रकाशाच्या आवश्यकतेनुसार जर घ्यावी लागली, तर त्या तुलनेत त्याच्या समोरील दिशा म्हणजेच पूर्व किंवा उत्तर या अधिक उघड्या असणे आवश्यक असते.
१ ई. फर्निचर कोणत्या दिशेला करावे ? : ऊर्जाप्रवाहाचा विचार करून आपण घरामध्ये फर्निचर (साहित्य) इत्यादी दक्षिण-पश्चिम दिशेला करावे आणि मोकळी जागा पूर्व-उत्तरेला ठेवली, तरीही वास्तूमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम होतात.
१ उ. घरावरील Parapet Wall (गच्चीच्या कडेवर बांधलेली अल्प उंचीची भिंत) ही सर्व दिशांना समान किंवा दक्षिण-पश्चिमेला अधिक जाड आणि उंच असावी. छताचा उतार सर्व बाजूंनी समान किंवा पूर्व-उत्तर भागात अधिक असावा.

२. भूगर्भीय ऊर्जा
२ अ. भूगर्भीय ऊर्जा वास्तूमधील लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत असणे : भूमीखालून पाण्याचे झरे वहात असतात. झर्यांना भूमीखालून येणारी ऊर्जा वर ढकलण्याचा प्रयत्न करते. यामध्ये तणाव आणि ऊर्जा वलय निर्माण होते. हे वलय भूमीच्या पृष्ठभागावर जेथे येते, त्याला ‘भूगर्भीय तणाव क्षेत्र’ असे म्हणतात. आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने आपल्याला ही ठिकाणे शोधावी लागतात. वास्तूमध्ये रहाणार्या लोकांच्या आरोग्यावर ही ऊर्जा परिणाम करते. मानसिक तणाव, नैराश्य आणि भीती या समस्या भूगर्भीय ऊर्जा असलेल्या ठिकाणी जाणवू शकतात.
२ आ. भूगर्भीय पाण्याच्या वर रचना करण्याचे महत्त्व : भूगर्भीय पाण्याच्या वर एखादी रचना बांधली जाते, तेव्हा पाण्याच्या ऊर्जेचा नैसर्गिक चुंबकीय प्रवाह प्रतिबंधित केला जातो आणि इमारतीमध्ये व्यत्यय आणणारी कंपने निर्माण होतात.
२ इ. या ऊर्जाप्रवाहांवर आपण जर नियमित झोपलो, तर शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो.
२ ई. भूगर्भीय ऊर्जा तणाव हे वेगवेगळ्या आजारांचे कारण आहे. भूगर्भीय ऊर्जा तणाव हा तुमच्या अन्नातून जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी शोषून घेण्यास प्रतिबंधित करतो.

३. विद्युत् ऊर्जा
३ अ. विद्युत् ऊर्जेजी दोन रूपे : ढगांच्या घर्षणाने निर्माण होणारी वीज आणि दगडांच्या घर्षणाने निर्माण होणारा अग्नी ही विद्युत् ऊर्जेजीच २ रूपे आहेत.
३ आ. साठलेल्या ऊर्जेचा परिणाम : भूमीखाली असणारे विविध स्तरांचे एकमेकांवर घर्षण होऊन तेथेही विद्युत् ऊर्जा निर्माण होत असते. ही अत्यंत अल्प प्रमाणात असते; परंतु ती साठत राहून विद्युत् ऊर्जा रूपात काम करते. ही साठलेली ऊर्जा ज्या वास्तूमध्ये असते, तेथे रहाणार्या व्यक्तींना ती निश्चितच त्रासदायक ठरते. यामुळे वास्तूचे वातावरणही उष्ण रहाते. मानसिक नैराश्य, दडपण इत्यादी परिणाम या ऊर्जेमुळे होऊ शकतात.
३ इ. विद्युत् साहित्यामुळे होणारा परिणाम : घराजवळ असणारा ट्रान्सफॉर्मर (विद्युत् जनित्र), मोठ्या क्षमतेची विद्युत् तार इत्यादी गोष्टीसुद्धा आपल्यावर परिणाम करतात; कारण मोठ्या क्षमतेच्या विद्युत् तारा किंवा ट्रान्सफॉर्मर यांच्या भोवती त्यांचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. त्या क्षेत्राशी आपला अधिक काळ संपर्क आल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
४. चुंबकीय ऊर्जा
४ अ. पृथ्वीच्या गर्भामधील चुंबकीय क्षेत्राचा परिणाम : पृथ्वीच्या गर्भामध्येही चुंबकीय क्षेत्र असते. त्यात दोन क्षेत्रे एकमेकांच्या जवळ आली आणि त्यातील सजातीय अन् विजातीय ऊर्जा केंद्रे यांच्या जागा विरुद्ध आल्या, तर त्या ठिकाणी तणाव निर्माण होतो. संपूर्ण पृथ्वीवर अशा जागा अल्प आहेत; परंतु अशा ठिकाणांवर होकायंत्र काम करत नाही.
सुदैवाने आपण जेथे रहातो, तेथे असे बिंदू न्यून आहेत. काश्मीरमध्ये काही ठिकाणी अशी ऊर्जा आपल्याला पहायला मिळते. ही ऊर्जा पृथ्वीवर रहातांना नियमांना छेद देत असल्याने येथे रहाणार्यांचे जीवन निश्चितच कष्टप्रद असते.
५. नकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी वास्तूनिर्मिती करणे टाळा !
वास्तूच्या दृष्टीने अभ्यास करतांना सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांचा अभ्यासही करायला हवा. आधुनिक काळात बर्याच यंत्रांच्या माध्यमातून आपण जागेतील ऊर्जेचा अभ्यास करू शकतो; परंतु पूर्वीच्या जाणकारांनी स्थुलातील नकारात्मक ऊर्जेची काही लक्षणे सांगितली आहेत. तो भाग वास्तूनिर्मितीसाठी टाळण्यास सांगितले आहे.
५ अ. जलाघात आणि त्याचा परिणाम : ‘जे क्षेत्र सतत ओलसर असते किंवा ज्या ठिकाणी पाण्यामुळे ओलसरपणा निर्माण झाला असतो, तेथे जलाघात झाला आहे’, असे आपण म्हणतो. ओलसरपणामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. तेथे ओलसरपणाचा गंध येत असतो. तो नकारात्मक ऊर्जेचाच एक भाग असतो. बर्याच सदनिकांमध्ये पाणी भिंतींमध्ये झिरपून ओलसरपणा निर्माण होतो. त्यामुळेसुद्धा वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात.
५ आ. वारूळ : वारूळ नकारात्मक ऊर्जेवर निर्माण होत असते. मागच्या लेखामध्ये आपण वारूळे असणारी भूमी वर्ज्य करावी, याविषयीचा ‘विश्वकर्मप्रकाश’ या ग्रंथातील श्लोक पाहिला होता. भूगर्भशास्त्रानुसारही हे सिद्ध झाले आहे की, मुंग्या जेथे वारूळ निर्माण करतात, तेथे नकारात्मक स्पंदने असतात.
५ इ. मधमाशांचे पोळे : पोळे असलेली झाडे जेथे असतील, ती जागा वर्ज्य करावी. मधमाशासुद्धा नकारात्मक ऊर्जा क्षेत्रांमध्ये पोळे बांधतात.
६. नैसर्गिक संरक्षणासह शारीरिक अन् मानसिक आरोग्याची आवश्यकता !
आताच्या काळात आधुनिकीकरणामुळे विविध ऊर्जांपासून आपल्याला मिळणारे नैसर्गिक संरक्षण नष्ट झाले. भूगर्भीय तणावामुळे निर्माण होणार्या समस्यांवर उपाय म्हणून पूर्वीच्या काळी पेंढ्यांच्या गाद्या, घोंगडी, भूमी शेणाने सारवणे इत्यादी सोपे उपाय केले जायचे. त्यामुळे नैसर्गिक संरक्षण प्राप्त होत असे. अजूनही ग्रामीण भागात याचा वापर केला जातो. त्यामुळे शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असते. अंगावर धातू (सोने, चांदी आणि तांबे) धारण केल्यानेही संरक्षण मिळते. अंगावर रत्न किंवा रुद्राक्ष धारण करणे हे उपायही प्रभावी ठरतात.
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२२.१.२०२६)
भाग १२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1003400.html
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !