ए.आय.मुळे भविष्यात कार्यालयांचे संग्रहालयात रूपांतर होईल ! – डॉ. मनोहर चासकर, कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ

पणजी, गोवा येथील २१ वे जागतिक मराठी संमेलन !

(ए.आय. म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धिमत्ता)

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – ए.आय. सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती घडवत आहे. जसे त्याचे लाभ आहेत, तसे तोटेही आहेत. भविष्यात ए.आय.चा वापर प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे माणसाला अगदी कार्यालयात जाण्याचीही आवश्यकता भासणार नाही. सर्व कामे घरी राहूनच करता येतील. परिणामी कार्यालयांचे संग्रहालयात रूपांतर होईल, असे वक्तव्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी येथे केले.

जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील कला अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनात पहिल्या दिवशी ‘तंत्रज्ञान : दशा आणि दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोवा विद्यापिठातील संगणक शाखेचे प्राध्यापक डॉ. रामराव वाघ आणि ३० वर्षे तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे श्री. प्रसाद शिरगावकर उपस्थित होते.

डॉ. चासकर पुढे म्हणाले, ‘‘अश्म युगापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या वाटचालीकडे आपण दृष्टीक्षेप टाकला, तर आपल्या लक्षात येईल की, आपल्याला तंत्रज्ञानात पालट होतांना कळत नाही, तर तो झाल्यावर कळतो. ए.आय.चा वापर वर्ष २००९-१० च्या सुमारास चालू झाला; पण त्यानंतर काही वर्षांनी आपल्याला तो कळला. ए.आय.मुळे माणसाची विचारक्षमता अल्प होते. मेंदू चालवला नाही, तर कालांतराने त्याचा वापर करण्याची क्षमता अल्प होते आणि ए.आय.चा हाच सर्वांत मोठा धोका आहे.’’

‘सायबर सुरक्षा’ हा तंत्रज्ञानाचा शापच ! – डॉ. रामराव वाघ

डॉ. रामराव वाघ म्हणाले, ‘‘सायबर सुरक्षा’ हा तंत्रज्ञानाचा शापच आहे. ए.आय.मुळे सायबर सुरक्षेचे धोके अधिक वाढले. यावर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीने सजग रहाणे. त्यासह समाजजागृतीही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ विज्ञान, वाणिज्य आदी शाखांचे शिक्षण देऊन उपयोग नाही, तर अभ्यासक्रमात विज्ञान, तंत्रज्ञान, कला आदी सर्व विषयांची सांगड घालणे आवश्यक आहे.’’

विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे, हाच ए.आय.च्या आव्हानावरील उपाय ! – प्रसाद शिरगावकर

प्रसाद शिरगावकर म्हणाले, ‘‘आज सर्वजण ए.आय.च्या आव्हानावरील उपायांच्या शोधात आहेत. ए.आय. सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो; पण प्रश्न निर्माण नाही करू शकत. प्रश्न माणसेच करू शकतात. त्यामुळे आपण विविध प्रश्न निर्माण करायला शिकले पाहिजे. ते केवळ ए.आय.शी नव्हे, तर जीवनातील प्रत्येक अंगाशी निगडित असावेत. मी कोण ? कुठून आलो ? यांविषयी जिज्ञासा निर्माण केली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असेल, तर त्यांना अचूक आणि आवश्यक ज्ञान मिळेल अन् हाच ए.आय.च्या अाव्हानावरील खरा उपाय आहे.’’

तंत्रज्ञानासाठी माणूस आहे कि माणसासाठी तंत्रज्ञान ? – डॉ. चासकर

ए.आय.चा सर्वांत मोठा फटका सेवा क्षेत्राला बसत आहे. परिणामी ‘ए.आय.मुळे नोकर्‍या जातील’, अशी भीती सर्वांमध्ये आहे; परंतु प्रत्यक्षात ए.आय. मुळे नोकर्‍या जाणार नाहीत, तर त्या जाऊ नयेत, यासाठी आपल्याला ठराविक कालावधीनंतर नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने अवगत करावे लागेल. तथापि मानवी बुद्धीला मर्यादा आहे. त्यामुळे ‘तंत्रज्ञानासाठी माणूस आहे कि माणसासाठी तंत्रज्ञान ?’, हे आपल्याला कधीतरी निश्चित करावे लागेल.

संपादकीय भूमिका

ए.आय.चा कालपरत्वे सुयोग्य वापर आवश्यक; परंतु त्याच्यावरील अवलंबित्व मर्यादित ठेवणे सर्वप्रकारे श्रेयस्करच !